🌟गंगाखेड उपविभागीय आणि तहसील कार्यालयाचे भूमीपूजन संपन्न....!


🌟उपविभागीय अधिकारी व तहसील कार्यालयाचे कुदळ मारून आमदार डॉ.रत्नाकर गुट्टेंच्या हस्ते भूमीपूजन करण्यात आले🌟 


परभणी, (दि.०२ ऑक्टोंबर) : गंगाखेड उपविभागीय अधिकारी आणि तहसील कार्यालयाचे कुदळ मारून आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्या हस्ते भूमीपूजन करण्यात आले कार्यक्रमाच्या‌ अध्यक्षस्थानी खासदार संजय जाधव, तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांची उपस्थिती होती.  व्यासपीठावर उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिपरसे, गटविकास अधिकारी जयराम मोडक, गंगाखेड नगर परिषदेचे मुख्याधिकारी तुकाराम कदम,  उप अभियंता बालाजी पवार आदी यावेळी उपस्थित होते.


गंगाखेड उपविभागीय अधिकारी कार्यालय आणि तहसील कार्यालयाच्या भविष्यात होणाऱ्या सुसज्ज इमारतीमुळे येथील जनतेची कामे वेगाने होतील असा विश्वास खासदार संजय जाधव यांनी यावेळी व्यक्त केला गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील विविध विकासकामांसाठी लागणाऱ्या निधीची उपलब्ध करून दिल्याचे सांगून आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी दक्षिण काशी म्हणून ओळख असणाऱ्या गंगाखेड शहरातील विकासकामांची माहिती दिली रेल्वे उड्डाणपूल, सांस्कृतिक सभागृह, क्रीडा संकुल, जलतरण तलाव, संत जनाबाई मंदिर विकास, भक्त निवास, नाट्यगृहाचे बांधकाम, जलनिस्सारण केंद्र, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा इतिहास, छत्रपती शिवाजी महाराज, संत ज्ञानेश्वर, संत भगवान बाबा स्मारकांचा विकासकामांमध्ये समावेश असल्याचे आमदार डॉ. गुट्टे यांनी सांगितले.


गंगाखेड उपविभागात २७९ गावे समाविष्ट असून, १६ महसूल मंडळांमध्ये ९५ तलाठी सज्जे असल्याचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी सांगितले. क्षेत्रफळाच्या दृष्टीने इतक्या मोठ्या उपविभागाचे आणि तहसील कार्यालय यापूर्वी अत्यंत छोट्या जागेत कार्यरत होते. आता १४.९९ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून, येथील प्रशासकीय इमारतीचे बांधकाम वेळेत पूर्ण होणार आहे. त्यामुळे भविष्यात आधुनिक सोयीसुविधांनी युक्त अशा सुसज्ज इमारतीमध्ये या कार्यालयांचे रुपांतर होईल. परिणामी, लोकहिताची, लोककल्याणकारी कामे या कार्यालयातून अधिक गतिमानतेने होणार आहेत. राज्य शासन आणि जिल्हा प्रशासन अत्यंत पारदर्शीपणे काम करत असल्याचे सांगून या उपविभागातील जनतेची कामे तत्परतेने मार्गी लागतील, असा विश्वास जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी यावेळी व्यक्त केला. 


कार्यकारी अभियंता संजय पाटील यांनी प्रास्ताविकातून १४.९९ कोटी रुपये खर्चून २ हजार ९४० चौरस मीटर क्षेत्रफळावर बांधकाम होणार असल्याबाबत माहिती दिली गंगाखेडचे उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर यांनी उपविभागातील जनतेची कामे करताना नवीन इमारतीची अत्यंत निकड होती. आज त्या वास्तूचे भूमीपूजन झाले असून, भविष्यात येथील नागरिकांना तत्पर सेवा मिळतील, असा विश्वास व्यक्त करत उपस्थितांचे आभार मानले.

परभणी जिल्ह्यातील सिरपूर (ता. पालम)चे जवान रघुनाथ चिमले यांना त्रिपुरा येथे कर्तव्यावर असताना वीरगती प्राप्त झाली. जवान रघुनाथ चिमले यांना उपस्थितांनी दोन मिनिटे मौन बाळगून श्रद्धांजली वाहिली......

*****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या