🌟स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव : घरोघरी तिरंगा..,प्रत्येकास ध्जजसंहिता अवगत करून दिली का ?



🌟हा निर्णय तसा देशाची आण,बाण,शान तथा मान उंचावण्याच्या उद्देशाने चांगला आहे🌟

भारत देशात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या हृदयात भारतभूचा सार्थ अभिमान असावयास हवाच. देशाचा तिरंगा राष्ट्रध्वज उच्चस्थानी फडकत बघून आदराने मान वाकवून ध्वजवंदन करायलाच पाहिजे. हाच खरा देशप्रेमाचा, राष्ट्रभक्तीचा आणि राष्ट्रध्वज सन्मानाचा उत्तम दाखला ठरतो. मागील सन २०२२पासून संपूर्ण विश्वात भारतातील जनतेचे देशावरचे प्रेम व राष्ट्रीय ऐक्य दाखवून देण्याच्या महत्वाकांक्षेने केंद्र सरकारने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अभियानांतर्गत घरोघरी तिरंगा हा उपक्रम आयोजित केला आहे. 


हा निर्णय तसा देशाची आण, बाण, शान तथा मान उंचावण्याच्या उद्देशाने चांगला आहे. संपूर्ण भारतदेश तीन रंगाने शोभून जगावेगळा दृष्टीस पडत आहे, येथवर ठिक आहे. मात्र तेवढाच जनतेला राजद्रोही व देशद्रोही ठरविणाराही सिद्ध होत आहे आणि पुढेही होईलच, यात तिळमात्र शंका नाही. रोज रोटीतुकडा मागून पोटभरणाऱ्या काही लोकांना आजही राहण्यास घरे नाहीत, त्यांनी राष्ट्रध्वज उभारावीत तरी कोठे? उभारली नाहीत; म्हणून त्यांना सरकारने का राष्ट्रद्रोही ठरवावे? काही लोकांनी तिरंगा फडकविला, पुढेही फडकावतीलही, मात्र त्यांना कुठे माहित पडतं, की आपण ध्वज उलटं लावलं की सुलटं? उपक्रमाची यशस्वी सांगता झाल्यानंतर प्रत्येक घरातील ध्वज ठेवलं गेलं कुठं? पुढेही ठेवलं जावं कुठं? त्याची व्यवस्था योग्यरीत्या लावली गेली का? पुढेही लावली जाईल का? पूर्वी शौकीन व अतिव देशाभिमानी लोक मुलांच्या हातात प्लास्टिकचे ध्वज देत व नंतर दुसऱ्या दिवशी ते कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर कचरा म्हणून फेकली जात. काही ठिकाणी तसलेच चित्र दिसल्याचे समाज माध्यमांनी जगासमोर मांडले होते. अगदी तसलीच गत पुढेही होतच राहणार तर नाही ना? अशा अनेक समस्या राष्ट्रध्वजाचा सन्मान राखण्यात उद्भवत आहेत, पुढेही उद्भवणार आहेतच. याच चुकांना गृहीत धरून संबंधित लोकांवर राष्ट्रध्वजाचा अवमान करणारे म्हणून गुन्हे दाखल करून त्यांना तुरूंगात डांबले गेले आणि पुढेही जाईल. याचा कोणीतरी तज्ज्ञांनी सांगोपांग विचार का केला नाही? आतातरी विचार केला जावा. मागील वर्षी अनेक किस्से उजेडात आले. राष्ट्रध्वज पुरविणारांनी ते कसेही अयोग्य ध्वज पुरविले. त्यात ते वाकडेतिकडे शिवलेले, फाटलेले, स्वप्रसिद्धीस्तव आपले नाव लिहिलेले, सही केलेले, दुसर्‍याच देशाचे चिन्ह लावलेले, अशा कितीतरी उणिवा किंवा भर घातलेले ध्वज होते. गडचिरोली नगरपरिषद तर्फे गडचिरोली शहरभर घरोघरी जाऊन ध्वज वाटले गेले. माझ्याकडेही ते घेऊन आले. मी ध्वज तपासून पाहिले, तेव्हा त्यात एकही ध्वज योग्य नव्हता. त्यात तिरंगी पट्ट्या असमांतर होत्या आणि अशोकचक्र केंद्रस्थानी नव्हते, तर ते कोणत्यातरी एका दिशेला अधिक सरकलेले दिसत होते; म्हणून मी एकही ध्वज पसंत करून घेतला नाही. त्या कर्मचाऱ्यांना मी फर्मावत म्हटले, कि मी असा ध्वज फडकवून राष्ट्रध्वजाची बेईज्जती करू इच्छित नाही, त्यापेक्षा मी ध्वज न फडकावण्याच्या गुन्ह्याला सामोरे जाण्यास तयार असेन. ज्यांनी असा माझ्यासारखा विचार केला असेल ते माझ्या मते खरेच भारताचे सूज्ञ नागरिक होत. जे घरी ध्वजारोहण करू इच्छित नाही. या शुद्ध सात्विक विचाराने घरी तिरंगा न फडकावणाऱ्यांना राजद्रोही व देशद्रोही ठरविले जाऊ शकते का? घरोघरी ऐवजी चौका चौकात, मोहल्या मोहल्यात, टोल्या पाड्यात, गल्लोगल्ली किंवा गावोगावी यापैकी कोणताही पर्याय योग्य ठरला असता. कारण त्यामध्ये सामूहिक जबाबदारी राहिली असती. यासाठी सरकारने घरोघरी तिरंगा अभियानाच्या यशस्वितेसाठी पूर्वतयारी म्हणून गाव, वाॅर्ड, नगर, शहर अशा प्रत्येक स्तरावर प्रशिक्षणाद्वारे ध्वजसंहिता आणि ध्वज फडकविण्याचे, हाताळण्याचे, निगा राखण्याचे नियम प्रत्येक नागरिकास अवगत करून देण्यात यावेत. घरोघरी यातील वैयक्तिक जबाबदारी राष्ट्रध्वज हाताळण्याविषयीच्या पुढील नियमांनुसार पार पाडणे खरेच अवघड आहे हो! 

    शासनमान्य नियम: ध्वज फडकावताना तो फाटलेला, मळलेला किंवा चुरगळलेला नसावा. तिरंगा व्यवस्थित ठिकाणी फडकवावा. ज्या उंचीवर तो फडकविला आहे, त्याच्या बरोबरीच्या उंचीवर इतर कोणताही ध्वज नसावा. कोणत्याही प्रकारच्या सजावटीत राष्ट्रध्वजाचा वापर करू नये. ध्वजारोहणासाठी झेंडा तयार करताना त्यात फुलं ठेवता येतील. ध्वज फडकविताना नारिंगी रंग वरच्या बाजूला राहील, याची दक्षता घ्यावी. ध्वजावर काहीही लिहू नये. कोणतीही वस्तू झाकण्यासाठी त्याचा वापर करू नये. राष्ट्रध्वज फरशीवर पडलेला नसावा, पाण्यावर तरंगलेला नसावा. कोणत्याही प्रकारच्या वेशभूषेवर राष्ट्रध्वजाचा वापर करू नये. तो कमरेच्या खाली गुंडाळू नये. रुमाल, सोफ्याचं कव्हर, नॅपकीन, अंतरवस्त्र यासाठी कापड म्हणून त्याचा वापर करू नये. जेव्हा ध्वज फडकावतो तेव्हा तो ध्वजस्तंभाच्या उजव्या बाजूला असावा.

    “एकच तारा समोर, आणिक पायतळी अंगार, 

     गर्जा जय जयकार क्रांतीचा गर्जा जय जयकार!"

कवी कुसुमाग्रजांनी केलेल्या या आवाहनाचे सार्थक होण्यास दि.१५ ऑगस्ट १९४७चा दिवस उजाडला. पक्षी पिंजऱ्यातून उडाला. स्वातंत्र्याची रम्य प्रभात झाली. असंख्या बलिदानांचे सार्थक झाले आणि भारताला पारतंत्र्यातून मुक्तता मिळून स्वातंत्र्य मिळाले. बघता-बघता स्वातंत्र्याचा प्रवास ७५ वर्षांचा होता आहे. आज आपण भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत आहोत. एखाद्या राष्ट्राच्या जीवनात ७५ वर्षांचा कालखंड हा जरी फार मोठा टप्पा नसला तरी, राष्ट्रातील नागरिकांच्या जीवनात स्वातंत्र्याची ७५ वर्षे पूर्ण करणे अनन्यसाधारण महत्वाचे आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात आपली स्वातंत्र्याविषयी कोणती स्वप्ने होती? स्वातंत्र्याकडून आपल्या कोणत्या अपेक्षा होत्या? आज सत्य काय आहे? कुठे होतो आपण आणि आता कुठे आहोत? उणिवा काय राहिल्या आणि आता भविष्यात कशी पावले उचलावी लागतील? याचा विचार आपल्यालाच करावा लागेल. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात आपण काय कमावलं? आणि काय गमावलं? याचे सिंहावलोकन करण्याच्या टप्प्यावर आपण येऊन पोहोचलो आहोत. भारत हा नैसर्गिक साधनसंपत्ती आणि खनिज संपदेने समृद्ध देश आहे. माथी हिमालय उभा आहे. पायी सागराच्या लाटा लोळण घाळत आहेत. देशातून गंगा-गोदावरी, ब्रह्मपुत्रासारख्या रक्त वाहिन्या वाहत आहेत. निजीत पक्षी आकाशी भरारी मारतो आहे. सैनिक आणि जवान डोळ्यात तेल घालून देशाच्या सीमारक्षण करत आहेत. किसान लोकराजा बनला आहे. आपल्या देशाला शिमला, कुलू, मनाली, उटी सारखी समृद्ध पर्यटन स्थळे लाभली आहेत. एकूणच आपला भारतदेश सुजलाम् सुफलाम् बनला आहे. आपल्या देशाला पैराणिक आणि ऐतिहासिक संस्कृतीचा वारसा लाभला आहे. अनेक जातींचे, धर्मांचे, भाषांचे लोक येथे गुण्यागोविंदाने एकत्र नांदत आहेत. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत कबीर यांच्यासारख्या थोर संतांची भूमी असलेल्या आपल्या देशाची संस्कृती आज जागतिक पातळीवर सर्वश्रेष्ठ संस्कृती मानली जाते. भारत एकाच वेळी अध्यात्मात आणि  विज्ञानातही अग्रेसर होत आहे. अनेक खेळ प्रकारात भारताने जागतिक दर्जाची कामगिरी केली आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात गेली ७५ वर्षे साहित्य, कला, क्रीडा, संस्कृती या क्षेत्रामध्ये नामवंत लेखक, साहित्यिक व कलावंतांनी आपला अमीट ठसा उमटवला आहे.

     पण असे असले तरी एकीकडे प्रगती होत आहे आणि दुसरीकडे अनेक गोष्टी आपल्याला वेदना देत आहेत. स्वातंत्र्यासाठी अनेक शूरवीरांनी ऐन तारुण्यात बलिदान दिले. आपले संपूर्ण आयुष्य स्वातंत्र्यासाठी समर्पित केले, स्वरक्ताचा सडा टाकला. परंतु आम्ही मात्र रक्ताचा घाऊक बाजार मांडला आहे, असं कधीकधी उगीचंच वाटते. त्या देशभक्तांनी राष्ट्रध्वजास प्राणाहून प्रिय मानले व तसे वागविलेही. ते साधे जमिनीवरही पडू दिले नाही. मात्र आम्ही ते पायदळी तुडवून देशाची शान उंचावित असल्याच्या आविर्भावात वागत आहोत, हीच खरी मोठ्या शरमेची गोष्ट नाही का?आज चीन-पाकिस्तान सारख्या परकीय शक्ती सीमेवर आक्रमणाच्या तयारीत असतात. देशांमध्ये दहशतवादी हल्ले होतात. उरी, पुलवामासारख्या रक्ताळलेल्या आठवणी आपल्याला दुःख देतात. या देशातल्या शेतकऱ्याला आपल्या हक्कांसाठी आंदोलन करावे लागते. अनेक गरिबांना एक वेळचे जेवणसुद्धा मिळत नाही. स्वर्गासारखा काश्मीर गुलाबाच्या सुगंधाने दरवळत रहाण्याऐवजी रक्तात रंगताना पाहायला मिळतो. धर्माच्या नावावरून जातीय दंगली होतात, तेव्हा स्वातंत्र्याच्या ठिकऱ्या ठिकऱ्या उडतात. भारत मातेच्या हृदयाचे शेकडों तुकडे होतात. एकाच आईची लेकरे एकमेकांच्या रक्तासाठी तहानलेली असतील, तर त्या आईची काय अवस्था होत असेल? या साऱ्या आक्रमणांमध्ये अतिशय सामान्य माणूस भरडला जातो. जळणारी झोपडी आणि करपणारे रक्त मात्र भारतीयच आहे, हे आपण का विसरतो? हा खरा प्रश्न आहे. भ्रष्टाचाररूपी यंत्रणेमुळे मोठी व्यवस्था पोखरली जाते. रीज मोठ्या अधिकाऱ्यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक होते, तेव्हा ज्यांच्या हाती आपण देशाची प्रशासन व्यवस्था सोपवली आहे, तेच भ्रष्टाचाराने बरबटलेले पाहून असंख्य वेदना होतात. तुरूंगात असताना अनेक गुन्हेगार निवडणुका जिंकतात. दरवर्षी मोठमोठे घोटाळे उघडकीस येतात. सामान्य माणसाच्या हक्काची भाकरी गिळंकृत करणारी मंडळी या देशाचे मारेकरी आहेत. सत्यमेव जयते! हे ब्रीदवाक्य आपल्या देशाची शान आहे. परंतु अशा दृष्ट प्रवृत्तींमुळे देश शोकग्रस्त होतो. कधीकधी देशासाठी फासावर चढणारे तरुण, अवघ्या चौदाव्या वर्षी शरीरावर गोळी बार झेलणारे शिरीष कुमारसारखे तरुण पाहिले तर आजच्या या तरुण पिढीकडे हस्तांतरित करण्यात आलेल्या स्वातंत्र्याचा अर्थ त्यांना कधी कळेल का? असा प्रश्न पडतो. दि.१२ मार्च २०२१पासून स्वातंत्र्याच्या ७५व्या वर्षानिमित्त आजादी का अमृत महोत्सव या केंद्र शासनाच्या योजनेअंतर्गत राज्यात विविध कार्यक्रमांच्या आयोजनास सुरुवात झालेली आहे. त्या अनुषंगाने दिनांक ११ ऑगस्ट २०२१ रोजी माननीय मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली आजादी का अमृत महोत्सव म्हणजेच स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या उपक्रमाच्या आयोजनाबाबत विविध मंत्रालयीन मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव यांच्यासमवेत बैठक संपन्न झालेली आहे. या बैठकीमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. या उपक्रमांचे आयोजन देशाच्या स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षानिमित्त केंद्र शासनाने सुचित केल्यानुसार दि.१५ ऑगस्ट २०२३पर्यंत राज्यभर जनसामान्यांना सामावून घेऊन करण्याबाबत सूचना करण्यात आलेली आहे. त्या अनुषंगाने संस्कृती मंत्रालय, भारत सरकार यांनी आजादी का अमृत महोत्सव याच्या प्रयोजनार्थ गठीत केलेल्या समितीच्या धर्तीवर राज्यातील कार्यक्रमांचे आयोजन करण्यासाठी विविध क्षेत्रातील समितीला गठित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्या अनुषंगाने शासनाने आजादी का अमृत महोत्सव या अभियानासाठी शासन निर्णय दि.१३ ऑक्टोबर २०२१ रोजी बैठकीत घेतलेला आहे. त्या अनेक उपक्रमांच्या रुपात कोणाच्या सुपीक डोक्यातील भन्नाट कल्पना आहेत? माहित नाही बुवा.

     स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात आपल्याला एक गोष्ट मान्यच करावी लागेल, की भारतीय स्वातंत्र्याने आपल्याला खुप काही दिले आहे. परंतु जो असमाधानाचा, असंतोषाचा सूर आणि धूर निघत आहे, त्याला आपणच जबाबदार आहोत. आपली आर्थिक, सांस्कृतिक, औद्योगिक प्रगती झाली. पण...पण मूल्यांचा ऱ्हास होत गेला. म्हणूनच एकीकडे आपण वैज्ञानिक प्रगतीच्या मार्गाने झपाट्याने परिवर्तन करीत आहोत. परंतु त्याचवेळी दुसऱ्या बाजूने वेगाने वाढणाऱ्या भौतिक व अभौतिक समस्यांच्या दृष्ट विळख्यात आपण अडकल्याने स्वातंत्र्याचा श्वास गुदमरतोय. अशीच अवस्था पुढेही होऊ नये, म्हणूनच स्वातंत्र्याच्या या अमृत महोत्सवी वर्षानिमित राबविण्यात येणाऱ्या अभियानात सूज्ञ नागरिक बनून सावधपणे पावले टाकावीत. घरोघरी तिरंगा प्रत्येकानी उभारला पाहिजे, मात्र तत्पूर्वी त्या देशभक्ताने राष्ट्रध्वज संहिता व नियम आत्मसात केले पाहिजे. कारण तिरंगा हाताळणे माझ्यासारख्या ऐऱ्यागैऱ्याचे काम नाहीच! 

!! स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सर्वांना वंदे मातरम् !!

   श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरूजी.

  (वैभवशाली भारताच्या इतिहासाचे गाढे अभ्यासक) 

 गडचिरोली, मोबा- ७७७५०४१०८६.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या