💥पालकमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेनेचे संपर्कनेते विनोद घोसाळकर, राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांची उपस्थिती💥
✍ मोहन चौकेकर
औरंगाबाद: विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार अंबादास दानवे यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेनेचे संपर्कनेते विनोद घोसाळकर, राज्यमंत्री अर्जुन खोतकर, माजी खासदार चंद्रकांत खैरे, आमदार संजय शिरसाट, महापौर नंदकुमार घोडेले, किशनचंद तनवाणी, उपमहापौर विजय औताडे, गजानन बारवाल, राजू वैद्य, बाळासाहेब थोरात यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.
आज सकाळी अकराच्या सुमारास क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून शिवसेनेने जोरदार शक्तिप्रदर्शन केले. जिल्ह्यातील नगरसेवक तसेच जिल्हा परिषद सदस्य मोठया संख्येने यावेळी उपस्थित होते. पालकमंत्री एकनाथ शिंदे, संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर, राज्यमंत्री अर्जुन खोतकर, माजी खासदार चंद्रकांत दानवे यांच्या हस्ते शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजीही केली. वाद्यांच्या गजरात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
यावेळी महिला नगरसेवक तसेच कार्यकर्त्यांचीही मोठी उपस्थिती होती. गेल्यावेळी भाजप-सेना युतीच्या उमेदवाराला पराभव पत्करावा लागला होता. यावेळी मात्र युतीकडे पुरेसे बहुमत असल्याने विजय निश्चित असल्याचे मानले जाते. त्यामुळे दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शक्तिप्रदर्शनाची संधी सोडली नाही. सकाळी दहा वाजेपासूनच क्रांती चौक परिसरात कार्यकर्त्यांचा ओघ सुरू झाला होता. मोठ्या प्रमाणावर नगरसेवक तसेच जिल्हा परिषद सदस्य कार्यकर्ते आणि समर्थक क्रांती चौकात गोळा झाले. साडेअकराच्या सुमारास प्रमुख नेते आल्यानंतर घोषणाबाजी करण्यात आली.
शिवसेना-भाजपकडे पुरेसे संख्याबळ असल्याने अंबादास दानवे यांचा विजय निश्चित आहे. भाजप तसेच शिवसेनेत कोणतेही मतभेद आता राहिलेले नाहीत. त्यामुळे दोन्ही पक्षांचे शंभर टक्के मतदान शिवसेनेच्या उमेदवाराला होईल यात शंका नाही. या निवडणुकीत विजय आमचाच असल्याचे पालकमंत्री शिंदे यांनी सांगितले.भाजप आणि शिवसेनेत कोणतेही मतभेद उरलेले नाहीत. त्यामुळे भाजपाचे संपूर्ण मते शिवसेनेच्या पारड्यात पडणार यात शंका नाही. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनीही तसे आश्वासन दिले असल्याचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले...
✍ मोहन चौकेकर
0 टिप्पण्या