🌟ऑनलाईन शिक्षणाची खरी गरज निर्माण झाली ती 2019-20 मध्ये.covid 19 मुळे अवघे विश्व थांबले होते🌟
ऑनलाईन शिक्षण म्हणजे इंटरनेटच्या माध्यमातून घरबसल्या प्राप्त होणारे शिक्षण. कॉम्पुटर, लॅपटॉप, स्मार्ट फोन यांच्या माध्यमातून आपण हे ऑनलाईन शिक्षण घेऊ शकतो. भारतात याची सुरुवात 2004-05 या वर्षात काही संस्थांनी सुरू केली. पण पर्याप्त संसाधनांचा विकास न झाल्याने हि शिक्षण पध्दती मागे पडली.पुढे काही वर्षे थोड्या शैक्षणिक संस्थात वापर होत गेला.
ऑनलाईन शिक्षणाची खरी गरज निर्माण झाली ती 2019- 20 मध्ये.covid 19 मुळे अवघे विश्व थांबले होते.लॉक डाऊन मुळे पुन्हा एकदा ऑनलाईन शिक्षण पध्दतीला संधी चालून आली, आणि खऱ्या अर्थाने इथूनच ऑनलाईन शिक्षण पध्दती रूढ होऊ लागली. यात शिक्षकाची भूमिका महत्वाची ठरली.लॉक डाऊनच्या काळात शिक्षकानी आपल्या जीवाची पर्वा न करता विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून विद्यार्थ्यांना विविध माध्यमातून मार्गदर्शन करत होते. मोबाईल मध्ये पालकांचे वॉट्स ॲप ग्रुप तयार करुन मुलांना मार्गदर्शन देऊ लागले. उजळणी ,प्रश्न सराव देऊन त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात कायम ठेवले.
लॉक डाऊन मधून जेंव्हा थोडी सुट मिळाली तेव्हा आणखी कल्पकतेने शिक्षकांनी अध्यापन कार्य सुरू ठेवले. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत आपला गडचिरोली जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती फार वेगळी आहे. दाट जंगल आणि डोंगराळ प्रदेश असल्याने इथे मोबाईल टॉवरची संख्या कमी आहे. त्यामुळे इंटरनेटची सुविधा नाही. भामरागड, एटापल्ली तालुक्यातील परिस्थिती तर फारच गंभीर आहे. पण अश्या समस्यांवर मात करून शिक्षकांनी अध्यापन कार्य सुरू ठेवले. अनेक शकले लढवली. काही हौशी, उपक्रमशील शिक्षकांनी झाडावर चढून, काही शाळेच्या इमारतीवर चढून मुलांना ऑनलाईन शिक्षण दिले. शिक्षण विभागाने राबवलेली अभ्यासमाला, स्वाध्याय, शिकू आनंदे अश्या अनेक उपक्रमात विद्यार्थ्यांचा सहभाग करून घेतला. दीक्षा ॲप, यूट्यूब अश्या अनेक ॲपचा वापर करून मुलांना मार्गदर्शन केले. माननीय कुमार आशिर्वाद साहेब, मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प गडचिरोली यांच्या कल्पनेतून तयार झालेला मुलांच्या मूलभूत क्षमतेवर आधारीत फुलोरा हा उपक्रम तेवढयाच जिद्दीने शिक्षकांनी आपल्या शाळेत राबविले. मुले सुद्धा आता मोबाईल मध्ये रमू लागले होते. पण ऑनलाईन शिक्षण पध्दती पेक्षा मुलांना प्रत्यक्ष वर्गात जाऊन शिकणे आवडते,हे सत्य आहे. पण यावर इलाज नव्हता. शिक्षकाने कोरोना काळातील आव्हान स्वीकारले, आणि निरंतर अध्यापन चालू ठेवले.
आता ही परिस्थिती नाही. आता सर्व जग शिक्षणासाठी खुले झाले आहे. तरीपण ऑनलाइन अभ्यासक्रम चालूच आहे.10 वी 12वी चे क्लास NEET चे क्लास jee चे क्लास अजुनही ऑनलाइन पद्धतीने चालू आहेतच. शिवाय जिल्हा परिषद शाळेतील उपक्रमशील शिक्षक या ऑनलाइन पद्धतीचे उपयोग करतच आहेत. ही सुरू झालेली प्रक्रिया आता कधी बंद पडणार नाही. कारण शिक्षण ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे आणि शिक्षक हा प्रक्रिया घडवून आणणारा साधक आहे.
लेखक - जितेंद्र रायपुरे,गडचिरोली
8806550920
0 टिप्पण्या