🌟मतदार नोंदणी करतेवेळी कागदपत्रासह आधार कार्डची छायांकित प्रत सादर करावी - जिल्हाधिकारी आंचल गोयल
परभणी (दि.२७ जुन २०२३): १ जानेवारी २०२४ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचे विशेष संक्षिप्त पुनरीक्षण पूर्व कार्यक्रम १ जून ते १६ ऑक्टोबर या कालावधीसाठी जाहीर झाला आहे. १७ ऑक्टोबर रोजी प्रारुप मतदारयादी प्रसिद्ध करावयाची आहे व अंतिम प्रसिद्धी ५ जानेवारी २०२४ रोजी करावयाची आहे. त्याकरिता दावे, हरकती दाखल करावयाचा कालावधी १७ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर असा राहणार आहे. १८ वर्षे पूर्ण झालेल्या युवकांनी मतदार नोंदणी करून घ्यावी. मतदार नोंदणी करतेवेळी कागदपत्रासह आधार कार्डची छायांकित (झेरॉक्स) प्रत सादर करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती आंचल गोयल यांनी केले आहे.
नागरिकांच्या सोईसाठी भारत निवडणूक आयोगाने ऑनलाईन पद्धतीने मतदार नोंदणी करण्यासाठी www.nvsp.in या संकेतस्थळाचा वापर करावा. त्याचप्रमाणे नागरिकांना भारत निवडणूक आयोगाचे Voter Helpline App मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे सुद्धा मतदार नोंदणी घरबसल्या करता येईल. याशिवाय नागरिकांना संबंधित मतदार नोंदणी अधिकारी यांच्याकडे नोंदणीसाठी अर्ज सादर करता येईल.
जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदार संघ क्षेत्रातील नागरिकांना १ जून ते ३० नोव्हेंबर २०२३ या कालावधीत आपले मतदार ओळखपत्र दुरुस्ती, नवमतदार नोंदणी, मतदार ओळखपत्र आधार कार्डशी जोडणी, मतदार यादीतील नाव कमी करणे अशी सर्व कामे करता येणे सहज शक्य होईल. छायाचित्रासह मतदान यादीचे विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन उपजिल्हाधिकारी तथा उप जिल्हा निवडणूक अधिकारी निवृत्ती गायकवाड यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे....
0 टिप्पण्या