🌟परभणी तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींमध्ये पोटनिवडणूक....!


🌟या कार्यक्रमानुसार निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करण्याचा दिनांक शुक्रवारी ६ ऑक्टोबर २०२३ आहे🌟 

परभणी : राज्य निवडणूक आयुक्तांच्या अधिसूचनेनुसार परभणी तालुक्यातील ताडपांगरी, वरपूड आणि किन्होळा ग्रामपंचायतीमधील प्रत्येकी एका प्रभागासाठी पोटनिवडणूक घेण्यात येणार आहे. त्यामुळे निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून या प्रभागांमध्ये निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाली असल्याचे तहसीलदार (निवडणूक) यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.  

राज्य निवडणूक आयोगाच्या ३ ऑक्टोबर २०२३ रोजीच्या पत्रकान्वये परभणी तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींच्या दर्शविलेल्या प्रभागांमध्ये पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या कार्यक्रमानुसार निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करण्याचा दिनांक शुक्रवारी ६ ऑक्टोबर २०२३  हा असून, नामनिर्देशनपत्रे मागविणे आणि ती निर्देशित ठिकाणी सोमवार दि. १६ ते शुक्रवार, दि. २० ऑक्टोबरदरम्यान सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत सादर करता येणार आहेत. सोमवारी दि. २३ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी ११ वाजेपासून  नामनिर्देशनपत्रांची छाननी करण्यात येणार आहे.  

निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिम झालेल्या उमेदवारांची यादी बुधवार, दि. २५ ऑक्टोबर २०२३ रोजी दुपारी ३ वाजेनंतर प्रसिद्ध करण्यात येईल. आवश्यकता असल्यास ५ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदान घेण्यात येईल. सोमवारी, ६ नोव्हेंबर २०२३ रोजी मतमोजणी आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने निकाल घोषित करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवडणुकीच्या निकालाची अधिसूचना गुरुवारी ९ नोव्हेंबर २०२३ पर्यंत प्रसिद्ध करण्यात येईल, असेही तहसीलदार यांनी कळविले आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार या निवडणूक कालावधीमध्ये निवडणूक प्रभागातील मतदारांवर विपरित प्रभाव टाकणारी कोणतीही कृती किंवा घोषणा लोकप्रतिनिधींना आचारसंहिता कालावधीत करता येणार नाही, असेही या प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे......    


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या