🌟‘प्रगती’ अभियानात सहभागी होण्याची 16 ऑक्टोबर पर्यंत संधी......!

 


🌟स्पर्धेसाठी ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यासाठी राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान🌟

परभणी (दि.05 ऑक्टोंबर) : प्रशासन लोकभिमुख करणे, त्यात निर्णयक्षमता आणणे आणि सर्वाच्या सहकार्यातून उत्तम प्रशासन कार्यान्वीत करणे यासाठी शासन निर्णयान्वये “राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धा” सन 2023-24 वर्षासाठी जिल्ह्यात राबविण्याचे आदेश दिले होते. प्रगती अभियानाची कार्यक्षेत्रे व निकष निश्चित केली असून, या अभियान व स्पर्धेचा कृती कालावधी 20 ऑगस्ट ते 2 ऑक्टोबर असा होता. या योजनअंतर्गत घेण्यात येणा-या स्पर्धेसाठी ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यासाठी राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धेसाठी pragatiabhiyan.maharashtra.gov.in  हे संकेतस्थळ विकसीत करण्यात आले. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी 16 ऑक्टोबर ही अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत आहे.

शासकीय सेवांच्या गुणवत्तेत वाढ करणे, लोकभिमुखता आणणे, धोरणात्मक सेवांची प्रभावीपणे अंमलबजावणी करणे, ई-ऑफीसची अंमलबजावणी, ऑनलाईन पोर्टलवरील तक्रारींचा निपटारा करणे, संसाधनाचा पर्यायी वापर करणे, तंटा, तक्रारमुक्त कार्यालय, नाविन्यपूर्ण व पथदर्शी स्वरुपाच्या संकल्पना, प्रयोग किंवा उपक्रम राबवणे आणि ई-पंचनाम्यामध्ये उत्कृष्ट काम करणारे कर्मचारी तसेच वैयक्तीक पातळीवरही यामध्ये कर्मचाऱ्यांना सहभागी होणे आदींचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे.  

स्पर्धेसाठी 20 ऑगसटपासून एका वर्षाचा कालावधी विचारात घेण्यात आला असून, प्रशासकीय सुधारणेविषयी प्रस्ताव व कल्पना यासाठी मात्र कालावधी अट नसेल. उपविभागाचे मुख्यालय असलेल्या तालुक्याच्या ठिकाणी उपविभागीय अधिकारी आणि इतर तालुक्यात तहसीलदार हे तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीचे सरंपच, ग्रामसेवक, तलाठी व गटविकास अधिकारी यांना निमंत्रित करणार आहेत. तालुका स्तरावरील अधिका-यांच्या सभेमध्ये प्रगती अभियानाची संकल्पना मांडतील. याच सभेमध्ये सहभागी होण्यासाठी आमदार, जिल्हा परिषद सदस्य व सभापती, पंचायत समिती यांना विशेष आमंत्रित करण्यात येणार आहे.   

या कालावधीमध्ये राबविण्यात येणारी इतर अभियाने, कार्यक्रम उदा. महसूल अभियान, पंचायतराज अभियान, इंद्रधनुष्य अभियान इ. समांतरपणे मूळ स्वरुपामध्ये चालू राहणार आहेत. त्यामध्ये करण्यात येणा-या कामगिरीचा समावेश अभियानाच्या कार्यक्षेत्रांमध्ये बसत असेल तेथे करता येईल. या स्पर्धेत जास्तीत जास्त अधिकारी –कर्मचारी यांनी सहभागी होण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती अनुराधा ढालकरी यांनी केले आहे.....

*****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या