💥धनगर साम्राज्य सेनेचे आगारप्रमुखांना निवेदन💥
गंगाखेडे/जेष्ठ नागरिकाना सवलतिच्या दरात एसटीने प्रवास करण्यासाठी लागणारे स्मार्ट कार्ड काढण्यासाठी होणारी ज्येष्ठांची फरफट थांबण्याची मागणी करण्यात आली. धनगर साम्राज्य सेनेच्या वतीने सखाराम बोबडे पडेगावकर,मुंजाभाऊ लांडे यानी गुरूवारी गंगाखेड आगार प्रमुखांना निवेदन दिले.
या निवेदनात म्हटले आहे की स्मार्ट कार्ड काढण्यासाठी गंगाखेड आगारात एकच खिडकी चालू करण्यात आली आहे. खिडकिचा वेळ दुपारी दोन ते पाच हा ठेवण्यात आला आहे. लाभधारकांची संख्या लक्षात घेता त्यासाठी दोन खिडक्या चालू कराव्यात व त्याचा वेळ सकाळी दहा ते पाच असा कार्यालयीन करावा. स्मार्ट कार्ड काढण्यासाठी वृद्धांकडे मोबाईल असणेही आवश्यक केली असून ही अट थांबवत स्मार्ट कार्ड हातात पडल्यानंतर ते कार्ड सुरू करण्यासाठी त्यात 300 रुपयाचे एकाच वेळी रिचार्ज मारण्याची अटही रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. वयोमानाप्रमाणे हाताचे ठसे खराब झालेले आहेत पण हे कार्ड काढण्यासाठी ते ठसे उमटत नसल्याने हे ज्येष्ठ नागरिक त्यासाठी सैरावैरा धावत आहेत. ग्रामीण भागातून आलेल्या लाभधारकांना परत गावाकडे जाण्यासाठी सायं पाचच्या नंतर बस नसल्याने त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचेही गंगाखेड आगारप्रमुख धर्माधिकारी याना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर धनगर साम्राज्य सेनेचे सखाराम बोबडे पडेगावकर, मुंजाभाऊ लांडे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. या मागण्या मान्य झाल्यास गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील हजारो जणांना याचा लाभ होणार आहे...
0 टिप्पण्या