🌟अन् प्रार्थनाला ७३ टक्के मार्कस मिळाले..एका शिक्षक मित्राचा फोन आला, त्यानं ‘अभिनंदन’ केलं🌟
✍️ राजेंद्र काळे
तो काळ अगदी सहज लिंगनिदानाचा, साध्या सोनोग्राफीच्या डबल रेटमध्ये ६०० ते ८०० रुपयात 'कळून' जायचे. २००० ते २०१० या दशकात सर्वाधीक स्त्रीभ्रृणहत्या झाल्या.. त्याही अगदी नॉर्मलपणे, गंमत अन् तेवढीच घृणास्पद बाब म्हणजे गर्भपात केल्यावर ‘मुलगीच होती..’ अशा अविभार्वात शासकीय गर्भपात मान्यता केंद्र नावाच्या दवाखान्यात लिंग दाखवल्या जायचे, आई-वडीलही खुश व्हायचे- मुलगीच होती ब्वॉ.. जणु काही ‘त्या’ काळात दुसरी मुलगी काढून फेकण्याला समाजमान्यता होती की काय ?
मला पहिली मुलगी झाली नोव्हेंबर २००० मध्ये, वय वाढत चाललं होतं आमचं.. मी पस्तीशीत असतांना मिसेसला दुसर्यांदा प्रेग्नंसी राहिली, वाटलं होतं पहिली मुलगी आहे आता दुसरा मुलगा व्हावा. तिसर्या महिन्यात नॉर्मल सोनोग्राफी केली, डॉक्टर मित्रच होते व त्यांनाही माहित होतं यांना पहिली मुलगी आहे. त्यांनी दुसरीही मुलगीच असल्याचे सहज सांगून टाकलं, अन् त्यावेळी दुसरी मुलगी कळल्यावर काढून टाकणं.. अगदी समाजमान्य असल्यासारखं सहज सुरु होतं. आम्ही फार काही कोणाला सांगितलं नाही, फक्त एका जवळच्या अधिकारी मित्राच्या फॅमिलीला हे माहित होतं. अर्थात तोही मित्र गर्भ काढून टाकण्याचाच सल्ला देत होता, तोही अगदी सहज!
पण आम्ही ठाम होतो, दिवस भरले.. गोडे हॉस्पीटलमध्ये गोड मुलगी जन्माला आली, ३० सप्टेंबरच्या मध्यरात्री. नंतर काही जवळच्या नातेवाईकांनी 'तुमच्यापेक्षा खेड्यातले शहाणे' असं आम्हाला हिणवलंही. बारसं झालं, पंचगावरुन नाव ठेवण्यात आलं.. मानसी. पण मला हे नाव ‘क्लिक’ होत नव्हतं. आयुष्यात प्रत्येक गोष्ट मिळण्यासाठी मला कमालीची ‘प्रतिक्षा’ करावी लागली, म्हणून पहिल्या मुलीचं नाव ठेवलं होतं ‘प्रतिक्षा’.. आता दुसरी मुलगी, तत्पुर्वी मुलगा व्हावा म्हणून देवाकडं ‘प्रार्थना’ केली होती.. पण मुलगी झाली म्हणून काय झालं? तिचं दुसर्यांदा नामकरण केलं ते ‘प्रार्थना’ म्हणून श्रीक्षेत्र शेगावला श्रीसंत गजानन महाराजांच्या समाधीपुढे, त्यावेळी दर्शनाचा भुयारी मार्ग होता.
कशासाठी हा मागोवा ?.. खरंतर काहीच गरज नाही. पण झालं काय, आज १२वीचा निकाल लागला.. अन् प्रार्थनाला ७३ टक्के मार्कस मिळाले.. एका शिक्षक मित्राचा फोन आला, त्यानं ‘अभिनंदन’ केलं पण मार्कस थोडे कमी पडले म्हणे.
मी पत्रकार, मुलांच्या शिक्षणाकडे फारसं लक्ष न देणारा. प्रार्थना मॅट्रीकला गेली, अन् कोरोना आला.. बोर्डाची परिक्षा न देता ती अकरावीत आली. भारत विद्यालयात सायन्सला प्रवेश घेतला, अकरावीचं वर्ष कोरोनातच गेलं.. अर्थात ते यावर्षी निकाल लागलेल्या सर्वांचंच गेलं. बारावीसाठी शाळेचे उन्हाळी वर्ग सुरु झाले, तिने ते केले नाही.. तिला विचारलं- ‘कुठं ट्युशन लावते का?’ तिने ‘नाही’ म्हटलं. दरम्यान आधी माझ्या आईची तब्येत बिघडली, ती ५ महिने बेडवर. घरी भेटीला येणारे सारखे सुरु.. नंतर आई गेली, जवळपास महिना गावी गेला. इकडे प्रार्थना ही तिची तिचाच अभ्यास करत होती, शाळेचे ‘पिरीयड’ तेवढेच केले.. बाकी तिची तीच शिक्षक अन् तीच विद्यार्थी.. गंमत नाही, पण मलाही आश्चर्य वाटायचं. खोटं नाही पण एखादेवेळी तिचा निकाल नापास आला असतातरी मला आश्चर्य वाटलं नसतं. कारण परिक्षा केंद्रही कमालीचं स्ट्रीक होतं, जिजामाता महाविद्यालय. तिथं बैठ्या भरारी पथकात माझे मित्र जिल्हा समाजकल्याण अधिकारी मेरत साहेब होते, पण मी त्यांची भेट घेतली- प्रार्थनाचे सर्व पेपर संपल्यावर.. ते गंमतीनं त्यांच्या स्टाईलमध्ये ‘अगोदर भेटायचं होतं राव’ असे म्हटले.
काल गुरुवारी निकाल आला, प्रार्थनाला ७२.८३ टक्के मार्कस मिळाले. हे पुर्ण मार्क तिच्या एकटीच्या मेहनतीचे. आमचा एक रुपयाही त्यावर ट्युशनसाठी खर्च न झालेला. अन् विशेष म्हणजे इंग्लिश मिडीयम असतांनाही तिला मराठीत ८९ मार्कस आहेत.प्रार्थना मार्क्समध्ये नक्कीच थोडी कमी राहीली असेल, अर्थात ‘भारत’च्या विद्यार्थ्यांच्या मार्कांचा रेश्यो असाच मागे-पुढे आहे.. कारण या शाळेत कस लागतो, अगदी सायन्सच्या प्रॅक्टीकलचे मार्कससुध्दा प्रयोगातील परफॉर्मन्स पाहूनच टाकल्या जातात. कॉपी हा विषय तर विद्यार्थ्यांना माहिही नसतो. पण चलो, मार्क्स खरंच ते कमी नाहीत, पण 'मार्क्स' कमी गृहीत धरलेतरी ‘गुण’ मात्र निश्चित जास्त आहेत.
म्हणून प्रार्थना
खूप खूप अभिनंदन..💐
*आठवलं म्हणून..
मुलांना घडविण्यासाठी पालकांचा आटापिटा दिसतोय सध्या सर्वत्र. मेडीकल-जेईई.साठी कोटा, अकोला, लातूर आता नव्याने नांदेड.. २ वर्ष अन् रिपीट मारलंतर ३ ते ४ वर्ष. अर्थात ही काळाची गरज आहे, अशा जागरुक पालकांचे अभिनंदनच. पण का? कुणास ठाऊक.. राजा शुध्दोदनची गोष्ट आठवतेय.
राजा शुध्दोदन अन् महाराणी महामायाला बाळ झालं, नाव ठेवलं.. सिध्दार्थ. लुंबीनी वनात शाल वृक्षाखाली सिध्दार्थचा जन्म झालेला, राजवाड्यात बाळाला आणण्यात आलं. ढोल-ताशे-नगारे, हत्तीवरुन साखरपान.. सर्वत्र आनंदोत्सव. हे सर्व बघून त्या राज्यातून चाललेले असीत मुनी बाळाला बघायला आले. बाळाच्या अंगावर बुध्दत्वाची ८० लक्षण व ३२ शुभलक्षण त्यांना दिसली. ते रडायला लागले, सर्वत्र जल्लोष असतांना ‘मुनीजी का रडतात?’ राजानं विचारलं. "हा बाळ ज्यावेळी ‘बुध्द’ होईल, त्यावेळी मी नसेन.." असे मुनिजी म्हणाले. राजानं विचारलं ‘म्हणजे?’.. "मानव जातीच्या कल्याणासाठी सांसरीक सुखाचा त्याग करुन हा ‘बुध्द' होईल" मुनी म्हणाले. ‘अहो पण हा राजाचा मुलगा, संसारसुखाचा त्याग का करणार?’ राजाने विचारले. "तो संसारात राहीलातर ‘चक्रवर्ती सम्राट’ बनेल, नाहीतर ‘बुध्द’ बनेल.." एवढं बोलून असीत मुनी निघून गेले.
सिध्दार्थला ‘चक्रवर्ती सम्राट’च बनावायचे, हा राजा शुध्दोदनने ठाम निर्धार केला. शाक्य राज्यात तसं वातावरण सिध्दार्थभोवती तयार करण्यात आलं, ‘राजा बोले दल हले’ अशी परिस्थिती होती.. सिध्दार्थला संसारात गुंतवून ठेवण्यासाठी ‘यशोधरा’ या नितांतसुंदर राजकन्येशी विवाहही लावून देण्यात आला, दरम्यानच्या काळात सिध्दार्थ-यशोधराला मुलगाही झाला.. राजा निश्चिंत झाला, बस आता काही दिवसात राजकुमार सिध्दार्थचा राज्याभिषेक करुन त्यांच्यावर राज्याची जबाबदारी सोपवुयात.. या विचारात ते होते. अवघ्या काही दिवसातच ‘सिध्दार्थ’ हा ‘चक्रवर्ती सम्राट सिध्दार्थ’ बनणार होता, पण एका सकाळी बातमी आली- 'राजपुत्र सिध्दार्थ राजवाडा सोडून गेले.' व्हायचे तेच झाले, बोधीवृक्षाखाली भगव्या वस्त्रात सिध्दार्थचा प्रवास बुध्दत्वाच्या दिशेने सुरु झाला.. सिध्दार्थ हे ‘गौतम बुध्द’ बनले.
तुम्ही जसा विचार करता, तसे तुम्ही बनता.. साक्षात राजा शुध्दोदन प्रयत्नांची पराकाष्ठा करुनही त्यांच्या मुलाला पाहिजे ते घडवू शकले नाही, तिथं तुम्ही-आम्ही सामान्य माणसं आपल्या मुलांना काय घडवणार ? अर्थात हे ‘आठवलं म्हणून’ मांडलं, मित्रांनो मुलांना घडविण्याची प्रक्रिया सोडू नका.. _पण शेवटी सांगतो- सिध्दार्थ हा ‘चक्रवर्ती सम्राट’ बनला असतातर केंव्हाचाच 'कालबाह्य' झाला असता, सिध्दार्थ हा "गौतम बुध्द" बनला म्हणून 'चिरंतन' आहे!
✍️ राजेंद्र काळे
@बुलडाणा ९८२२५९३९२३
0 टिप्पण्या