🌟परभणीत टपाल विभागात विमा सल्लागार पदासाठी २१ जूनला मुलाखती....!


🌟युवकांनी अर्ज करण्याचे आवाहन डाकघर अधीक्षक यांनी केले🌟

परभणी (दि.१० जुन २०२३) : येथील भारतीय टपाल विभागाकडून डाक जीवन विमा आणि ग्रामीण डाक जीवन विमा योजनेअंतर्गत विमा सल्लागार पदासाठी २१ जून २०२३ रोजी डाकघर अधीक्षक कार्यालय, परभणी येथे प्रत्यक्ष मुलाखती घेण्यात येणार आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त इच्छुक व पात्र उमेदवारांनी मूळ कागदपत्रांसह प्रत्यक्ष उपस्थित राहण्याचे आवाहन डाकघर अधीक्षक यांनी केले आहे.  

विमा सल्लागार पदासाठी उमेदवाराचे वय मुलाखतीच्या दिवशी १८ ते ५० वर्षादरम्यान असावे. अर्जदार हा १० वी उत्तीर्ण किंवा समक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेला असावा. विमा सल्लागार पदासाठी बेरोजगार, स्वयंरोजगार, माजी विमा सल्लागार, कोणत्याही विमा कंपनीचा माजी विमा एजंट, माजी सैनिक, सेवानिवृत्त शिक्षक, अंगणवाडी कार्यकर्ते, महिला मंडळ कार्यकर्ते, ग्राम प्रधान, ग्राम पंचायत सदस्य आदी टपाल जीवन विमासाठी थेट अर्ज करू शकतात.

            उमेदवाराची निवड थेट मुलाखतीद्वारे व्यावसायिक कौशल्य, व्यक्तिमत्व, जीवन विमा, संगणकबाबतचे ज्ञान, स्थानिक भागाची माहिती इत्यादी बाबी लक्षात घेऊन करण्यात येणार आहे. निवड झालेल्या उमेदवारास ५ हजार रुपये अनामत रक्कम सुरक्षा ठेव म्हणून भरावी लागेल, ती नॅशनल सेव्हीग्ज सर्टीफीकेट किंवा किसान विकास पत्र स्वरुपात असेल. प्रशिक्षणानंतर डाक विभागाकडून तात्पुरत्या स्वरुपात परवाना देण्यात येईल, तो आयआरडीए (IRDA)ची परवाना परीक्षा उतीर्ण केल्यास कायम केला जाईल. ही परीक्षा ३ वर्षात उत्तीर्ण करणे अनिवार्य राहील. विमा सल्लागारांची नियुक्ती ही लायसन्स आणि कमिशन तत्त्वावर राहील.

            तरी सर्व इच्छुक उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज २१ जूनपर्यंत कार्यालयीन वेळेत अधीक्षक डाकघर, परभणी येथे बायोडाटा, मूळ कागदपत्र, प्रमाणपत्र, अनुभव प्रमाणपत्रासह थेट मुलाखतीसाठी हजर राहावे, असे आवाहन डाकघर अधीक्षक मोहम्मद खदीर यांनी केले आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या