🌟मराठवाडा ही लढवैय्या नेतृत्वाची भूमी - प्रा.डॉ.महेश जोशी


🌟परभणी हा वैचारिक नेतृत्व करणारा जिल्हा : निजाम काळात परभणी जिल्ह्यातील १०० गावे स्वतंत्र घोषित🌟


  
परभणी (दि.16 सप्टेंबर 2023) : मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा इतिहास हा देदिप्यमान असून, येथील मातीत पूर्वीपासूनच लढवैये नेतृत्व जन्माला आले आहेत. त्यामुळे ही लढवैय्या नेतृत्वाची भूमी आहे. असे सांगून परभणी हा वैचारिक  नेतृत्व करणारा जिल्हा असल्याचे प्रतिपादन प्रा. डॉ. महेश जोशी यांनी केले. मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त बी. रघुनाथ सभागृह येथे जिल्हा प्रशासन, महानगर पालिका आणि शिक्षण विभागाकडून आयोजित व्याख्यानमालेत ते विशेष व्याख्याते म्हणून बोलत होते. 

जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, प्रकल्प संचालक श्रीमती रश्मी खांडेकर, शिक्षणाधिकारी गणेश शिंदे, अपर जिल्हा कोषागार अधिकारी नीलकंठ पाचंगे व्यासपीठावर उपस्थित होते.

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतीय संस्थाने खालसा करताना राष्ट्रीय नेतृत्वाला एकाच वेळी दोन पातळ्यांवर लढा द्यावा लागत होता. त्यामुळे मराठवाडा मुक्तिसंग्रामामध्ये विचारपूर्वक पावले उचलावी लागत होती. त्यावेळी आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गंत असलेली राजकीय अस्थिर आणि अनिश्चित परिसि्थती, सांस्कृतिक पार्श्वभूमी लक्षात घेणे अत्यंत आवश्यक होते. निजामाशी स्थानिक नेतृत्वाने वर्षभर लढा देण्याशिवाय पर्यायच नव्हता असे सांगून डॉ. जोशी यांनी तत्कालीन राजकीय इतिहास अलगद आणि वेगवेगळ्या पैलूचा उलगडा करून उपस्थितांना समजावून सांगितला. 

मराठवाड्याची प्रादेशिक ओळख करून देताना येथील तत्कालीन जिल्हे, असलेली भौगोलिक रचना, त्यात असलेली विविधता, त्यानुसार निजामाशी लढण्यासाठी स्वातंत्र्यसैनिकांना करावी लागणारी शिकस्त, येथील प्राचीन इतिहासाची परंपरा, सत्ताधा-यांचा प्रदेश, सांस्कृतिकदृष्ट्या एकजीव असलेला प्रदेश, येथील आर्थिकदृष्ट्या असलेली संपन्न गावे, ठाणी याबाबत श्री. जोशी यांनी सविस्तर कथन केले.  तसेच मराठवाडा मुक्तिसंग्रामातील अग्रणी नेतृत्व स्वामी रामानंद तीर्थ, नरहर कुरुंदकर, गोविंदभाई श्रॉफ, चारठाणकर, यांच्यासह मराठवाड्यातील अगणित लढवैय्या स्वातंत्र्यसैनिकांचे मुक्तिसंग्रामातील योगदान या विषयावर प्रकाश टाकला. 

निजामाचा इतिहास सांगताना त्याने घेतलेले तत्कालीन अचूक राजकीय निर्णय, त्यांची होणारी अंमलबजावणी, निजामाची सत्ता, त्या सत्तेला कोणीही शह देऊ नये, यासाठी घेतलेली दक्षता, राजकीयदृष्ट्या आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गंत संस्थानिकांशी वाढविलेले संबंध, इंग्रजांशी ठेवलेला जनसंपर्क, मदत आदींचा इतिहासही यावेळी त्यांनी उलगडून सांगितला. 

इंग्रज आणि निजामाचे असलेले संबंध, देशातील प्रबोधनाचे अवतरलेले युग, येथे सुरु झालेल्या समाजसुधारकांच्या चळवळीया बाबींचा त्यांनी ऊहापोह केला. मराठवाडा मुक्त करताना येथील मुलांना शिक्षण मिळावे. त्या शिक्षणातून विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती जागृत व्हावी, यासाठी त्याकाळात सुरु केलेल्या परभणी, सेलूतील नूतन विद्यालय, संभाजीनगरातील सरस्वती भुवन, बीड जिल्ह्यातील योगेश्वरी विद्यालय आदी शैक्षणिक संस्थांचा त्यांनी उल्लेख केला. 

मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा लढा हा स्वातंत्र्य, समता, बंधुता आदी लोकशाही मूल्यांवर विश्वास ठेवणारा, त्या लोकशाही मूल्यांसाठी लढणारा आणि त्याचे जतन आणि संवर्धन करणारा लढा होता,असेही सांगताना डॉ. जोशी यांनी आम्ही जबाबदार राज्यपद्धती मागायला लागलो. यासाठी पहिला सत्याग्रह परभणी येथून सुरु झाला. त्यानंतर अनेक सत्याग्रह झाल्याचे डॉ. जोशी यांनी सांगितले. 

 मराठवाडा मुक्तिसंग्रामातील लढायांची माहिती सांगताना डॉ. जोशी यांनी स्वातंत्र्यसैनिकांच्या जंगल सत्याग्रहावर भर दिला. जंगल सत्याग्रहामुळे अनेक गावातील नागरिकांनी स्वत:चे उत्पन्नाचे साधन असलेली सिंदीची झाडे तोडल्याचे सांगून निजामाची आर्थिक रसद तोडली. त्यावेळी परभणी जिल्ह्यातील १०० गावे नागरिकांनी स्वतंत्र झाल्याचे घोषित केल्याचेही प्रा. डॉ. महेश जोशी यांनी सांगितले. 

तत्पूर्वी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्यासह उपस्थितांनी सरदार वल्लभभाई पटेल, स्वामी रामानंद तीर्थ आणि बी. रघुनाथ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवदन केले. तसेच दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. 

 अपर जिल्हा कोषागार अधिकारी नीळकंठ पाचंगे यांनी प्रास्ताविकातून प्रमुख व्याख्याते डॉ. महेश जोशी यांचा परिचय करून दिला. प्रेमेंद्र भावसार यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तर आभार श्री. पाचंगे यांनी मानले...


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या