🌟तुती लागवड करा अन् भरघोस अनुदान मिळवा - जिल्हा रेशीम अधिकारी


🌟रेशीम योजने अंतर्गत केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना कार्यान्वीत🌟

परभणी : रेशीम शेती इतर पिकांच्या तुलनेत भरघोस उत्पादन मिळवून देत असून, शेतक-यांचा आर्थिकस्तर उंचावत असल्याचे दिसून आल्याने शासनाने रेशीम उद्योग विकासासाठी महारेशीम अभियान सुरु केले आहे. तरी जास्तीत जास्त शेतक-यांनी तुती लागवड करून भरघोस अनुदानासह उत्पन्न मिळविण्याचे आवाहन जिल्हा रेशीम विकास अधिकारी यांनी केले आहे. 

रेशीम योजने अंतर्गत केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना कार्यान्वीत असून, जिल्हा रेशीम कार्यालय, कृषि विभाग तसेच पंचायत समिती यापैकी शेतक-यांना सोईस्कर होईल त्यांच्याकडून रेशीम योजने अंतर्गत अनुदानाचा लाभ घेता येणार आहे. त्यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी नावनोंदणी करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. 

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत तीन वर्षासाठी प्रति एक एकर ३ लाख ९७ हजार ३३५ रुपये तुती लागवड. किटक संगोपनगृह बांधकाम मजुरी व साहित्यासाठी देण्यात येते. कृषी विभागाच्या पोकरा योजनेंतर्गत तुती लागवडीसाठी सर्वसाधारण लाभार्थ्यासाठी ७५ टक्के अनुदानावर ४५ हजार व किटक संगोपनगृह बांधकामासाठी  सर्वसाधारण लाभार्थ्यांना ७५ टक्के अनुदानावर १ लाख २६ हजार ४८९ रुपये व अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीसाठी ९० टक्के अनुदानावर १ लाख ५४ हजार ७७५ रुपये तसेच किटक संगोपन साहित्य सर्वसाधारण लाभार्थ्याकरीता ७५ टक्के अनुदानावर ५६ हजार २५० रुपये व अनुसुचित जाती, अनुसूचित जमातीसाठी ९० टक्के अनुदान ६७ हजार ५०० रुपये दिले जातात.

मनरेगा व पोकरा या दोन्ही योजनेचा लाभ घेता येत नाही, अशा सर्व लाभार्थ्यांसाठी केंद्र पुरस्कृत सिल्क समग्र-२ योजने अंतर्गत दोन एकर रेशीम शेतीसाठी अनुदान साडेचार लाख रुपयांमधून सर्वसाधारण लाभार्थ्यांसाठी ७५ टक्के अनुदान व अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीसाठी ९० टक्के अनुदान देण्यात येणार आहे. एक एकर रेशीम शेतीसाठी अनुदान ३ लाख २५ हजार रुपयांमधून सर्वसाधारण लाभार्थ्यांकरिता ७५ टक्के अनुदान व अनुसूचित जाती-जमातीसाठी ९० टक्के अनुदान देण्यात येणार आहे, असे रेशीम विकास अधिकारी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे..... 

*****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या