💥केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या हस्ते उद्या सोमवार दि.३० ऑगस्ट रोजी उदघाटन💥
✍️ मोहन चौकेकर
औरंगाबादः दि. २९, भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या वृत्त विभागाच्यावतीने दि. ३ सप्टेंबरपासून आजादी का अमृत महोत्सव व्याख्यानमाला सुरू करण्यात येत आहे. या व्याख्यानमालेचे सोमवार दि. ३० ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांच्या हस्ते होत आहे. खासदार सय्यद इम्तियाज जलील यांची यावेळी विशेष उपस्थिती राहणार आहे.
इंग्रजाचे देशात आगमन झाल्यापासून स्वातंत्र्य मिळेपर्यंतचा संपूर्ण भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास या व्याख्यानमालेतून जनतेपर्यंत पोहोचवला जाणार आहे. त्याचबरोबर स्वातंत्र्य प्राप्तीनंतर देशाने विविध क्षेत्रात केलेल्या प्रगतीचाही आढावा या व्याख्यानमालेतून घेतला जाणार आहे. जवळपास १०० भागांची ही व्याख्यानमाला राहणार असून आठवड्यातून दोन दिवस तिचं आकाशवाणी औरंगाबाद केंद्रावरून प्रसारण होईल. दर मंगळवारी आणि शुक्रवारी संध्याकाळी ६ वाजून ३५ मिनिटांनी प्रसारीत होणारी हा व्याख्यानमाला पुढील स्वातंत्र्य दिन दि. १५ ऑगस्ट २०२२ पर्यंत चालणार आहे.या व्याख्यानमालेत मराठवाड्यासह राज्यातील इतिहासाचे अभ्यासक, तत्त्ववेत्ते आणि चिंतक सहभागी होऊन वेगवेगळ्या विषयांवर व्याख्यान देणार आहेत. सर्व व्याख्यानाचा ऑडिओ हा ‘आकाशवाणी समाचार औरंगाबाद’ या युट्यूब चॅनलवरदेखील उपलब्ध असणार आहे. ज्यांना रेडिओवर ऐकणे शक्य नाही, त्यांना या सुविधेचा लाभ घेता येईल. श्रोत्यांनी या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्यावतीने करण्यात आले आहे.
याच कार्यक्रमात औरंगाबादच्या वृत्तविभागाला ४० वर्ष पुर्ण झाल्यानिमित्त काढण्यात आलेल्या ‘अवलोकन चाळिशीचे’ या ई- पुस्तकाचे प्रकाशन मंत्री डॉक्टर भागवत कराड यांच्या हस्ते होणार आहे. गेल्या ४० वर्षांत आकाशवाणीच्या वृत्त विभागात कार्य केलेल्या लोकांनी सांगितलेल्या आठवणी या ई पुस्तकात संकलित करण्यात आलेल्या आहेत.....
✍️ मोहन चौकेकर
0 टिप्पण्या