🌟राज्य अराजपत्रित गट ब, क ची सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा ३९ केंद्रांवर घेण्यात येणार...!


 🌟संयुक्त पूर्व परीक्षा रविवार दि.३० एप्रिल रोजी🌟

परभणी (दि.२७ एप्रिल) : राज्य अराजपत्रित,गट ब व क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा रविवार दि.३० एप्रिल २०२३ रोजी जिल्ह्यातील ३९ केंद्रांवर घेण्यात येणार आहे. जिल्ह्यातील १० हजार २८९ उमेदवारांची बैठक व्यवस्था या केंद्रांवर करण्यात आली आहे. त्यापैकी परभणी तालुक्यातील ३१ उपकेंद्रांवर ७ हजार ९६१ तर सेलू तालुक्यातील ८ उपकेंद्रावर २ हजार ३२८ उमेदवार परीक्षेला बसू शकतील,अशी बैठक व्यवस्था करण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल यांनी सांगितले. 

जिल्ह्यात रविवारी होणाऱ्या या परीक्षेसाठी निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांची जिल्हा केंद्र प्रमुख म्हणून जिल्हाधिकारी श्रीमती गोयल यांनी नियुक्ती केली असून, दहा समन्वय अधिकारी, दोन भरारी पथके, ३९ उपकेंद्रप्रमुख, १५७ पर्यवेक्षक, ४७३समवेक्षक, ८१ सहायक कर्मचारी आणि ७८ शिपाई नियुक्त केले आहेत.  

परीक्षा केंद्रावर गैरप्रकार टाळण्यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३चे कलम १४४ मधील प्राप्त अधिकाराचा वापर करुन परीक्षा केंद्राच्या १०० मीटर परिसरातील सर्व टेलीफोन, एसटीडी, भ्रमणध्वनी, आयएसडी, फॅक्स केंद्र, झेरॉक्स केंद्र व ध्वनिक्षेपक बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच प्रत्येक केंद्रावर चोख पोलीस बंदोबस्त राहणार आहे.  ही परीक्षा सकाळी ११ ते १२ वाजे दरम्यान होणार आहे. त्यासाठी उमेदवारांनी आपल्या केंद्रावर पेपर सुरु होण्याच्या किमान दिड तास म्हणजेच सकाळी ९:३० वाजेपर्यंत उपस्थित राहण्याच्या सूचना उमेदवारांच्या प्रवेशपत्रावर देण्यात आल्या आहेत.

उमेदवारांना परीक्षेत बॅग, मोबाईल फोन पेजर, इतर दूरसंचार साधने, इलेक्ट्रॉनिक उपकरणे अथवा दूरसंचारासाठी वापरण्यात येणारी कोणतीही संपर्क साधने, पुस्तके पेपर्स अथवा परिगणक  आदी साहित्य जवळ बाळगण्यास सक्त मनाई आहे. त्यामुळे असे कोणतेही साहित्य परीक्षेला येताना सोबत घेऊन येऊ नये. हे साहित्य सोबत बाळगल्यास त्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही, याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. उमेदवारांना परीक्षेला येताना प्रवेश पत्र, काळ्या शाईचा बॉलपेन, व फक्त एकच मूळ ओळखपत्र (आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड, वाहन परवाना) व त्या ओळखपत्राची एक झेरॉक्स प्रत सोबत आवश्यक आहे.

उमेदवारांकडून विविध मार्गाने करण्यात येणारे गैरप्रकाराचे प्रयत्न लक्षात घेता परभणी केंद्रावरील सर्वच उपकेंद्रावर सदरील परीक्षेकरिता खोलीनिहाय सी.सी.टी.व्ही. कॅमेरे लावण्यात येणार आहेत. त्यासाठी उमेदवारांनी त्यांच्या प्रवेशपत्रावर नमूद केलेल्या वेळेप्रमाणे परीक्षा केंद्रावर हजर राहावे. तसेच परीक्षा सुरु होण्याच्या किमान दीड तास आगोदर केंद्रावर उमेदवारांनी उपस्थित राहावे. सकाळी साडेदहा वाजेनंतर कोणत्याही उमेदवाराला केंद्रावर प्रवेश देण्यात येऊ नये, असे महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई यांनी कळविले आहे...


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या