🌟सणासुदीत भेसळ केल्यास कठोर कारवाई - अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे


🌟परभणी जिल्ह्यातील भेसळ बहाद्दरांना अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे यांचा इशारा🌟 

परभणी (दि.12 ऑक्टोंबर) : आगामी काळात येणारे नवरात्र, दसरा व दिवाळी या सणांचा कालावधी लक्षात घेता मिठाई व दुग्धजन्य पदार्थाचा मोठा वापर व विक्री होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दूध, दुग्धजन्य पदार्थ बनविणारे व विक्री करणा-या व्यापाऱ्यांकडील मालाच्या दर्जाची तपासणी गतिमान करण्याचे आदेश अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे यांनी संबंधित विभागास दिले. तसेच खाद्यपदार्थांमध्ये भेसळ करणा-या व्यापाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी दिले.


जिल्हाधिकारी कार्यालयात आज अपर जिल्हाधिकारी डॉ. काळे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये डॉ. काळे बोलत होते राज्य शासनाच्या निर्णयान्वये  दूध व दुग्धजन्य पदार्थातील भेसळ रोखण्यासाठी जिल्हास्तरीय समिती अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आली असून, या समितीमध्ये अपर पोलीसअधीक्षक यशवंत काळे, अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त (अन्न), जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त  डॉ. पी. पी. नेमाडे, वैध मापन शास्त्र विभागाचे उप नियंत्रक हे सदस्य आहेत. तर जिल्हा व्यवसाय विकास अधिकारी हे या समितीचे सदस्य सचिव आहेत.

आगामी सणासुदीच्या काळामध्ये मिठाईसह अन्य खाद्यपदार्थांना ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणावर मागणी असते. या बाबींचा गैरफायदा विक्रेत्यांकडून घेतला जातो व अशा अन्न पदार्थांमध्ये भेसळ केली जाते. त्यामुळे सर्व सेवा देणा-या संबंधित विभागांनी योग्य ती खबरदारी घ्यावी. जेणेकरून सामान्य नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होणार नाहीत, अशा सूचना  अपर जिल्हाधिकारी डॉ. काळे यांनी दिल्या. तसेच दूध व दुग्धजन्य पदार्थामध्ये भेसळ आढळून आल्यास कायदेशीर तरतुदीनुसार कठोर कार्यवाही करण्याचे आदेशेही त्यांनी दिले. तसेच ग्राहकांना दूध अथव दुग्धजन्य पदार्थामध्ये भेसळ होत असल्याचे प्रकार निदर्शनास आल्यास त्यांनी ९८३४९०६६६३ व  ७०२८२७५००१ या हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.....   

*****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या