💥पुर्णेतील व्यापार पेठेवर मंदीचे सावट ; व्यापारी त्रस्त अनेक व्यापारी इतरत्र स्थलांतर करण्याच्या तयारीत...!


✍🏻परखड सत्य ;- चौधरी दिनेश (रणजीत)


💥तालुक्यातील अनेक जिल्हा परिषद सर्कल मधील ग्राहकांनी फिरवली पुर्णेतील बाजारपेठेकडे पाठ💥


पुर्णा शहरातील व्यापारपेठ काही दशकापुर्वी ग्राहकांनी अत्यंत गजबजलेली व्यापारपेठ होती संबंधित बाजारपेठेत किराणा,कपडा तसेच सोन्याच्या खरेदी-विक्रीतून रोज लाखों रुपयांची उलाढाल होत होती संपूर्ण मराठवाड्यात रेल्वेचे सर्वात मोठे जंक्शन असलेल्या पुर्णा रेल्वे स्थानक परिसरात अनेक रेल्वेची महत्वाची कार्यालय कार्यान्वित होती त्यामुळे रेल्वे कर्मचाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात असलेल्या संख्येमुळे त्या काळी व्यापारपेठेत रोज लागणाऱ्या अत्यावश्यक वस्तूंच्या खरेदी-विक्रीसाठी रेल्वे कर्मचाऱ्यांना पुर्णेच्या व्यापारपेठे शिवाय पर्याय नव्हता परंतु कालांतराने असंघटीत व्यापारी अकार्यक्षम लोकप्रतिनिधी व संधीसाधू नौकरशाहांमुळे रेल्वेचे गतवैभव संपुष्टात येऊन येथील हक्काचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालय (डिआरएम अॉफीस) तसेच रेल्वेची अन्य महत्वाची कार्यालय नांदेड येथे स्थलांतरीत करण्यात आली त्यामुळे पुर्णा रेल्वे स्थानक व रेल्वे परिसर रेल्वे कर्मचाऱ्यांअभावी ओस पडले त्यामुळे सदैव गजबजलेल्या पुर्णेच्या व्यापारपेठेवरही याचा दुष्परिणाम झाल्याचे निदर्शनास येत आहे.


राज्यातील राज्य सरकार असो की केंद्रातील केंद्र सरकार प्रत्येक शासनकर्त्यांनी परभणी जिल्ह्यावर सातत्याने अन्याय केल्याचेच निदर्शनास येते कारण या जिल्ह्यातील जनमतातून निवडून येणाऱ्या प्रत्येक लोकप्रतिनिधीला स्वतःच्या हक्क आणि कर्तव्याची जाणीव कधीही झालीच नाही असे म्हणणे यत्किंचितही चुकीचे ठरणार नाही जिल्ह्यातील मतदारांनी लोकसभा असो की विधानसभा आपणे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवडून दिलेल्या  लोकप्रतिनिधींनी जनसामान्यांच्या अधिकारासाठी आपआपल्या परिने कधीही लोकसभेत किंवा विधासभेत आवाज उठवलाच नाही त्यामुळे संबंधित मतदार संघातील जनता वेळोवेळी आपल्या हक्कापासून वंचित राहिली जिल्ह्याच्या विकासात भर टाकण्यासाठी नव्याने काही मिळवण्यात तर या जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना यश आलेच नाही उलट जे अगोदरपासून होते ते सुध्दा वाचवता आले नाही याचा सर्वात मोठा फटका जिल्ह्यातील एकमेव सधन तालुका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुर्णा तालुक्याला बसल्याचे निदर्शनास येत आहे.


पुर्णा तालुक्यातून वाहणाऱ्या गोदावरी-पुर्णा नद्यांमुळे कृषीप्रधान तालुका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या तालुक्याच्या वैभवात अधिक भर म्हणून येथे असलेली रेल्वेची अनेक महत्वाची कार्यालय या तालुक्यातील व्यापारपेठेचा आत्मा होती असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही परंतु येथील हक्काचा विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालय नांदेड येथे उभारण्यात आले तसेच येथील रेल्वेची अनेक महत्वाची कार्यालय नांदेड येथे स्थलांतरीत केली जात असतांना येथील असंघटीत व्यापारी अकार्यक्षम लोकप्रतिनिधी संधीसाधू तथाकथित समाजसेवक व विविध राजकीय पक्षाच्या पदांची ढाल बनवून आपल्या अनैतिक व्यवसाय सुरक्षितपणे चालवणारे पक्ष पदाधिकारी 'तुका म्हणे उभे राहावे जे जे होईल ते ते पाहावे' या आवेशात वावरल्याने संपूर्ण तालुक्याची पाहता पाहता वाट लागली स्वतः पुढाकार घेऊन काहीच करायचे नाही अन् जनसामान्यांनी उठाव केला की त्या उठाव करणाऱ्या जमावासमोर उभे टाकून संपूर्ण आंदोलन कँप्चर करायचे अन् मग स्वतःचा स्वार्थ साधायचा मग क्र्यु-बुकींग लॉबी स्थलांतराच्या विरोधातील आंदोलन कसो की कत्तल खाण्याविरोधातील आंदोलन असो जनसामान्यांनी केलेल्या आंदोलना नंतरही आपल्या पदरात काहीतरी पडेल हिच मुळ अपेक्षा ? यांच्या संधीसाधू अपेक्षांमुळे तालुक्यातील जनसामान्यांची सातत्याने उपेक्षाच होतांना दिसत आहे.

परभणी जिल्ह्यात औद्योगिक क्षेत्रात,कृषी क्षेत्रात,व्यापार क्षेत्रात सर्वात आघाडीवर असलेला पुर्णा तालुका आज या तिन्ही क्षेत्रात पिछाडीवर गेल्याचे निदर्शनास येत असून पुर्णेतील अत्यंत गजबजलेली व्यापारपेठ आता मात्र हळुवारपणे ओस पडत चालल्याचे दिसत असून तालुक्यातील ग्रामीण भागातील ग्राहक वर्ग आता हळुवारपणे विभागला जात असून तालुक्यातील चुडावा जिल्हा परिषद सर्कल मधील अनेक गावातील ग्राहकवर्ग आता वसमत-नांदेड व्यापारपेठेकडे तर कावलगाव जिल्हा परिषद सर्कल मधील अनेक गावांतील ग्राहकवर्ग नांदेड व्यापारपेठेकडे तर एरंडेश्वर जिल्हा परिषद सर्कल मधील अनेक गावातील ग्राहकवर्ग वसमत-परभणी व्यापारपेठेकडे तर ताडकळस जिल्हा परिषद सर्कल मधील अनेक गावातील ग्राहकवर्ग ताडकळस-पालम-परभणी व्यापारपेठेकडे तर वजूर जिल्हा परिषद सर्कल मधील अनेक गावातील ग्राहकवर्ग पालम-परभणी व्यापारपेठेकडे वळल्यामुळे याचा परिणाम सुध्दा पुर्णा व्यापारपेठेवर झाला असून एकमेव गौर जिल्हा परिषद सर्कल व आसपासच्या मोजक्या गावांतील ग्राहकवर्गाच्या भरवस्यावर पुर्णा व्यापारपेठेचे भविष्य टिकून असल्याचे निदर्शनास येत असून पुर्णा व्यापारपेठेतील व्यापारी आता हळुवारपणे येथून इतरत्र स्थलांतरीत होण्याच्या तयारीत असल्यामुळे या कधीकाळी ग्राहकांच्या वर्दळीमुळे अत्यंत गजबजलेल्या व्यापारपेठेस उतरतीकळा आली आहे......

✍🏻परखड सत्य ;- चौधरी दिनेश (रणजीत)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या