💥पुर्णा शहरात कॉम्रेड अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक खुला मंच' उभारण्याची मागणी💥
पुर्णा (दि.१३ जुन २०२२) - येथील डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया या युवक संघटनेच्या तालुका व जिल्हा कमिटीकडून आज सोमवार दि.१३ जुन रोजी कॉम्रेड अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक खुला मंच उभारावा, शहीद भगतसिंग युवा मार्गदर्शन केंद्र व ज्योती-सावित्री अभ्यासकेंद्र सुरू करावे, तसेच शहरातील सार्वजनिक प्रसाधन गृहांची स्वच्छता ठेवावी व प्रसाधन गृहावर काम करत असलेल्या कामगाराला नगरपालिकेने पगार द्यावा त्याचबरोबर नागरिकांकडून सार्वजनिक प्रसाधन गृहात लघवीसाठी आकारल्या जाणारे शुल्क बंद करावे इत्यादी मागण्यांचे निवेदन नगरपालिकेला देण्यात आले.
कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांचे कला आणि साहित्यातील योगदान आपल्याला माहीतच आहे त्यामुळेच पूर्णा तालुक्यातील नागरिकांना-तरुणांना कला व साहित्याची गोडी लागावी आणि आपल्या इथे साहित्यिक कलावंत घडावेत यासाठी 'कॉ.अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक खुला मंच' पूर्णा शहरात उभारण्यात यावा त्यासोबतच युवक हा आपल्या देशाचा कणा आहे तो राष्ट्राच्या उभारणीत उपयोगी पडावा चुकीच्या मार्गावर जाऊ नये, त्याला योग्य दिशा मिळावी, करिअर व इतर भविष्यासंदर्भातील संधी त्याला उपलब्ध व्हावी यासाठी तरुणांचा आदर्श असलेल्या भगतसिंगाच्या नावे 'भगतसिंग युवा मार्गदर्शन केंद्र' निर्माण करण्यात यावा, त्यासोबतच भरकटत चाललेल्या समाजाला खास करून तरुणाईला शिक्षण व अभ्यासाच्या मार्गाला लावण्यासाठी ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या सामाजिक-शैक्षणिक कार्याचा आदर्श घेत त्यांच्या नावे 'ज्योती-सावित्री अभ्यास केंद्र' सुरू करावे अशाप्रकारच्या मागणीचे निवेदन देण्यात आले आहे. या व्यतिरिक्त पूर्णा शहरातील सार्वजनिक प्रसाधनगृह अतिशय दुर्गंधीत आहेत त्यांना स्वच्छ करावे, त्यांच्या आसपासचा पूर्ण परिसर स्वच्छ करावा आणि प्रसाधनगृहावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना नगरपालिकेतर्फे पगार देण्यात यावा व काही प्रसाधनगृहात लघवीसाठी आकारण्यात येणारा शुल्क बंद करण्यात यावा अशा मागण्याचे निवेदनही डी वाय एफ आय च्या वतीने नगरपालिका पूर्णा प्रशासनास देण्यात आले.
या मागण्या त्वरित पूर्ण झाल्या नाहीतर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा सुद्धा देण्यात आला. निवेदनांवर जिल्हासचिव नसीर शेख, जिल्हाउपाध्यक्ष अमन जोंधळे, तालुका सहसचिव अजय खंदारे, शहराध्यक्ष सुमित वेडे, शहरसचिव संग्राम नजान, शुभम गायकवाड आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.....
0 टिप्पण्या