🌟महाराष्ट्रात अधिक मासाला धोंड्याचा महिना या नावानेही ओळखलं जातं🌟
यंदा सन २०२३ साली तब्बल 19 वर्षांनी अद्भूत संयोग जुळून आला आहे. यंदा श्रावण आणि अधिकमास एकत्र आला आहे. त्यामुळे यंदा श्रावण दोन महिने असणार आहे. अधिकमासला मलमास किंवा पुरुषोत्तम महिना देखील म्हटलं जातं. महाराष्ट्रात अधिक मासाला धोंड्याचा महिना या नावानेही ओळखलं जातं. हिंदू धर्मात अधिकमास अतिशय पवित्र मानला जातो. नवीन लग्न झालेल्या जोडप्यांसाठी हा महिना सर्वाधिक खास असतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा महिना म्हणजे जावयांचा लाड करण्याचा महिना असतो. अधिक मास म्हणजे पुरुषोत्तम मास असतो. त्यामुळे या महिन्यात जावयाला नारायणरुप मानून पूजा केली जाते. म्हणून हिंदू धर्मात लग्न झालेल्या जोडप्यांना लक्ष्मी नारायणाचं रुप मानलं जातं. म्हणून अधिक मासात जावयाला तुपातील ३३ अनारसे दिले जातात. अशी रोचक माहिती श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरूजींच्या या लेखातून जरूर वाचावी... संपादक.
प्राचीन इतिहास- वैदिक काळ: अधिक महिन्याचे संदर्भ वैदिक साहित्यात आढळतात. सौर कालगणना वेदकाळात अस्तित्वात होती आणि चांद्र कालगणनाही अस्तित्वात होती. वैदिक ऋषींना हे लक्षात आले की चांद्र आणि सौर कालगणना यांचा एकमेकांशी मेळ जुळण्यासाठी काही दिवसांचा फरक पडत होता. हे अंतर भरून काढण्यासाठी काही दिवस अधिक घ्यावे लागले. वैदिक काळातच हे अंतर भरून काढण्यासाठी दर ३ वर्षांनी कालगणनेमध्ये ३० दिवस अधिक घेतले गेले. हाच तो अधिक मास होय. वैदिक काळात या अधिक महिन्याला संसर्प मास, मलीमलूच मास असे म्हटले गेले आहे. अधिक मासाला पुरुषोत्तम मास, मल मास, धोंड्याचा महिना असेही म्हणतात.
धार्मिक महत्त्व: या मासात मंगल कार्ये, काम्य व्रते इत्यादींचा त्याग करतात. त्यामुळे या मासास इहलोकात अनेक निर्भत्सनांना सामोरे जावे लागले. त्यामुळे व्यथित होऊन तो मास वैकुंठात विष्णूकडे गाऱ्हाणे घेऊन गेला. विष्णूने त्यास गोकुळात कृष्णाकडे पाठविले. तो कृष्णास शरण गेला. कृष्णाने त्या मासाचे नाव बदलून पुरुषोत्तम मास असे ठेविले, अशी कथा प्रचलित आहे. या मासात जे श्रद्धाभक्तियुक्त राहून उपासना, कर्मे, व्रते व दाने करतील त्यांना पुण्य मिळेल असेही त्यास वचन दिले. अधिक मास हा पुरुषोत्तम मास म्हणून ओळखला जातो. या विशिष्ट महिन्यात विष्णू देवतेच्या उपासनेला विशेष महत्त्व आहे. या काळात उज्जैन येथे विशेष यात्रा भरते. भागवत पुरणाचे वाचन, भागवत कथा सप्ताह, स्नान, दान, जप यांचे आचरण या महिन्यात केले जाते. हीनदिनांना, ब्राह्मणांना भोजन, दान देणे यासाठीही या महिन्यात विशेष उपक्रम राबविले जातात. अधिक मासात कोणतेच धार्मिक सण उत्सव येत नाहीत, ते सर्व निज मासात येतात.
अधिक महिन्यात विविध मंगल कृत्ये करू नयेत, असा संकेत रूढ आहे, त्यामुळे या महिन्यात विवाह, मुंज, बारसे असे संस्कार केले जात नाहीत. तसेच नव्या वस्तूंची अथवा नव्या कपड्यांची खरेदी न करण्याची परंपरा समाजात रूढ आहे. अधिक मासात भारतवर्षांत विष्णूच्या विविध मंदिरांत विशेष पूजेचे आयोजन केले जाते. भागवत पुराणाचे सप्ताह, दान, स्नान असे धार्मिक उपक्रम आयोजित केलेलं जातात. विविध यात्रा-जत्रा यांचे आयोजन केले जाते. महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात पुरुषोत्तम मंदिर आहे. तेथे अधिक मासात संपूर्ण महिनाभर विशेष धार्मिक उत्सव आयोजित होतात.
खगोलशास्त्रीय महत्त्व: पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या भ्रमणामुळे, सूर्य हा बारा राशींमधून प्रवास करत कालचक्राचे एक वर्ष पूर्ण करतो, असे भासते. त्यास ३६५ दिवस, ५ तास ४८ मिनिटे आणि साडे ४७ सेकंद लागतात. त्या काळात इंग्रजी (ग्रेगेरीयन) कॅलेंडरवरचे बारा महिने पूर्ण होतात. मात्र चंद्राच्या पृथ्वीभोवती फिरण्यावर आधारलेले १२ हिंदू चांद्रमास केवळ ३५४ दिवसातच म्हणजे ११ दिवस आधीच पूर्ण होतात. महाराष्ट्र, गुजरात, आंध्रप्रदेश आणि कर्नाटकातील चांद्रमास हे अमान्त- अमावस्येला संपणारे असतात. उत्तरेला ते पौर्णिमान्त असतात. ज्या हिंदू मासात सूर्य एकाही राशीचे संक्रमण करीत नाही- रास बदलत नाही, तो अधिक मास होय. सौरमास व चांद्रमास यांची सांगड घालण्यासाठी व या अकरा दिवसांचा फरक भरून काढण्यासाठी पंचांगात अधिक मासाची व क्षयमासाची योजना करण्यात आलेली आहे. तीन वर्षांत होणारा ३३ दिवसांचा फरक क्षयमास वा अधिकमास टाकून, ही कालगणना सूर्याधारित सौर वर्षाशी जुळवून घेण्यात येते.
भारतातील प्रांतानुसार सूर्याधरित पंचांग पाळणाऱ्या आसाम, ओरिसा, केरळ, तमिळनाडू, पश्चिम बंगाल या राज्यांत अधिक महिना नसतो, तो फक्त चांद्र पंचांग वापरणाऱ्या आंध्र प्रदेश, कर्नाटक, गुजरात, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशांसारख्या राज्यांत पाळला जातो. चैत्रापासून आश्विन महिन्यांपर्यंतचा कोणताही एक महिना अधिक मास म्हणून येऊ शकतो. कारण या महिन्यांतच सूर्याची गती मंद असते आणि त्याला एका राशीतून दुसऱ्या राशीत जायला जास्त वेळ लागतो. क्वचित कार्तिक किंवा फाल्गुन महिन्यातही अधिक मास येतो. त्या वर्षी एकाच नावाचे दोन चांद्र महिने असतात, अगोदरचा अधिकमास आणि नंतर लगेच येणारा महिना हा निजमास संबोधला जातो. एखादा विशिष्ट महिना अधिकमास आला की १९ वर्षांनंतर तोच महिना अधिकमास म्हणून येऊ शकतो. ज्यावर्षी चैत्र हा अधिकमास असतो, त्यावर्षी अधिकमासाच्या सुरुवातीलाच शकसंवत्सराचा आकडा एकने पुढे जातो. गुढी पाडवा मात्र लगेचच नंतर येणाऱ्या निज चैत्र महिन्यात येतो. म्हणजे त्यावर्षी पाडवा हा नववर्षाचा आरंभ दिवस नसतो. काहीवेळा एकाच चांद्रमासात सूर्याच्या दोन संक्रांती येतात, म्हणजे सूर्य दोनदा रास बदलतो. अशावेळी क्षयमास येतो. मार्गशीर्ष, "पौष आणि माघ" या महिन्यांत अधिकमास कधीही येत नाहीत, क्षयमास येतात.
क्षयमासाच्या आजूबाजूच्या महिन्यांमध्ये केव्हातरी थोड्या अंतराने दोन अधिकमास येतात.
चांद्र वर्ष आणि सूर्य (सायन) वर्ष यांच्यात मेळ घालण्याच्या उद्देशाने, पंचांगकर्त्यांनी कालगणनेसाठी जरी चंद्राचे भ्रमण प्रमाण मानले तरी महिन्यांची नावे मात्र सूर्याच्या भ्रमणाप्रमाणे ठेवली. म्हणजे मीनेत सूर्य असताना जेव्हा अमावास्या येऊन संपेल तेव्हा चैत्र महिन्याला सुरुवात होईल. मेषेत सूर्य असताना आलेल्या अमावास्येनंतर वैशाख सुरू होतो, वगैरे. सूर्य एका राशीत साधारणपणे एक महिना राहतो. साधारण १४ ते १७ तारखेला तो रास बदलतो. एका अमावास्येला सूर्य ज्या राशीत असतो, त्याच्या पुढच्या राशीत तो नंतरच्या अमावास्येला असतो. मात्र साधारण तीन वर्षांनी एक अशी अवस्था येते की एका अमावास्येला सूर्य ज्या राशीत असेल त्याच राशीत तो पुढच्या अमावस्येलाही असतो. नियमाप्रमाणे सूर्य अमावास्येला ज्या राशीत असेल त्या राशीप्रमाणे त्या महिन्याला नाव दिले जाते. पण दोन लागोपाठच्या अमावास्यांना सूर्य एकाच राशीत असेल म्हणजे सूर्य रासच बदलत नसेल तर त्या दुसऱ्या अमावास्येनंतर सुरू होणाऱ्या महिन्याला नाव काय द्यायचे? अशा वेळी नाव रिपीट करण्यात येते. मेषेत सूर्य असताना येणाऱ्या अमावास्येनंतर वैशाख महिना सुरू होतो हे सर्वसाधारणपणे खरे असले तरी त्यानंतरच्या चांद्रमासात सूर्याचे राशिसंक्रमण होत नसेल तर तो चांद्रमास वैशाख नसून अधिक वैशाख असतो. तेव्हा हे लक्षात ठेवले पाहिजे की चांद्रमासाचे नाव सूर्याच्या शुक्ल प्रतिपदेच्या स्थितीवरून नव्हे तर त्याच्या अमावास्येच्या स्थितीनुसार ठरते. जसे सूर्य मेषेत असताना जी अमावास्या येते ती चैत्र अमावास्या समजावी. सूर्य मीनेत असताना जी अमावास्या येते ती फाल्गुन अमावास्या समजावी. अर्थात सूर्य मीनेत असताना अधिक चैत्र अमावास्या किंवा मेषेत असताना अधिक वैशाख अमावास्या आणि याप्रमाणे इतरही येऊ शकतात. ज्या चांद्र महिन्यात सूर्याचे एका राशीतून पुढच्या राशीत संक्रमण होत नाही, तो महिना अधिक महिना मानतात आणि त्यानंतरचा निज महिना. याच नियमाने ज्या चांद्र महिन्यात सूर्य दोन राशींनी पुढे सरकतो, त्या महिन्याला क्षयमास म्हणतात. पौर्णिमेला महिना संपतो अशा पद्धतीच्या पंचांगात निजमासाच्या एका कृष्ण पक्षानंतर अधिक मासाचे दोन पक्ष येतात, आणि त्यानंतर निजमासाचा शुक्ल पक्ष- दुसरा पंधरवडा. त्या पंचांगातला अधिक मास आणि अमान्त पद्धतीच्या पंचांगातील अधिक मास एकाच वेळी असतात.
हिंदू पंचांगातल्या प्रत्येक महिन्यात दोन वा अधिक एकादश्या असतात; त्यांतल्या २४ एकादश्यांपैकी प्रत्येकीला स्वतंत्र नाव असते. अधिक महिन्यात येणाऱ्या दोनही एकादश्यांना कमला एकादशी हेच नाव असते. ज्या वर्षी श्रावण, भाद्रपद किंवा आश्विन महिन्यात अधिक मास येतो, त्या वर्षी चातुर्मास पाच महिन्यांचा असतो. अधिक मासात निजमासांप्रमाणेच विनायकी आणि संकष्टी या दोन्ही चतुर्थ्या असतात, हे विशेष!
!! समस्त भारतीय बांधवांना पावन धोंडी मासाच्या सोज्वळ, सात्विक अनंतकोटी हार्दिक शुभेच्छा !!
- श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरूजी.
गडचिरोली, मोबा- ७७७५०४१०८६.
0 टिप्पण्या