💥सिद्धार्थ हे कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री तसेच माजी परराष्ट्रमंत्री एस.एम.कृष्णा यांचे ते जावई आहेत.💥
✍ मोहन चौकेकर
मंगळुरू:-कॅफे कॉफी डे किंवा CCD या प्रसिद्ध कॉफी शॉप साखळीचे मालक व्ही.जी.सिद्धार्थ यांचा मृतदेह सापडला आहे. गेले दोन दिवस त्यांचा शोध घेण्यासाठी मोठ्याप्रमाणावर मोहीम राबवण्यात येत होती. व्यवसायात झालेला तोटा आणि कर्जबाजारीपणामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचा दाट संशय व्यक्त केला जात आहे.
सोमवारपासून ते बेपत्ता झाले होते. सिद्धार्थ हे कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री तसेच माजी परराष्ट्रमंत्री एस.एम.कृष्णा यांचे ते जावई आहेत. मंगळुरूमध्ये नेत्रावती नदीच्या काठावर होईगे बाजार परिसरात त्यांचा मृतदेह आढळून आला
सोमवारी सिद्धार्थ हे बंगळुरूवरून सकेशपुराला निघाले होते. रस्त्यात असताना त्यांनी ड्रायव्हरला गाडी मंगळुरूच्या दिशेने घ्यायला सांगितली. मंगळुरूला पोहोचल्यानंतर त्यांनी ड्रायव्हरला उल्लालकडे गाडी घ्यायला सांगितली. नेत्रावती नदीच्या पुलावर पोहोचल्यानंतर त्यांनी ड्रायव्हरला गाडी थांबवायला सांगितली. काही फोन करायचे असल्याचे सांगून ते गाडीतून उतरले. यानंतर तासभर उलटला तरी ते गाडीत परतले नाहीत, त्यामुळे त्यांच्या चालकाने त्यांचा शोध घ्यायचा प्रयत्न केला. थोड्यावेळात मुसळधार पावसाला सुरूवात झाल्याने ड्रायव्हरने सिद्धार्थ यांच्या घरच्यांना हा प्रकार सांगितले
सिद्धार्थ यांचा फोन बंद झाला, त्यामुळे त्यांचा ठावठिकाणा कळायला त्यांच्या घरच्यांना मार्ग नव्हता. अखेर त्यांनी पोलिसांत तक्रार नोंदवली. पोलिसांनी सिद्धार्थ यांच्या शोधासाठी मोठ्या प्रमाणावर मोहीम राबवली होती.
समस्यांशी लढलो पण… सिद्धार्थ यांचे भावूक पत्र;
बेपत्ता होण्यापूर्वी व्ही.जी. सिद्धार्थ यांनी ‘सीसीडी’च्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्स आणि कर्मचाऱयांना पत्र लिहिले होते. त्यामध्ये त्यांनी लिहिले होते की कठोर परिश्रमानंतर सीसीडीमध्ये 30 हजार रोजगारांची निर्मिती करू शकलो. टेक्नॉलॉजी कंपनीतून 20 हजारांवर रोजगार दिला. मात्र प्रचंड मेहनत केल्यानंतरही यशस्वीपणे हा व्यवसाय पुढे नेण्यास मी अपयशी ठरलो. माझ्यावर ज्यांनी विश्वास टाकला त्यांची मी माफी मागतो. सध्या कंपनीला तोटा होत आहे. त्यातून मी कंपनीला सावरू शकत नाही. एका मित्राकडून मोठय़ा प्रमाणावर कर्ज घेतले. देणेकरांचा दबाव वाढला आहे. आयकर विभागाच्या महासंचालकांकडून मोठय़ा प्रमाणावर छळवणूक सुरू आहे. सीसीडीचे शेअर्स जप्त करण्यात आले आहेत. मी खूप त्रास सहन केला. आता हा तणाव सहन होत नाही, असे सिद्धार्थ यांनी पत्रामध्ये म्हटले आहे.’’
आयकर विभागाने आरोप फेटाळले
सिद्धार्थ यांचे पत्र वृत्तवाहिन्या आणि सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे आयकर विभागाने खुलासा करताना आरोप फेटाळले आहेत. सिद्धार्थ यांचे माइंड ट्री लिमिटेड या कंपनीत 21 टक्के शेअर्स आहेत. या शेअर विक्रीतून सिद्धार्थ यांना 3200 कोटी रुपये मिळाले होते. नियमाप्रमाणे त्यांनी 300 कोटी आयकर भरायला हवा होता. त्यांनी फक्त 46 कोटी भरले. 2017मध्ये टाकलेल्या धाडीत हे पुरावे मिळाले. माईन ट्री लिमिटेडचे 7490000 शेअर्स जप्त केले. तसेच सीसीडीचे 2 लाखांवर शेअर्स जप्त करण्यात आले आहेत. सिद्धार्थ यांच्याकडे 362 कोटी काळा पैसा असल्याचे त्यांनीच मान्य केले होते. तसेच 118 कोटी कॅश असल्याचेही त्यांनी यापूर्वीच मान्य केले आहे, असे आयकरने आपल्या खुलाशात म्हटले आहे.
कॉफीचे साम्राज्य उभा करणारा उद्योगपती
‘सीसीडी’ हा ब्रँड देशात लोकप्रिय करणारे व्ही.जी. सिद्धार्थ यांनी 1996मध्ये अवघ्या पाच लाखांत कॅफे चेनची सुरुवात केली. बंगळुरू, मंगलोरमध्ये सुरुवात केलेल्या ‘सीसीडी’चे देशभरात सर्व मोठय़ा शहरांमध्ये आज आऊटलेट आहेत.
चिक्कमंगळूर येथे सिद्धार्थ यांच्या मालकीच्या 12 हजार एकर जमिनीवर कॉफीचे पीक घेतले जाते. तब्बल 28000 टन कॉफी निर्यात होते. चिक्कमंगळूरच्या कॉफीच्या मळ्यात 75 हजार टन कॉफी उत्पादन होते. हीच कॉफी ‘सीसीडी’मध्ये वापरली जाते. सिद्धार्थ यांच्या सीसीडी ब्रँडचा वार्षिक टर्नओव्हर अब्जावधी रुपयांचा आहे. 30 हजारांवर लोक त्यात काम करतात....
✍ मोहन चौकेकर
0 टिप्पण्या