💥जनतेच्या प्रश्‍नांसाठी कोणत्या नेत्याने कधी बंड केले का ? - डॉ. बालाजी जाधव


💥बंडाचे खरे कारण हे आर्थिक आहे हे देशातील लोकांच्या केव्हाच लक्षात आलेले आहे💥

     बांधवांनो सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये किती मोठा गदारोळ चालू आहे हे आपण सर्वजण पाहतच आहोत. सत्ताधारी शिवसेनेच्या तब्बल  ४० पेक्षा जास्त आमदारांनी आपल्याच पक्षाच्या नेतृत्वाविरोधात बंड केले आहे. या सर्वांचे म्हणणे आहे की आम्हाला बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाप्रमाणे सरकार चालवायचे आहे. त्यासाठी केवळ आणि केवळ भाजपाशीच युती झाली पाहिजे. खरेतर हे बंडखोर (हरामखोर नव्हे ) आमदार क्षणा क्षणाला आपल्या बंडाचे कारण बदलत आहेत  कधी म्हणतात उद्धव ठाकरे हे आमदारांना भेटतच नाहीत तर कधी म्हणतात की आदित्य ठाकरे यांचा हस्तक्षेप जास्त वाढला आहे. कधी म्हणतात की काँग्रेस- राष्ट्रवादीच्या आमदारांना आमच्यापेक्षा जास्त आणि लवकर निधी मिळतो. तर कधी म्हणतात की भ्रष्ट अशा लोकांशी युती करू नका. त्यातल्या त्यात जास्त चर्चेत आलेले कारण म्हणजे उद्धव ठाकरे यांना म्हणे बाळासाहेब ठाकरे यांना अभिप्रेत असणारे हिंदुत्व जपता आलेले नाही. अर्थात ही सर्व कारणे तकलादू आणि जनतेच्या डोळ्यात धूळफेक करणारी आहेत. खरे कारण हे आर्थिक आहे हे देशातील लोकांच्या केव्हाच लक्षात आलेले आहे. 

खरेतर गेल्या पंचवार्षिकला हे आमदार आज ज्या भाजपाला हिंदुत्वाचे एकमेव रक्षक मानत आहेत त्यांच्या सोबतच सत्तेत होते. परंतु भाजपावाल्यांनी आणि मी पुन्हा येईन म्हणणाऱ्यानी यांची अशी काही खाज मिटवली की त्यातूनच हे आजचे दिशाहीन महविकास आघाडी सरकार अस्तित्वात आले. खरेतर कोणताही पक्ष स्पष्ट बहुमतात नसल्याने कुणाशी तरी युती करणे आणि कुणाला तरी दूर लोटणे हे नैसर्गिकच होते. अशी युती करताना आपापल्या पक्षांचे अस्तित्व, विचारधारा अबाधित राखून काही ' common minimum programme ' ठरवतच युती होत असते. भलेही ती युती हिंदुत्वाचा ठेका घेतलेल्या भाजपा सोबत होत असेल तरीही. आणि मागच्या पंचवार्षिकला भाजपाच्या सनातनी हिंदुत्वाने तोंड पोळल्यानंतर सेना नेतृत्वाने महा विकास आघाडीचे दूध सुद्धा फुकूनच पिण्याचे धोरण ठरवले होते. हे करत असताना आपल्या हिंदुत्वात आणि भाजपाच्या हिंदुत्वात किती फरक आहे हे सांगताना उद्धव ठाकरे यांनी चक्क सभागृहात ' आपले हिंदुत्व हे शेंडी आणि जाणव्याचे नाही ' हे देशाला ठणकावून सांगितले आणि आपण प्रबोधनकार ठाकरे यांचे वारस आहोत याची जाणीव देशाला करून दिली. उद्धव ठाकरे यांनी सांगितलेले हेच हिंदुत्व शिवसेना असे नामकरण करणाऱ्या प्रबोधनकार ठाकरे यांना सुद्धा अभिप्रेत होते. नव्हे त्यांचे संपूर्ण आयुष्य याच हिंदुत्वासाठी लढण्यात खर्ची पडले होते. प्रबोधनकारांचा हाच विचार पूर्णपणे नसला तरी काठाकाठाने का होईना बाळासाहेब ठाकरे यांनी पुढे चालवला. एका मुखतीत बाळासाहेबांनी मी संघाच्या शाखेत कधीही गेलो नाही याची कारणमीमांसा केलेली आहे. ही मुलाखत समाज माध्यमात आजही उपलब्ध आहे. हिंदुत्वाच्या खाजेने बेजार झालेल्या बंडखोर (हरामखोर नव्हे) आमदारांनी बाळासाहेबांची ही मुलाखत आसामच्या पंचतरांकित (?) हॉटेलमध्ये आजूबाजूला असलेल्या झाडी, डोंगर यांचा आस्वाद घेत घेत नक्की ऐकावी.

बाळासाहेबांच्या लेखी भाजपाची काय किंमत होती हे सांगणारे एक व्यंगचित्र सुद्धा उपलब्ध आहे. त्यात युतीची बोलणी करण्यासाठी प्रमोद महाजन हे मातोश्रीवर येतात. बाळासाहेब त्यांच्या सिंहासनावर विराजमान आहेत. त्यांनी आपले दोन्ही पाय समोरच्या खुर्चीवर ठेवलेले आहेत आणि बाजूला एक अत्यंत छोटा स्टूल ठेवलेले आहे. समोर आलेल्या प्रमोद महाजनांना बाळासाहेब आपल्या अंदाजात ' या बसा ' म्हणत आहेत. बाळासाहेबांनी आपले दोन्ही पाय समोरच्या खुर्चीवर ठेवलेले असल्याने प्रमोद महाजनांना बसण्यासाठी छोटासा स्टूल सोडला तर अक्षरशः कोणतीही जागा उपलब्ध नाही. यावरून बाळासाहेबांच्या लेखी भाजपाची आणि त्यांच्या हिंदुत्वाची काय किंमत होती हे या व्यंगचित्रातून अधोरेखित होते. ते सुद्धा या आमदारांनी डोंगर, झाडी, हॉटेल, यांचा आस्वाद घेण्यातून वेळ भेटला तर नक्कीच डोळ्याखालून घालावे. म्हणजे यांना बाळासाहेबांना नेमके कोणते हिंदुत्व अभिप्रेत होते आणि आजचे हे बंडखोर नेमके कोणत्या हिंदुत्वाची मागणी करत आहेत हे लक्षात येते. अर्थात त्यांनी पुढे केलेले हिंदुत्वाचे हे कारण फसवे आहे हे जनतेच्या सुद्धा केव्हाच लक्षात आलेले आहे. आणि राहिला प्रश्न बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा तर याच बाळासाहेबांनी शेवटच्या काही सभांमधून ' माझ्या उद्धवला सांभाळून घ्या ' अशी मागणी समस्त महाराष्ट्राला केलेली होती. त्यांच्या या आदेशाचे हे आमदार काय करणार आहेत? अर्थात स्वतःच्या वैयक्तिक आर्थिक सत्ता सुरक्षित ठेवण्यासाठी झालेल्या बंडाला हिंदुत्वाचे नाव देणे म्हणजे ' ताकाला जाऊन भांडे लपवण्याचा प्रकार होय. ' अशी सर्वत्र चर्चा आहे.

     दुसरी महत्वाची बाब म्हणजे राजकारणात एखादा कुत्रा हागला तरी तो आमच्या चाणक्यामुळेच हागला असे म्हणणारे अंधभक्त सध्या ' रुपयाला पाच मिळावेत ' एवढ्या स्वस्त दरात वाढलेले आहेत. (रुपये फेकले की आमदार सुद्धा विकत भेटतात असे सर्वत्र म्हटले जात आहे तेव्हा अंधभक्त काय चीज आहे?) तेव्हा अशा अंधभक्तांमुळे सध्या देशात शेंडीधारी चाणक्यांचेसुद्धा बेसुमार पीक आलेले आहे. विरोधी पक्षातील लोकांवर ' इडी ' केंद्रीय सारख्या संस्थांची टांगती तलवार ठेवायची आणि त्याला पक्षांतर करायला मजबूर करायचे असा सारा खेळ या चाणक्याच्या माध्यमातून खेळला जात असल्याचे दबक्या आवाजात बोलले जात आहे. त्या काल्पनिक चाणक्याने म्हणे अमुक अमुक संकल्प पूर्ण केल्याशिवाय शेंडीला गाठ बांधणार नाही अशी शपथ घेतली आणि आपल्या शेंडीला मोकाट सोडून दीले होते. तसे आजच्या तथाकथित चाणक्यांनी सुद्धा ' ईडी ' नावाची शेंडी सध्या मोकाट सोडल्याचे चित्र दिसून येत आहे. या लोकांची अशी गंमत आहे की दुसऱ्या पक्षात असला की इडी पाठवून बेजार करायचे आणि आपल्या पक्षात येण्याची चिन्हे दिसली की त्याच्या घराला केंद्रीय सुरक्षा पुरवायची. जर एखादी व्यक्ती ' इडी ' पाठवण्या एवढी भ्रष्ट असेल तर त्यालाच सुरक्षा पुरवणे हा देशद्रोह नव्हे काय? अर्थात असे प्रश्न पडणाऱ्या लोकांना हल्ली देशद्रोही म्हणून संबोधले जात आहे.

या लोकप्रतिनधींनी लक्षात घेतलं पाहिजे की कोणतेही सरकार, कोणतेही प्रशासन किंवा कोणतीही सत्ता ही लोकांच्या कल्याणासाठी, जनतेच्या कल्याणासाठी, त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी बहाल केली जाते. तुमचा पक्षीय अजेंडा काय आहे याच्याशी मतदारांना काहीही घेणेदेणे नसते. नसायला हवे. परंतु दुर्दैवानं 2014 पासून काहीही करून आपल्या पक्षाचा अजेंडा आहे तोच मुद्दामहून मोठ्या प्रमाणात राबविल्या जात आहे आणि त्याचाच प्रभाव स्थानिक पक्षांवर सुद्धा पडत आहे की काय अशी भीती सध्या वाटायला लागली आहे. खरं तर कोरोनाच्या कालखंडानंतर आपल्या समस्या खूप वाढलेल्या आहेत. काही नवीन गंभीर समस्या आपल्यासमोर निर्माण झालेल्या आहेत. आपली आर्थिक परिस्थिती खालावलेली आहे. महिन्याचं बजेट कोलमडलेले आहे. महागाई कधी नव्हे तेवढी वाढली आहे. रोजगाराच्या संधी बिकट होत चालल्या आहेत. शेतकऱ्यांना बोगस बियाणे आणि प्रचंड महाग खते याला तोंड द्यावे लागत आहे. शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागते की काय अशी परिस्थिती काही ठिकाणी उद्भवली आहे. शेतीला लागणारे बी-बियाणं खतं यांचे दर दुप्पट ते तिप्पट झाले आहेत. कोरोना मध्ये शिक्षणाचा संबंध संपल्यामुळे बऱ्याच मुलांसमोर शिक्षणाचा प्रश्न सुद्धा आ वासून उभा राहिलेला आहे. व्यापार, व्यवसाय यांचे सुद्धा प्रश्न प्रचंड मोठ्या प्रमाणात निर्माण झालेले आहेत. आणि असं असताना सुद्धा अशा जीवन मरणाच्या प्रश्नांविरोधात बंड करायचे सोडून  काही हरामखोर नेते मात्र स्वतःचा स्वार्थी अजेंडा पुढे रेटत आहेत. लोकांच्या डोळ्यांमध्ये धूळफेक करत आहेत. यांच्या हिंदुत्वाच्या नावामुळे खरंतर काही अंध भक्त सुखावतील सुद्धा परंतु खरा प्रश्न आहे तो आम्हाला आज कशाची गरज आहे ते ओळखण्याची.  खरंतर सत्तेमध्ये बसल्यानंतर लोकांचे प्रश्न अगदी चुटकीसरशी सोडवता येतात. परंतु लोकांच्या कल्याणासाठी कुठेही किंवा कोणत्याही आमदाराने बंड केल्याचे ऐकिवात नाही. राजकारणाचा या लोकांनी आखाडा करून टाकलेला आहे. परंतु हे सर्व टीव्हीवर आपण अतिशय मिटक्या मारत बघत असतो आणि नाक्यानाक्यावर याच्या चर्चा करत असतो. कुणी कुणाला कसे पाडले, कुणी कुणावर कशी कुरघोडी केली किंवा कोण कसा अस्सल चाणक्य आहे आणि तो कसा गावठी चाणक्य आहे अशा बाष्कळ आणि वायफळ गप्पा मारण्यामध्ये आम्ही आमचा वेळ आणि आयुष्य वाया घालवत असतो. परंतु एक लक्षात घ्या की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय संविधानाने आपल्याला हवे ते नेते निवडण्याचे आणि नको ते नेते घरी बसविण्याचा फार मोठा अधिकार बहाल केला आहे. परंतु दुर्दैव असा आहे की आम्हाला विकासाची भाषा करणारे, लोकांच्या कल्याणाची भाषा करणारे नेतेच आवडत नाहीत. उलट राजकीय सभांमध्ये कोपरखळ्या मारणे, टक्के-टोणपे ऐकवणे, एकमेकांची उणीदुणी काढने, मी याची कशी जिरवली आणि त्याने त्याची कशी जिरवली हे ऐकण्यामध्येच मतदार म्हणून  प्रचंड रस आहे. हेच आपल्या लोकशाहीचे दुर्दैव आहे. बाप तसा बेटा आणि कुंभार तसा लोटा असे म्हटले जाते. त्याप्रमाणे जसे मतदार तसे नेते म्हण्याची वेळ आता आलेली आहे. 

बांधवांनो लोकशाहीचे एक वैशिष्ट्य असते ते म्हणजे आपले नेते तसेच तयार होतात जशी जनता असते. म्हणून आज महाराष्ट्रात हे जे काही नाटक चालू आहे त्याला आपण मनोरंजन म्हणून न घेता गंभीरपणे घ्यायला हवे. ज्यांना लोकांच्या प्रश्र्नांशी घेणेदेणे नाही त्यांना घरी बसवलेच पाहिजे. या प्रस्थापित नेत्यांना घरी बसवायचा असेल तर आपण एक वेळ नोटाला मतदान करील पण अशा स्वार्थी नेत्यांना आणि त्यांच्या वारसदारांना आम्ही चुकूनही मतदान करणार नाही अशी शपथ आपण घेतली पाहिजे. बांधवांनो राजकारण ही सर्व समस्यांची गुरुकिल्ली आहे असं म्हटलं जातं. याठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचा एक किस्सा आठवतो. एकदा बाबासाहेब संसदेमध्ये अभ्यासमग्न बसलेले असताना पंडित नेहरूंनी त्यांच्या डोक्यावरची टोपी काढून बाबासाहेबांच्या डोक्यावर ठेवली. हे बाबासाहेब आंबेडकरांना आवडले नाही. त्यांनी पंडित नेहरूंना उत्तर दिलं की नेहरूजी राजकारण हे तुमच्यासाठी खेळ असेल परंतु माझ्यासाठी ते मिशन आहे. कारण या मुळे लाखो लोकांचे आयुष्य बदलू शकतो.  आज मात्र आपण राजकारणाच्या मिशनला खेळ करून टाकला आहे. नेते लुटुपुटूचा खेळ खेळत आहेत. कोट्यवधी रुपये गोळा करत आहेत. आणि आपण मात्र याकडे मनोरंजन म्हणून पाहत आहोत. आज सर्वांची परिस्थिती अशी आहे की आपल्या घरातला साधा एक मेंबर जर आजारी पडला तर भविष्यात किमान पाच वर्षाचं आपलं बजेट पूर्णपणे अस्थिर होऊन जाणार आहे अशी बिकट परिस्थिती ओढवली आहे. तरीसुद्धा आपण या राजकारणाच्या आखाड्याकडे मनोरंजन म्हणून पाहत असू तर निश्चितपणे आपले आणि येणाऱ्या पिढ्यांचे आयुष्य उध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही. 

म्हणून ज्या नेत्यांनी लोकशाहीचा खेळ मांडलेला आहे अशा नेत्यांना त्यांच्या त्यांच्या मतदारसंघात निवडणुकीत निश्चितपणे पराभूत केले पाहिजे. त्यांच्या वारसदारांना सुद्धा पराभूत केले पाहिजे. आणि त्यांच्या सहकार्यांना सुद्धा पराभूत केले पाहिजे. कारण बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की मी तुम्हाला मतदानाचा अधिकार दिलेला आहे. हा अधिकार प्रचंड मोठा आहे. खूप महत्त्वाचा आहे. याचे महत्त्व नीट समजून घ्या. त्याची किंमत मीठ मिरची एवढी क्षुल्लक समजू नका. 

बाबासाहेबांचा हा आदेश आपण लक्षात ठेवून आपल्या हातातील असलेला टीव्हीचा रिमोट बाजूला ठेवून  मतदानाचा अधिकार आणि त्याची ताकद ओळखून घेवू या आणि मस्तवाल, मुजोर, लोकांनाही न जुमानणाऱ्या प्रस्थापित नेत्यांना व त्यांच्या वारसदारांना घरी बसवूया. प्रत्येक पंचवार्षिकला नवीन नेतृत्व निर्माण करूया तर आणि तरच आपली लोकशाही वाचणार आहे. अन्यथा या लोकशाहीची माती झाल्याशिवाय राहणार नाही.


*@ डॉ. बालाजी जाधव, औरंगाबाद*

*मो. ९४२२५२८२९०*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या