🌟‘चाय पे चर्चा’ या कार्यक्रमाचे जिल्हाभरात आयोजन करण्यात येत आहे🌟
परभणी (दि.14 सप्टेंबर 2023) : मराठवाड्यात हे वर्ष मुक्तीसंग्राम दिनाचे अमृत महोत्सवी म्हणुन उत्साहात साजरा करत आहे. या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त संपूर्ण मराठवाड्यात वर्षभर विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याच अनुषंगाने जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय परभणी यांच्यामार्फत जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या ‘बालविवाह मुक्त परभणी’ अभियान अंतर्गत ‘चाय पे चर्चा’ या कार्यक्रमाचे जिल्हाभरात आयोजन करण्यात येत आहे.
याच अनुषंगाने आज दि.14 सप्टेंबर रोजी परभणी रेल्वे स्टेशन येथे बाल विवाह मुक्त परभणी अभियानातंर्गत ‘चाय पे चर्चा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात बालविवाह मुक्त परभणी अभियान व मराठवाडा मुक्तीसंग्राम या विषयावरील चर्चा करुन प्रश्नमंजूषा घेण्यात आली. तसेच अचूक उत्तरे देणाऱ्यांना चहा सोबत आकर्षक बक्षीस देण्यात आली.
या कार्यक्रमाचे उदघाटक अपर कोषागार अधिकारी निळकंट पाचंगे, परभणी रेल्वे स्टेशन प्रबंधक अरविंद इंगोले, रेल्वे पोलिस बलाचे श्री कावळे, अध्यक्ष तथा सदस्य बाल कल्याण समिती, बाल न्याय मंडळाचे सदस्य तसेच कैलास सत्यार्थी फाउंडेशनचे लक्ष्मण गायकवाड यांच्यासह अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी श्री पाचंगे यांनी तत्कालीन जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या संकल्पनेतून मागील दोन वर्षापासून जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या बालविवाह मुक्त परभणी अभियानाचे कौतुक करून ‘चाय पे चर्चा’ हा एक अभिनव उपक्रम राबविण्यात येत असल्याचे सांगितले. तसेच याद्वारे जनसामन्यापर्यंत बालविवाह प्रतिबंधक कायदा पोहचण्यास व त्यामुळे परभणी जिल्ह्यातील बालविवाहाचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल अशी आशा व्यक्त केली.
उपस्थित मान्यवरांनी यावेळी या कार्यक्रमाच्या माध्यमातून येणाऱ्या कालावधीत परभणी जिल्ह्यातील बालविवाहचे प्रमाण कमी झालेले दिसून येईल असे मत व्यक्त केले. तसेच बाल न्याय मंडळ सदस्य श्री पुराणिक यांनी या प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हाभर करण्यात यावे असे आवाहन केले कार्यक्रमाच्या प्रास्ताविक जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कैलास तिडके यांनी केले. यावेळी कार्यक्रमास रेल्वे स्टेशनवर उपस्थित प्रवासी व इतर नागरिकांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला.....
0 टिप्पण्या