💥जिंतुरचे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक अर्जुन पवार यांनी पत्रकारास एकेरी भाषा वापरून केले अपमानीत💥
परभणी (दि.२० मे २०२१) - जिल्ह्यातील जिंतूर येथील पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक अर्जुन पवार यांना पत्रकारास एकेरी भाषा वापरून अपमानीत केल्या बद्दल निलंबित करून त्यांच्यावर कार्यवाही करावी, अशी मागणी तालुक्यातील मराठी पत्रकार संघाच्या वतीने गुरुवार दि. २० मे रोजी करण्यात आली.
जिंतूर येथे दि. १८ मे रोजी अण्णाभाऊ साठे चौकात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अर्जुन पवार यांनी एका तरुण ईसमास मारहाण केल्याचे प्रकरण घडले होते. याबाबतचे वृत्त प्रकाशित करण्यासाठी बालाजी शिंदे यांनी या अधिकाऱ्यास भ्रमणध्वनी मार्फत संपर्क साधला होता. पवार यांनी शिंदे यांना व्यवस्थितपणे माहिती देणे अपेक्षित असताना त्यांनी सरळ एकेरी भाषेचा वापर करत पत्रकार शिंदे यांना अपमानित केले. या प्रकारामुळे जिंतूर तालुक्यात व ईतर ठिकाणच्या पत्रकारांमधून तीव्र भावना व्यक्त होत होत्या.जिंतूरच्या तालुका पत्रकार यांच्या वतीने गुरुवार दि २० मे रोजी सहाय्यक पोलिस अधिक्षक श्रवण दत्त यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अर्जुन पवार यांना निलंबित करून योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली आहे.
या निवेदनावर तालुका कार्यकारिणीचे अध्यक्ष गजानन चौधरी, कार्याध्यक्ष शहजाद पठाण, सचिव गुणीरत्न वाकोडे,एम ए माजिद, शेख शकील, शेख वाजिद, प्रदीप कोकडवार, अकबर सिद्दिकी, रफिक तांबोळी, बालाजी शिंदे, एम एजाज आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
*********************************************
💥पत्रकार यांना एकेरी भाषा वापरून अपमानित करणे हे चुकीचे असल्याने पवार यांच्यावर योग्य ती कार्यवाही केल्या जाईल...!
💥सहाय्यक पोलिस अधिक्षक श्रवण दत्त यांचे पत्रकारांना आश्वासन💥
या घटनेतील इसम हा शेतकरी नव्हता. तो इसम सायंकाळच्या बाजारात आलेला होता. तसेच त्याने पवार यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. सार्वजनिक ठिकाणी अशाप्रकारे पोलिसांची प्रतिष्ठा मलीन करणे योग्य नाही. तसेच पत्रकार यांना एकेरी भाषा वापरून अपमानित करणे हे चुकीचे असल्याने पवार यांच्यावर योग्य ती कार्यवाही केल्या जाईल, असे मत सहाय्यक पोलिस अधिक्षक श्रवण दत्त यांनी बोलताना व्यक्त केले.
*********************************************
💥पोलीस अधिकाऱ्यावर कार्यवाही आवश्यक - गजानन चौधरी अध्यक्ष : मराठी पत्रकार संघ,जिंतूर
पत्रकार यांनी माहितीसाठी फोन केला असता माहिती देणे किंवा या विषयी वरिष्ठांशी बोलण्याचे सांगणे पवार यांच्याकडून अपेक्षित होते परंतु त्यांनी असे न करता पदाचा गैरवापर करत पत्रकार शिंदे यांना अपमानीत केले. त्यामुळे त्यांच्यावर कार्यवाही होणे आवश्यक आहे. पत्रकारांना आपमानित करण्याच्या अशा प्रकारच्या घटना भविष्यात घडल्यास पत्रकार संघ दत्त बसणार नाही,असे मत पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष गजानन चौधरी यांनी मांडले.
0 टिप्पण्या