💥पालम पोलिस स्थानकात नऊ जणांवर गुन्हे दाखल💥
पालम (दि.२२ मे २०२१) : दोन गटातील भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर दगडफेक करून मारहाण केल्याची गंभीर घटना पालम तालुक्यातील कापसी येथे घडली. या प्रकरणी पालम पोलीस ठाण्यात २२ मे २०२१ रोजी ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कापसी गावात 21 मे रोजी रात्री आठ वाजेच्यासुमारास दोन गटांमध्ये भांडण झाले होते. ते सोडविण्यासाठी कापसी येथील काही ग्रामस्थांनी पोलिसांना पाचारण केले. तेव्हा फौजदार विनोद साने व पोलिस नायक बलभीम पोले हे वाहन घेऊन कापसी गावात दाखल झाले. तेंव्हा पोलीस विचारपूस करीत असताना देखील पोलिसांसमोरच एका गटाने दुसऱ्या गटातील ऐका इसमास मारहाण सुरू केली. ही मारहाण सोडविण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. परंतु 'तू इथे का आलास, आम्हाला का विचारतोस, असे म्हणत आरोपींनी लाठ्या-काठ्यांनी पोलिस नायक बलभीम पोले यांना मारहाण सुरु केली. त्यातील एका आरोपीने 'तूला खतमच करतो', असे सांगून बलभीम पोले यांच्या डोक्यात दगड मारला. त्यामुळे श्री. पोले यांच्या डोक्यातून रक्तस्त्राव सुरू झाला. ते पाहून फौजदार विनोद साने जमावाची पांगवापांगव केली. त्यांनी जमावाच्या गराड्यातून कसेबसे श्री. पोले यांना गाडीत बसवून पालम ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी येथे प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी त्यांना नांदेड येथे पाठवून दिले. मारहाणीत श्री. पोले यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून चार टाकेही पडले आहेत. तद्नंतर श्री. पोले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कलम 307, 353, 332, 341, 143, 147, 148, 149 आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम 135 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यात आरोपी (सर्व रा.कापसी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फौजदार विनोद साने अधिक तपास करीत आहेत. तूर्तास आरोपी फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत....
0 टिप्पण्या