🌟परभणी जिल्ह्यात मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त चार दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन....!


🌟नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे जिल्हाधिकारी श्री.रघुनाथ गावडे यांचे आवाहन🌟


परभणी (दि.०८ सप्टेंबर २०२३) : मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्हा प्रशासनाकडून  जिल्ह्यात  दि. १४ ते १७ सप्टेंबर २०२३ या चार दिवसांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कालावधीमध्ये कवि संमेलन, क्रीडा तसेच विविध स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. नागरिकांनी या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले आहे. 

महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या समन्वयातून गुरुवार, दि. १४ रोजी सकाळी १० वाजता विद्यार्थी व हौशी गटाची चित्रकला स्पर्धा कल्याण सभामंडपम, जायकवाडी वसाहत येथे आयोजित केली आहे. तर त्याच दिवशी सायंकाळी ५ वाजता कविसंमेलन व इतर कार्यक्रमांचे आयोजन बी. रघुनाथ सभागृह, शिवाजी पुतळ्याजवळ येथे करण्यात आले आहे शुक्रवार दि. १५ रोजी सकाळी मनपा, जिल्हा आरोग्य विभाग, पोलीस आणि जिल्हा क्रीडा विभागाच्या संयुक्त विद्यमाने सकाळी ६.३० वाजता एकता दौड आणि सायकली रॅली आयोजित केली असून, ही रॅली इंदिरा गांधी जिल्हा क्रीडा संकुल - हुतात्मा स्मारक - राजगोपालचारी उद्यान, शिवाजी नगर या दरम्यान निघणार आहे. 

सकाळी १० वाजता सर्व जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अनुषंगाने चलतचित्रणाचे (व्हिडीओ) सादरीकरण करण्यात येणार आहे. त्यानंतर सायंकाळी ४ वाजता, अक्षदा मंगल कार्यालय, परभणी येथे मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अनुषंगाने डॉ. प्रभाकर देव यांच्या विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले असून, नागरिकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी श्री. गावडे यांनी केले आहे.शनिवार, दि. १६ रोजी सकाळी ६.३० वाजता इंदिरा गांधी जिल्हा क्रीडा संकुल, हुतात्मा स्मारक - राजगोपालचारी उद्यानादरम्यान विद्यार्थ्यांची प्रभातफेरी असेल. या प्रभातफेरीमध्ये परभणी शहरातील सर्व मोठ्या शाळांचा सहभाग राहणार आहे. 

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या अमृत महोत्सवाच्या दिनी रविवारी (दि.१७ रोजी) राजगोपालचारी उद्यानात मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. या मुख्य कार्यक्रमानंतर येथे स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार आणि बक्षीस वितरणाचा कार्यक्रम राहील. तर सायंकाळी ७ वाजता मराठवाड्याची लोकधारा व सांस्कृतिक कार्यक्रमाने या महोत्सवाची सांगता होईल. यामध्ये गीतगायन, पोवाडा आणि भारुड आदींचा समावेश असेल. त्यामुळे मराठवाड्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्हा प्रशासनाकडून आयोजित केलेल्या सर्वच कार्यक्रमांना नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले आहे....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या