🌟जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने आज ‘माहिती अधिकार दिन’ साजरा🌟
परभणी (दि.06 ऑक्टोंबर) : सार्वजनिक प्राधिकरणांनी स्वयंप्रेरणेने संकेतस्थळावर माहिती उपलब्ध करून दिल्यास माहितीच्या अधिकारांतर्गत नागरिकांना अर्ज करण्याची गरजच भासणार नाही. तसेच अर्जदाराने माहिती अधिकारांतर्गंत मागितलेली माहिती तात्काळ देत अर्जाचा निपटारा करावा, असे आवाहन तहसीलदार सुरेश घोळवे यांनी केले.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने आज ‘माहिती अधिकार दिन’चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी श्री. घोळवे बोलत होते.
ऑनलाईन माहिती उपलब्धतेमुळे शासकीय प्राधिकरणावरील कामाचा ताण कमी होईल. प्रशासनाची माहिती जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत व जलद गतीने पोहोचविण्यासाठी शासनस्तरावर जनमाहिती अधिकारी चांगली भूमिका पार पाडू शकतात. माहिती अधिकारांतर्गंत आपल्या आस्थापनेकडून आलेल्या प्रकरणाची निर्धारित कालमर्यादेची वाट न पाहता वेळीच निकाली काढून हातावेगळी केल्यास त्याचा संबंधित जनमाहिती अधिकाऱ्यालाच फायदा होतो. त्यामुळे जनमाहिती अधिकारी किंवा सहायक जनमाहिती अधिकारी यांनी आलेले माहिती अधिकारांचे अर्ज तपासून घ्यावेत. त्या अर्जाद्वारे अर्जदाराने नेमकी कोणती माहिती मागितली, याबाबत माहिती घेत असे अर्ज तात्काळ निकाली काढल्यास नागरिकांमध्ये राज्य शासन आणि प्रशासनाची प्रतिमा उंचावण्यास मदतच होते, असेही तहसीलदार श्री. घोळवे यांनी यावेळी सांगितले.
प्रशासकीय कामकाजावर परिणाम होवू नये म्हणून प्राधिकरणांनी आपल्या माहितीचे डिजिटलायझेशन करून ऑनलाईन माहितीचा मार्ग नागरिकांसाठी मोकळा करून देण्याची आवश्यकता त्यांनी प्रतिपादित केली. माहितीचा अधिकार या कायद्यामुळे प्रशासनाचे उत्तरदायित्व व कामकाजातील पारदर्शकता वाढली असल्याचे ते म्हणाले. तसेच सर्व माहिती ऑनलाईन उपलब्धता ही बदलत्या काळानुसार नागरिकांना अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले.
तहसीलदार श्रीराम बेंडे यांनी प्रास्ताविकेतून या कार्यक्रमाच्या आयोजनाची माहिती दिली. या कार्यक्रमाला विविध शासकीय आस्थापनांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.....
*****
0 टिप्पण्या