🌟परभणी जिल्ह्यात ई-पीक नोंदणीसाठी दोन दिवशीय विशेष मोहीम राबविणार - जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे


🌟एका गावातून किमान २०० शेतकऱ्यांची ई-पीक नोंदणी🌟

परभणी (दि.२६ सप्टेंबर २०२३) : जिल्ह्यातील शेतकऱ्यांची ई-पीक ॲपद्वारे त्यांच्या पीकपेऱ्याची १०० टक्के नोंदणी करून घेण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने ३० सप्टेंबर व १ ऑक्टोबर अशी दोन दिवस विशेष मोहीम राबवावी. या दोन दिवसात प्रत्येक गावातून किमान २०० अशी १ लाख ६९ हजार ६०० शेतकऱ्यांची नोंदणी करून घेण्याचे आदेश जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी दिले आहेत. 

परभणी जिल्ह्यात एकूण 848 गावे असून प्रत्येक गावातील किमान 200 शेतक-यांची नोंदणी पूर्ण केल्यास 1 लाख 69 हजार 600 पर्यंत उदि्दष्ट या मोहिमेतून साध्य होणार आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व संबंधित उपविभागीय अधिकारी यांनी सूक्ष्म नियोजन करून सदर मोहीम यशस्वी करावी. मोहिमेच्या यशस्वीतेसाठी गावनिहाय नियोजन व जनजागृती करावी. ही मोहीम यशस्वी काण्यासाठी तलाठी, कृषी सहायक, पोलीस पाटील, रोजगारसेवक, रेशन दुकानदार, शेतीमित्र, कोतवाल, प्रगतीशिल शेतकरी, आपले सरकार सेवा केंद्रचालक, सीएससी केंद्रचालक, संग्राम केंद्र चालक, कृषी महाविद्यालयातील विद्यार्थी, तरुण मंडळाचे पदाधिकारी अशा स्वयंसेवकांची निवड करावी. या मोहिमेत त्यांच्या सहाय्याने गावातील शेतक-यांना पीकपेरा भरण्याबाबत मार्गदर्शन करावे व पिकपेरा भरून घेण्याबाबत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व संबंधित उपविभागीय अधिकारी यांनी मोहिमेच्या दोन्ही दिवशी प्रत्येक दोन तासांनी आढावा घ्यावा. जिल्ह्यात 1  लाख 69 हजार 600 शेतक-यांचे पीक पेरा नोंदणी पूर्ण करून घेण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले आहे.

राज्यात ई-पीक पाहणी प्रकल्प राबविण्यात येत असून, पीक पेरणीची माहिती स्वतः शेतक-यांनी मोबाईल अॅपद्वारे गाव नमुना नंबर 12 मध्ये नोंदवायची आहे. जिल्ह्यात या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. तथापि खरीप हंगाम 2023 मध्ये सोमवारपर्यंत 60 टक्के क्षेत्राची ई-पीक पाहणी पूर्ण झाली आहे. कृषी विभागाचा सहभाग आवश्यक आहे. त्यानुषंगाने ई-पीक पाहणी मोबाईल अॅप्लिकेशनची माहिती व जनजागृती जिल्ह्यातील सर्व खातेदाराना शेतक-यांना व्हावी व त्यांच्या शेतातील पिकांची माहिती त्यांनी स्वतः गाव नं 7/12 वर नोंदविण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी 30 सप्टेंबर व  1 ऑक्टोबर 2023 रोजी मोहीम स्वरुपात प्रत्येक गावातील किमान 200 शेतक-यांची नोंदणी पूर्ण करण्याचे उदिष्ट निश्चित करण्यात आले आहे. त्यानुषंगाने प्रत्येक तालुक्यातील तहसिलदार आणि तालुका कृषि अधिकारी यांनी समप्रमाणात विभाजन करुन उदिष्टपूर्तीसाठी प्रयत्न करावेत. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी वरीलप्रमाणे तालुका कृषी अधिकारी यांच्याद्वारे उदिष्टपूर्ती करण्याचे आदेशही जिल्हाधिकारी श्री.गावडे यांनी दिले आहेत.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या