💥नवामोंढा ठाण्यात दिलेल्या तक्रारीत पाटील यांच्या आर्थिक गैर व्यवहार प्रकरणात गुन्हे दाखल करावेत अशी मागणी💥
परभणी (दि.१९ जुन २०२१) : येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठा अंतर्गत तत्कालीन कुलसचिव रणजित अण्णासाहेब पाटील यांनी बेकायदेशीरपणे वेतनश्रेणी वाढवून, उचलून शासनाची २१ लाख ४ हजार २९५ रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी येथील नवामोंढा पोलिस स्थानकात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने एक लेखी स्वरूपात तक्रार दाखल करण्यात आली असून या तक्रारीत पाटील यांच्या आर्थिक गैर व्यवहार प्रकरणात तात्काळ गुन्हे दाखल करावेत अशी मागणी करण्यात आली आहे.
या संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर ढगे, भास्करराव खटींग, दिगांबरराव पवार, केशव आरमळ या चौघांनी आज शनिवार दि.१९ जुन २०२१ रोजी दाखल केलेल्या या तक्रारीत कुलसचिव या पदी पाटील हे सन २०१८ पासून कार्यरत होते. मूळ वेतनश्रेणी, वेतनभत्ते, रजा, प्रवास, वैद्यकीय सेवा, सवलती इत्यादी नियम लागू असतांना पाटील यांनी पदाचा दुरुपयोग करीत बेकायदेशीरपणे व बनावट कागदपत्रांच्या आधारे सेवेत लागू नसणारे वेतनश्रेणी ३७४००-६७००० ग्रेड वेतन ८७०० ही वेतनश्रेणी २२ ऑक्टोबर २०१८ पासून बेकायदेशीरपणे उचलली. त्याद्वारे कृषि विद्यापीठासह शासनाची तब्बत अडीच वर्ष शुध्द फसवणूक केली.२१ लाख ४ हजार २९५ रुपये एवढी रक्कम पाटील यांनी उकळली असून त्यामुळे त्यांच्या विरोधात विद्यापीठासह शासनाची फसवणूक केल्याबद्दल तात्काळ गुन्हे दाखल करावेत, असे या तक्रारकर्त्यांनी नमूद केले आहे. या प्रकरणात विद्यापीठ नियंत्रकांनी कार्यकारी परिषदेच्या सदस्यांनी २८ मे २०२१ रोजी तक्रार केल्यानंतर दखल घेतली. तोपर्यंत सर्व प्रशासकीय अधिकारी यांनी संगनमत करुन कुलसचिव पाटील यांना अपहारातून वाचविण्यासाठी प्रयत्न केला. ११ जून रोजी नियंत्रकांनी अपहाराची रक्कम भरुन घेण्याकरीता बेकायदेशीररीत्या पत्र दिले. त्या पत्राच्या आधारे पाटील यांनी बेकायदेशीररीत्या अपहाराची रक्कम शासन खाती जमा केली. एकूण हे प्रकरण शुध्द फसवणूकीचा प्रकार आहे, असे या तक्रारकर्त्यांनी नमूद केले.
दरम्यान, या संघटनेने दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे नवामोंढा पोलिस संबंधित तत्कालीन कुलसचिव पाटील यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करणार की नाही, या कडे सर्व क्षेत्राचे लक्ष लागले आहे.
0 टिप्पण्या