🌟छत्रपती संभाजी नगर येथे सासरच्या शारीरिक मानसिक त्रासाला कंटाळून डॉक्टर तरुणीने केली ॲसिड पिऊन आत्महत्या....!


🌟या घटने संदर्भात सातारा पोलीस स्थानकात पती व सासू विरोधात गुन्हा दाखल🌟 

छत्रपती संभाजीनगर (दि.०४ ऑक्‍टोबर) : छत्रपती संभाजीनगर येथील नक्षत्रवाडी परिसरातील साईश्रद्धा अपार्टमेंट मध्ये पती सासू सोबत राहणाऱ्या विवाहित डॉक्‍टर तरुणीने पती व सासू कडून होणाऱ्या सततच्या शारीरिक मानसिक छळाला कंटाळून ॲसिड पिऊन आत्‍महत्‍या केल्याची घटना हृदयविदारक घटना दि.०१ ऑक्‍टोबर २०२३ रोजी सकाळच्या सुमारास घडली. तिला आत्‍महत्‍येस प्रवृत्त केल्या प्रकरणी सातारा पोलिसांनी तिच्या पती व सासू विरोधात गुन्हा दाखल केला आहे आत्‍महत्‍या केलेल्या तरुणीचे नाव डॉ.पूजा किरण पुरी असे आहे.

बिड जिल्ह्यातील आष्टी येथील शासकीय रुग्णालयात डॉ.पूजा किरण पुरी (बीएएमएस) ही सीएचओ म्हणून कार्यरत होती सध्या डॉ.पुजा ही पैठण रोडवरील मातोश्री रुग्णालयात मागील ९ महिन्यांपासून डॉक्‍टर म्हणून कार्यरत होती. या घटने संदर्भात मयत पुजाचा भाऊ अजिंक्‍य अशोक गिर राहणार स्‍नेहदीप अपार्टमेंट, सहयोग कॉलनी, लातूर यांनी दिलेल्या तक्रारीवरून पूजाचा पती किरण ओमप्रकाश पुरी व सासू शकुंतला ओमप्रकाश पुरी यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पुजाचा पती किरण पुरी हा जालना येथे ओरिएंटल हेल्थ इन्शूरन्स कंपनीत मॅनेजर आहे. 

डॉ.पुजा हिचे लग्न मागील वर्षी १९ फेब्रुवारी २०२२ रोजी झाले होते. लग्नानंतर तिला एक महिनाच पती व सासूने चांगली वागणूक दिली. नंतर शारीरिक व मानसिक छळ करण्यास सुरूवात केली. तिला आष्टीची नोकरी सोडायला लावली. नंतर पतीच्या सांगण्यावरूनच मातोश्री रुग्णालयात नोकरी सुरू केली. तिचा पती व सासू वेळेत घरी येत जा असे म्‍हणून कायम छळ करायचे. घरातील किराणा सामान लपवून ठेवायचे. तुला स्वयंपाक करता येत नाही म्‍हणायचे. तुला इथे राहायचे असेल तर तुझ्या आईकडून घर घेण्यासाठी ५ लाख रुपये आण, अशी मागणी करायचे. पती कायम चारित्र्यावर संशय घेऊन शिविगाळ करून त्रास द्यायचा. जानेवारीत ती प्रेग्‍नंट राहिली असता त्‍याने आताच मूल नको म्‍हणून त्रास दिला. त्‍यामुळे तिचा गर्भपात झाला.

यावर्षी एप्रिलमध्ये पतीचे तिचा गळा दाबला होता. १ ऑक्‍टोबरला सकाळी साडेनऊला किरणने पूजाच्या भावाला कॉल करून सांगितले, की तुझ्या बहिणीला घेऊन जा. एकतर ती जीवंत राहील किंवा मी राहील, असे सांगून फोन ठेवून दिला. दुपारी १२ च्या सुमारास किरणने पुन्हा फोन करून सांगितले, की पूजाने ॲसिड पिले असून, तिला आम्‍ही कमलनयन बजाज हॉस्पिटलमध्ये घेऊन जात आहोत. त्‍यानंतर पुन्हा त्‍याचा फोन आला व सांगितले, की पूजाचा मृत्‍यू झाला आहे व तिला उत्तरीय तपासणीसाठी घाटी रुग्णालयात नेत आहोत. त्‍यामुळे अजिंक्‍य व त्‍याची आई लातूरवरून थेट घाटी रुग्णालयात गेले. पूजाचा मृतदेह ताब्‍यात घेतल्यानंतर अंत्‍यसंस्कार आटोपल्यानंतर अजिंक्‍यने सातारा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्‍यावरून पोलिसांनी पती व सासूविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक देविदास शेवाळे करत आहेत....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या