💥कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणूका स्थगित,जानेवारी 2021मधे होणार निवडणुका....!



💥राज्यात जुलै ते डिसेंबर 2020 दरम्यान 12 हजार 668 ग्रामपंचायतींची मुदत संपत आहे💥

मुंबई : कोरोनामुळे राज्यात जुलै ते डिसेंबर या कालावधीत प्रस्तावित असलेल्या 12 हजार 668 ग्रामपंचायतींच्या निवडणुका पुढे ढकलण्यात याव्यात, अशी विनंती राज्य सरकारमार्फत राज्य निवडणूक आयोगाकडे करण्यात आली होती.त्यास आयोगाने संमती दिल्याने काही ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्यात येणार आहे, अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

राज्यात जुलै ते डिसेंबर 2020 दरम्यान 12 हजार 668 ग्रामपंचायतींची मुदत संपत आहे. या ग्रामपंचायतींच्या निवडणुका घ्यावयाच्या झाल्यास त्यासाठी कर्मचारी प्रशिक्षण, निवडणूक यंत्रणेवर ताण, मतदान यंत्राचा सामुदायिक वापर, प्रचारासाठी होणारी गर्दी, सभा, मेळावे, पदयात्रा या माध्यमातून सार्वजनिक ठिकाणी गर्दी होण्याची शक्‍यता आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता अशी गर्दी धोकादायक ठरू शकते.

 त्यामुळे या निवडणुका पुढे ढकलण्यात याव्यात व पुढील सहा महिने कोणत्याही निवडणुका न घेण्याबाबत सूचना निर्गमित करण्यात याव्यात, अशी विनंती राज्य सरकारने निवडणूक आयोगाला केली होती. त्यानुसार पुढील आदेशापर्यंत आयोगाने निवडणुकांना स्थगिती दिली आहे.

ज्या ग्रामपंचायतींची पाच वर्षांची मुदत संपेल तिथे विद्यमान कार्यकारिणी पुढे तशीच चालू न ठेवता, त्या ठिकाणी मुदत संपण्यापूर्वी योग्य प्रशासकाची नेमणूक करण्याची दक्षता घ्यावी, असेही निवडणूक आयोगाने कळविले आहे.

मंत्रिमंडळाची मंजुरी
राज्यातील एप्रिल, मे आणि जूनमध्ये मुदत संपलेल्या एक हजार 566 ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याचा निर्णय नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे, अशी माहितीही मुश्रीफ यांनी या वेळी दिली. यासंदर्भात राज्यपालांकडे शिफारस करण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या