🌟नांदेड येथील जेष्ठ पत्रकार प्रकाश कांबळे वाढदिवस विशेष....!



🌟विविध कौटुंबिक आघात सहन करीत प्रकाशनं केलेलं काम माझ्यासाठी नक्कीच कौतुकास्पद - एस.एम.देशमुख

मला आठवतंय, 

त्या दिवशी माझा वाढदिवस होता..

मशिन विभागात काम करणारा एक काळा सावळा, 22-23 वर्षांचा तरूण दबकत दबकत माझ्या केबिनमध्ये आला.. हातानं तयार केलेलं एक छानसं ग्रेटिंग त्यानं मला दिलं..

लगेच निघूनही गेला..

मी ग्रेटिंग उलगडून पाहिलं,

सुंदर हस्ताक्षरात लिहिलेली एक सुंदर कविता त्यावर होती.. ती वाचून,  स्वाभाविकपणे मी प्रभावित झालो.. क्षणात विचार आला,साहित्यिक अंक असलेला कवीमनाचा हा तरूण दैनिकाच्या मशिन विभागात काय करतोय?

याला संधी दिली पाहिजे..

संपादकीय विभागात घेतलं पाहिजे..

 दोन दिवसांनी रात्री ड्युटीवर आलेल्या प्रकाश कांबळेला मी केबिनमध्ये बोलावलं, संपादक विभागात काम करतोस का? म्हणून विचारलं?

त्याला हा धक्का होता..

कारण असं काही होईल हे त्याच्या स्वप्नातही नव्हतं..

तो म्हणाला, "सर संधी दिलीत तर नक्की करेल" त्याचं हे "हो" आत्मविश्वासानं भरलेलं होतं..

मग ठरलं..

मशिन विभागात मशिन साफ करण्याचं, मशिनला ऑईल पाणी करण्याचं काम करणारा प्रकाश नंतर दोन दिवसांनी संपादकीय विभागाचा घटक बनला..व्यवस्थापनाने स्वाभाविकपणे माझ्या या निर्णयाला विरोध केला, मशिनमधये काम करणारा पोरगा संपादकीय विभागात काय करणार? अशी विचारणा झाली..

मी माघार घेतली नाही..

प्रकाशवर प्रादेशिक विभागाची जबाबदारी सोपविली.. क्राईमच्या बातम्याही तो आणायचा.. सुंदर हस्ताक्षर,बातमी लिहिण्याची शैली, कवी मन, चांगला न्यूज सेन्स, वागण्या - बोलण्यातली मृदुता, कामावरची निष्ठा.. पत्रकारितेसाठी लागणारं हे सारं भांडवल त्याच्याकडं होतं.. त्यामुळं प्रकाश कांबळे हा माझा सर्वात जवळचा, आवडता सहकारी ठरला.. 

मी नांदेड सोडून अलिबागला गेल्यानंतरही प्रकाशवर माझं लक्ष होतं..तेथून मी त्याची ख्याली खुशाली विचारायचो.. वेगवेगळ्या दैनिकांसाठी काम करणारा प्रकाश जेव्हा एक दिवस एका स्थानिक दैनिकाचा संपादक झाला तेव्हा स्वाभाविकपणे मला आनंद तर झालाच त्याचबरोबर प्रकाशला संपादकीय विभागात संधी देण्याचा माझा निर्णय कसा योग्य होता याची खात्री पटली... 

सामांन्य कुटुंबातून आलेला, पत्रकारितेची कोणतीही कौटुंबिक पाश्र्वभूमी नसलेल्या प्रकाशनं नंतर स्वकर्तृत्वाने नांदेडच्या पत्रकारितेत आपलं वेगळं स्थान निर्माण केलं.. चांगला संघटक असलेल्या प्रकाशनं नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाचं नेतृत्व केलं, अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेसाठी देखील त्यानं मोठं योगदान दिलं.. परिषदेच्या नांदेड अधिवेशनात दिलेली जबाबदारी देखील त्यानं उत्तम प्रकारे पार पाडली.. होमगार्डचा कमांडन्ट झाला.. नांदेडच्या सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातही तो सक्रीय असतो.. सामान्यांच्या हक्काच्या, हिताच्या चळवळीतही त्याचा सक्रीय सहभाग असतो.. विविध कौटुंबिक आघात सहन करीत प्रकाशनं केलेलं काम माझ्यासाठी नक्कीच कौतुकास्पद आहे.. 

प्रकाशचा आज वाढदिवस..

त्यानिमित्त या मित्राला लाख लाख शुभेच्छा.. 

एस.एम देशमुख

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या