💥पोलिसांनी सुरक्षेचा उपाय म्हणून तात्पुरत्या स्वरूपात या नदीच्या पुलावरील वाहतूक बंद केली आहे💥
गेल्या दोन तीन दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावल्याने इंद्रायणी नदीच्या पाणी पातळीत प्रचंड वाढ झाली असून, नदीने धोक्याची पातळी गाठली आहे. प्रशासनाने काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. आळंदीत तर इंद्रायणी नदीने रौद्र रुप धारण केले आहे. संपूर्ण नदीकाठ पाण्याखाली गेला आहे. भक्ती-सोपान पूल पाण्याखाली गेला आहे, तर नव्या पुलाला पाणी लागले आहे. दिवसभरात पाऊस सुरुच राहिल्याने त्यावरूनही पाणी जाण्याची भीती व्यक्त होत आहे. पोलिसांनी सुरक्षेचा उपाय म्हणून तात्पुरत्या स्वरूपात या पुलावरील वाहतूक बंद केली आहे.घाटावरील भक्त पुंडलिक मंदिर, महात्मा गांधी स्मारक पाण्याखाली गेले आहे. घाटावरून माऊली मंदिराकडे जाणारा रस्ता देखील पाण्याने भरला असून, शनीमंदिराला पाणी लागले आहे. यामुळे येथून देखील ये-जा बंद करण्यात आली आहे. घाटालगत असलेल्या छोट्या टपऱ्या, प्रसाद विक्री दुकानात पाणी शिरले आहे. काही व्यावसायिकांनी आपली दुकाने पाणी वाढताच इतरत्र हलवली आहेत.दरम्यान पुराचे पाणी पाहण्यासाठी घाटाच्या दुतर्फा बघ्यांची गर्दी वाढली आहे. हौशी लोक जीव धोक्यात घालून सेल्फी घेताना दिसून येत आहेत. सकाळी सहा वाजता पाणी वाढले तरी येथील पोलिसांनी, पालिकेने सुरक्षेचे उपाय केले नव्हते. यामुळे नागरिक जीव धोक्यात घालत होते. सकाळी अकरा नंतर पोलिस व काही पालिका कर्मचारी घाटावर येऊ लागले होते. पाणी वाढल्याचे पाहून येथील पूल व घाटावरील रस्ते वाहतूकीस बॅरिकेट लावून बंद करण्यात आले.बारानंतर पालिकेने याठिकाणी कर्मचारी पाठवत धोक्याच्या सूचना देण्यास सुरुवात केली, मात्र मुख्य घाट वगळता राम मंदिर घाट, अस्थी विसर्जन घाट येथे बंदोबस्त नव्हता. यामुळे नागरिक येथे जीव धोक्यात घालत होते. जुना पूल परिसरात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पाण्याची स्थिती पाहता ती दिवसभर वाढतच असल्याचे दिसून येत आहे...
0 टिप्पण्या