🌟कार्यकर्ता प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न;जादूटोणाविरोधी कायद्याच्या दशकपूर्ती निमित्त महा अंनिसचा उपक्रम.....!


🌟मंगरूळपीरकरांनी घेतली अंधश्रद्धा निर्मूलनाची शपथ🌟

वाशिम :- मंगरूळपीर येथील स्थानिक पंचायत समितीच्या श्री सुभाषराव ठाकरे सभागृहामध्ये महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती तर्फे एक दिवशीय कार्यकर्ता प्रशिक्षण, जादूटोणाविरोधी कायदा व चमत्कार सादरीकरण कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी महा अनिसचे विजय शिंदे तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून पी. एस. खंदारे लाभले होते. या कार्यक्रमाला विस्तार अधिकारी वायले , माजी गटशिक्षणाधिकारी पवणे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रमेश मुंजे, आदर्श शिक्षक ताजने, संभाजी ब्रिगेड जिल्हा संघटक गजानन व्यवहारे, महाअंनिस मंगरुळपिर शाखाध्यक्ष भोंडने, बुवाबाजी विभाग प्रमुख नाजूकराव भांडणे आदी मान्यवरांची उपस्थिती आणि मार्गदर्शन लाभले. 


अंधश्रद्धा ही समाजाला लागलेली कीड असून तिचे निर्मूलन काळाची गरज असल्याचे मत पवणे  यांनी व्यक्त केले. चमत्कार सादरीकरणाच्या कार्यशाळा सातत्याने आयोजित करण्याची आवश्यकता रमेश मुंजे यांनी विशद केली. शिक्षक हा समाजाला अंधश्रद्धेपासून मुक्त करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडू शकतो परंतु जर विज्ञान शिक्षकच अंधश्रद्धा पाळत असेल तर इतरांनी काय आदर्श घ्यावा? असा महत्वपूर्ण सवाल आदर्श शिक्षक ताजणे यांनी उपस्थित केला. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या या चळवळीमध्ये संभाजी ब्रिगेडची साथ महा अनिसला सतत राहील असे मत गजानन व्यवहारे यांनी व्यक्त केले. 

डॉ. नरेंद्र दाभोळकर यांना अपेक्षित असलेला कार्यकर्ता कसा असावा याविषयी मार्गदर्शन करताना विजय शिंदे म्हणाले की, कार्यकर्त्यांनी समाजाला आदर्श वाटेल अशी दिनचर्या ठेवून आपली सामाजिक भूमिका पार पाडावी. संघटनेला बळकटी देणारी पावलं उचलून अंधश्रद्धा निर्मूलनाची ही चळवळ प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवण्याचा आवाहन त्यांनी केल. जादूटोणा विरोधी कायदा मधील तरतुदी कलमानिहाय विस्तृत माहिती पी. एस.खंदारे यांनी सप्रयोग सादर करून सांगितल्या. पाण्यावर दिवा लावणे, हवेतून वस्तू गायब करणे, जड वस्तूला आधार न देता खाली पडू न देणे इत्यादी प्रयोग त्यांनी करून दाखवले.  चमत्कार कुणाला करता येत नाही, ती केवळ हात चलाखी असते. मी चमत्कार करतो असे सांगणारे लबाड असतात, अशा लबाडांच्या नादी लागून स्वतःचे आर्थिक, शारीरिक व मानसिक शोषण होण्यापासून दूर सल्ला त्यांनी दिला. 

            या कार्यशाळेचे आयोजन मंगरूळपीर, पंचशील नगर व मोहरी शाखेतर्फे करण्यात आले होते. द लाईट ऑफ लाइफ ट्रस्ट मधील आनंद प्लस प्रकल्पातील विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेला मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी गवारगुरु, भारत ठोंबरे, जयश्री भडांगे, सीमा शृंगारे, देवानंद कांबळे, गौरव भगत आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाची सुरुवात अंधश्रद्धा निर्मूलनावर आधारित प्रबोधनात्मक गिताने झाली तर समारोप हम होंगे कामयाब या गीताने झाला, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा प्रधान सचिव प्रा.महेश देवळे यांनी केले तर आभार भारत ठोंबरे यांनी केले.

प्रतिनिधनधी:-फुलचंद भगत

मंगरुळपीर/वाशिम


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या