💥दोन डोस मधील सुधारित अंतराचा निर्णय केवळ कोव्हीशिल्डसाठी असून कोवॅक्सीन आधीप्रमाणेच दिली जाईल💥
नवी दिल्ली : नवीन वैज्ञानिक पुरावे लक्षात घेता, विशिष्ट कोविड-19 प्रतिबंधात्मक लस अर्थात कोविशिल्डच्या दोन डोस मधील अंतराचे, लसीकरणावरील तांत्रिक सल्लागार गट (एनटीएजीआय) आणि त्यानंतर, कोविड-19 प्रतिबंधात्मक लस संदर्भातील राष्ट्रीय तज्ञ गटाने (एनईजीव्हीएसी) त्यांच्या 20 व्या बैठकीत पुनरावलोकन केले. या बैठकीत, कोव्हीशिल्डचा पहिला डोस दिल्यानंतर दुसरा डोस 4-8 आठवड्यांच्या अंतराने देण्याची शिफारस करण्यात आली; आधी हा दुसरा डोस 4-6 आठवड्यांच्या अंतराने दिला जायचा. दोन डोस मधील सुधारित अंतराचा निर्णय केवळ कोव्हीशिल्डसाठी असून कोवॅक्सीन आधीप्रमाणेच दिली जाईल.
केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी आज राज्ये / केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे की केंद्र सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने एनटीएजीआय आणि एनईजीव्हीएसीच्या शिफारशी मान्य केल्या आहेत. त्यानुसार कोविशिल्ड लस घेणाऱ्या लाभार्थ्यांना त्यांचा पहिला डोस दिल्यानंतर 4-8 आठवड्यांच्या निर्धारित कालावधीत दुसरा डोस दिला जाईल हे सुनिश्चित करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
विद्यमान वैज्ञानिक पुरावे लक्षात घेत असे निदर्शनाला आले आहे की, कोविशिल्डचा दुसरा डोस 6- 8 आठवड्यांच्या कालावधीत दिला तर लाभार्थ्याला अधिक संरक्षण मिळेल, परंतु हा कालावधी 8 आठवड्यांपेक्षा जास्त असू नये. केंद्रीय आरोग्य सचिवांनी संबंधित अधिकाऱ्यांना कार्यक्रम व्यवस्थापक, लसीकरण करणारे आणि कोविशिल्ड लस प्राप्तकर्त्यां पर्यंत दुसऱ्या डोसच्या सुधारित अंतराच्या कालावधीच्या संदेशाचा व्यापक प्रमाणावर प्रसार करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलण्याची सूचना केली आहे.
0 टिप्पण्या