🌟दिव्यांगाच्या दारी अभियान पुढं ढकलणाऱ्या अधिकाऱ्यांची दिव्यांग कल्याण विभागाच्या सचीवांमार्फत चौकशी करा🌟
🌟प्रहार जनशक्ती पक्षाची बच्चुभाऊ कडू यांच्या कडे मागणी🌟
दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी या अभियानाचे मुख्य मार्गदर्शक मा.ना. बच्चुभाऊ कडु (मंत्रीपद दर्जा) यांच्या मार्गदर्शनाखाली परभणी जिल्हयामध्ये दि. १० ऑक्टोंबर २०२३ रोजी होणारा दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी हा कार्यक्रम प्रशासनाच्या खोडसाळपणामुळे व राजकीय दबावामुळेच पुढे ढकलण्यात आलेला असून या प्रकरणाची दिव्यांग विभागाच्या सचिवा मार्फत समिती नेमून सखोल चौकशी करा अशी मागणी आज प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने अभियानाचे मुख्य मार्गदर्शक ना. बच्चुभाऊ कडू यांच्या कडे जिल्हाधिकारी परभणी यांच्या मार्फत करण्यात आली.
दि.२८ जुलै २०२३ च्या दिव्यांग कल्याण विभागाच्या परिपत्रकानुसार जिल्हा प्रशासनाला दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी हे शासकीय कार्यक्रम अभियान घेण्याकरीता आडीच महिन्याचा आवधी देण्यात आला होता परंतु नियोजित कार्यक्रमाच्या पाच दिवस आधी कार्यक्रम नियोजनासाठी वेळ पुरेसा नसल्याचे कारण सांगुन हे अभियान पुढे ढकलणे ही अत्यंत गंभीर बाब आहे.
परभणी जिल्हयामध्ये नोंदणीकृत दिव्यांगांची संख्या (यू डीआयडी कार्ड धारक) तीस हजारांच्या आसपास असतांनाही या अभियानासाठी केवळ सहा हजार दिव्यांगांची नोंदणी करण्यात आली होती. अभियान दि. १० ऑक्टोबर २०२३ रोजी असताना दि. ०५ ऑक्टोंबर २०२३ पर्यंत कार्यक्रमाचे स्थळ निर्धारित करण्यात आले नव्हते शिवाय कार्यक्रमा बाबत जनजागृती व प्रसिध्दी करण्यात आली नव्हती. तसेच जिल्ह्यातील शहरी भागामध्ये दिव्यांगांची नोंदणी देखील करण्यात आली नव्हती.
संबंधीत अभियान यशस्वी करण्याची जबाबदारी असलेल्या जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण अधिकारी फक्त बैठकीचे कागदी घोडे नाचविण्यात च व्यस्त होते. यावरुन जिल्हयातील यंत्रणा ही दिव्यांगा बाबत अजिबात गंभीर नाही हे सिध्द होते.
संबंधीत अभियान हे शासकीय अभियान असतानाही केवळ प्रशासकीय यंत्रणेच्या खोडसाळपणा मुळे व राजकीय दबावापोटी संबंधीत अभियान पुढे ढकलण्याचा प्रकार करुन जिल्हयातील दिव्यांगाना शासकीय योजनांपासून वंचित ठेवण्याचे काम ज्यांच्यावर अभियान यशस्वी करण्याची जबाबदारी होती त्याच अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक व नियोजनबध्द पध्दतीने केल्याचा आरोप प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने करण्यात आला आहे. संबंधित प्रकरणाची गंभीर दखल घेऊन दिव्यांग कल्याण विभागाच्या सचिवां मार्फत एक चौकशी समिती नेमुन या प्रकरणाची सखोल चौकशी करावी तसेच अभियान जिल्ह्यात होऊ नये यासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांवर कठोर कार्यवाही करुन जिल्हयातील दिव्यांगाना न्याय द्यावा असे ही या निवेदनात म्हटले आहे.
निवेदनावर प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख शिवलिंग बोधने, उपजिल्हाप्रमुख रामेश्वर जाधव, तालुका प्रमुख उद्धव गरुड, शहर प्रमुख अंकुश गिरी, शहर चिटणीस वैभव संघई, शहर चिटणीस ॲड. सुवर्णा देशमुख, उपशहर प्रमुख सो. सुषमा देशपांडे, रामेश्वर पुरी, कृष्णा शिंदे, शेख बशीर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत....
0 टिप्पण्या