💥अंत्यविधीला १२५ दुचाकींची रॅली काढण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार धनकवडी ते कात्रज स्मशानभुमी परिसरात घडला💥
पुणे ; कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शासनाने लागू केलेल्या नियमावलीचे उल्लंघन करीत सराईत गुन्हेगाराच्या अंत्यविधीला तब्बल १२५ दुचाकींची रॅली काढण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार धनकवडी ते कात्रज स्मशानभुमी परिसरात घडला आहे. याप्रकरणी १५० ते २०० जणांच्या विरोधात सहकार नगर पोलिस स्थानकात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. माधव हनुमंत वाघाटे या सराईत गुन्हेगाराच्या अंत्यविधीला दुचाकी रॅली काढण्यात आली होती.
सिद्धार्थ पलंगे, कुणाल चव्हाण, सुनील खाटपे, अमित खाटपे, सौरभ भगत, राजकुमार परदेशी, ऋषीकेश भगत, गणेश फाळके याच्यासह साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक हरिश्चंद्र केंजळे यांनी फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार टोळक्याने शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास सराईत माधव वाघाटे याचा खून केला होता. त्यानंतर शनिवारी दुपारी १२-३० वाजेच्या सुमारास त्याच्यावर कात्रज स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार होते. त्यामुळे १०० ते १२५ जणांनी दुचाकीवरून रॅली काढली. टोळक्याने बालाजीनगर ते धनकवडी आणि कात्रज स्मशानभूमीपर्यंत विना परवानगी रॅली काढून शांततेचा भंग केला. कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर मिरवणूक आणि रॅली काढण्यास बंदी असतानाही, टोळक्याने रॅली काढल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोरोना नियमावलीचे आदेश झुगारून अंत्यविधीला १०० ते १२५ जणांनी दुचाकी रॅली काढल्याचे दिसून आले आहे. सीसीटीव्ही फुटेजमधील दुचाकींचे क्रमांक शोधून आरोपींचा शोध घेतला जात असल्याचे सहकानगर पोलीस स्थानकाचे पोलिस उपनिरिक्षक बि.एस.खेंगरे यांनी म्हटले आहे...
0 टिप्पण्या