💥4 लाख तिरंगा ध्वजाचे केले जात आहे नियोजन💥
जिंतूर प्रतिनिधी / बी.डी. रामपूरकर
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त संपूर्ण परभणी जिल्हा “हर घर तिरंगा” व “स्वराज्य महोत्सव” या विशेष मोहिमेसाठी सज्ज झाला असून जिल्हा प्रशासनातर्फे सुक्ष्म नियोजनावर भर दिला जात आहे. ध्वज संहितेच्या सर्व नियम आणि अटींचे काटेकोर पालन करुनच हा उपक्रम उत्सव म्हणून साजरा करावा, अशा सूचना जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवातंर्गत ‘हर घर तिरंगा’ मोहिमेच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी आंचल गोयल ह्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे, मनपा आयुक्त देविदास पवार, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पं.) डॉ. संदिप घोन्सीकर उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्रीमती गोयल म्हणाल्या की, भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर देशभर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याच उपक्रमाचा एक भाग म्हणुन ‘हर घर तिरंगा’ हे उपक्रम देखील मोठ्या प्रमाणात राबविण्यात येत आहे. ‘हर घर तिरंगा’ या उपक्रमांतर्गत सर्व शासकीय-निमशासकीय व खाजगी संस्था, सहकारी संस्था, शैक्षणिक संस्था तसेच जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांनी आपापल्या घरावर स्वयंस्फूर्तीने राष्ट्रध्वज उभारण्यासाठी सहभागी व्हावे.
हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी ध्वज संहितेच्या नियमानुसार राष्ट्रध्वज मुबलक उपलब्ध होईल याचे संबंधित यंत्रणेने आतापासूनच नियोजन करावे. तसेच राष्ट्रध्वज विक्रीकरिता जिल्ह्यात विक्री केंद्र उपलब्ध करुन देण्याबरोबरच या केंद्रांना ध्वजाचा आकार, ध्वजाचे वितरण, ध्वज संहितेचे नियम व अटींचे पालन करण्याबाबतच्या अन्य अनुषंगिक बाबींच्या सूचना देण्यात याव्यात. भारतीय ध्वजसंहितेचे पालन व्हावे व अजाणतेपणी राष्ट्रध्वजाचा अवमान होणार नाही, तसेच प्लास्टिक बंदी असल्यामुळे प्लास्टिकचा ध्वज वापरण्यात येऊ नये. याची दक्षता घेण्याबाबत नागरिकांमध्ये जाणीवजागृती करावी. तसेच जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांना तिरंगा स्वच्छेने विकत घेवून आपल्या घरावर लावण्यासाठी प्रेरित करावे.
11 ते 17 ऑगस्ट, 2022 या कालावधीत ‘हर घर तिरंगा’ आणि 9 ते 17 ऑगस्ट 2022 या कालावधीत ‘स्वराज्य महोत्सव’ या उपक्रमात जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी केले.
या बैठकीस सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी, सर्व विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते....
0 टिप्पण्या