💥यावेळी स.मनबीरसिंघ ग्रंथी यांनी डॉ.पसरीचा यांना लक्षवेधी बाबींचे दिले निवेदन💥
नांदेड (दि.०२ जुलै) - बाबा फत्तेहसिंघजी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश कार्यकारणी सदस्य स.मनबीरसिंघ ब्रिजपाल सिंघ ग्रंथी यांनी गुरुद्वारा बोर्डाचे नवे प्रशासक डॉ. पी. एस. पसरीच्या यांचा सत्कार केला असून आवश्यक गोष्टींकडे लक्ष वेधण्यासाठी एक निवेदनही त्यांनी यावेळी दिले.
गत तीन वर्षात गुरुद्वारा बोर्डात घडलेल्या घटना आणि झालेला कारभार यांच्या पार्श्वभूमीवर हे निवेदन देण्यात आले आहे. यात, गुरुद्वारा बोर्डातर्फे शीख समाजातील विद्यार्थ्यांना दरवर्षी वजीफा अर्थात शैक्षणिक शिष्यवृत्ती दिली जाते. गत तीन वर्षापासून येथील विद्यार्थ्यांना हा वजीफा देण्यात आलेला नाहीये. हा वजिफा त्वरित प्रभावाने देण्यात यावा, तसेच येथील जे शिख विद्यार्थी परदेशात शिक्षण घेत आहेत त्यांना प्रत्येकी पाच लाख रुपये गुरुद्वारा बोर्डातर्फे देण्यात यावे, मागच्या भ्रष्ट गुरुद्वारा बोर्डाने महाराजा रणजीत सिंघजी यात्रीनिवास तोडले आहे. त्या जागेवर पुनश्च एकदा अत्याधुनिक सोयींनी युक्तअसे यात्रीनिवास बांधण्यात यावे. आवश्यकता भासल्यास ही कारसेवा अन्य कोणत्याही संत मंडळींना देण्यात यावी, गुरुद्वारा बोर्डातील 369 कर्मचाऱ्यांना पुढील मीटिंगमध्ये मान्यता देण्याच्या आशेवर सेवेत कायम करण्यात आले, या गोष्टीला मंजुरी देऊन बोर्डाच्या बजेटमध्ये या साठी प्रावधान करण्यात यावे, नांदेड आणि परिसरात हजार पेक्षा जास्त शीख युवक बेरोजगार आहेत. त्यांच्यासाठी नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यात याव्यात. तसेच त्यांच्यासाठी बोर्डाच्या वतीने नवीन दुकाने बांधून विना डिपॉझिट त्यांना देण्यात यावीत, सचखंड गुरुद्वारा बोर्डाची अंदाजे 250 एकर जमीन नांदेड शहराच्या विकासासाठी सरकार तर्फे अधिग्रहित करण्यात आलेली आहे. त्या जमिनीचा मोबदला शासनाने अद्याप गुरुद्वारा बोर्डाला दिलेला नाही. पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांच्याशी पत्रव्यवहार करून हा मावेजा त्वरित मिळवण्यासाठी प्रयत्न करावेत.नांदेड शहरात गुरुद्वारा बोर्डाची जी जमीन रिकामी आहे, त्यावर होणारे अतिक्रमण टाळण्यासाठी या संपूर्ण जमिनीला भिंतीचे कुंपण करण्यात यावे. गुरुद्वारा बोर्डाची 84 एकर जमीन एनटीसी मिलला लीजवर दिलेली आहे, तो करार 2022 साली संपुष्टात येत आहे, ती जमीन गुरुद्वारा बोर्डाने परत घ्यावी. या 84 एकर पैकी ज्या जमिनीवर अतिक्रमण करून घरे उभारण्यात आलेली आहेत,ती शासनाने पाडून ही जमीन गुरुद्वारा बोर्डास परत करावी, अन्यथा त्या घरांच्या एकूण जागे एवढी, बाफना रोडवरील शासनाची कापूस संशोधन केंद्राची जमीन गुरुद्वारा बोर्डाला देण्यात यावी. मागच्या भाजप शासनाने गुरुद्वारा बोर्डाच्या कायद्यात संशोधन करून जे कलम 11 आमच्यावर लादले आहे, ते तातडीने रद्द करण्यासाठी प्रयत्न करावेत.
वर्षातून दोन वेळा नांदेड गुरुद्वारा बोर्डाच्या वतीने जो सामूहिक विवाह मेळावा घेण्यात येतो, त्यात वधूवरांना दरबार साहेब मध्ये अखंड पाठ करण्याची तसेच या पाठाच्या समाप्तीच्या वेळी लंगर करण्याची परवानगी देण्यात यावी.गुरुद्वारा बोर्डाचे उत्पन्न वाढवण्यासाठी बारकाईने लक्ष देण्यात यावे. आपल्या मागच्या कार्यकाळात आपण बोर्डाच्या वतीने एकूण अडीचशे कोटी रुपयांच्या मुदत ठेवी ठेवल्या होत्या. पण मागच्या भ्रष्ट गुरुद्वारा बोर्डाने ह्या मुदत ठेवी तोडल्या आहेत. आपण आपल्या या वेळीच्या कार्यकाळात पुन्हा 100 पेक्षा अधिक कोटी रुपयांच्या मुदत ठेवी कराव्यात असे आमची आपल्या कडून अपेक्षा आहे. बोरबन फॅक्टरी येथील गुरुद्वारा बोर्डाच्या 44 एकर जमीनीचा विषय सन 2000 पासून हायकोर्टात प्रलंबित आहे.
त्या कडे लक्ष देणे आवश्यक असून गुरुद्वारा बोर्डाची अबचल नगर येथील 32 एकर जागा 2005 साली महापालिकेला देण्यात आली होती ,त्याचा मावेजा आज पर्यंत मिळालेला नाही. गुरुद्वारा साहिब मध्ये साफसफाई करण्यासाठी पूर्वीच्या बीव्हीजी कंपनी प्रमाणे कंपनीची स्थापना करण्यात यावी आणि त्यात पूर्वी बीव्हीजी कंपनी द्वारे साफसफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांना या नवीन कंपनीत घेऊन पूर्ववत कामावर घेण्यात यावे. गुरुद्वारा बोर्डातर्फे संचालित करण्यात येत असलेल्या सचखंड पब्लिक स्कूल साठी हक्काची इमारत नाही. त्याकरता या शाळेसाठी वेगळी इमारत आवश्यकतेनुसार बांधण्यात यावी.या सचखंड स्कूल मध्ये येथील गरीब शीख विद्यार्थ्यांना निःशूल्क शिक्षण देण्यात यावे इत्यादी महत्त्वाच्या बाबींचा उल्लेख आहे.या सर्व गोष्टींवर आपण बारकाईने लक्ष द्यावे, त्याचप्रमाणे स्थानिक समाजास विश्वासात घेऊन आपण या पुढील सेवेची वाटचाल करावी. त्यात येथील संपूर्ण संगत आणि आम्ही आपल्या सोबत आहोत असेही आश्वासित करण्यात आले आहे.
या निवेदनावर स.मनबीर सिंघ ग्रंथी यांच्याशिवाय जसपालसिंग लांगरी, बंदीछोडसिंग खालसा, प्रेमजित सिंग हरिसिंग शिलेदार, बीरेंद्रसिंग नारायणसिंग बेदी आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत....
0 टिप्पण्या