🌟भारताने हायव्होल्टेज सामन्यात पाकिस्तानला 7 विकेटनने केला दणदणीत पराभव🌟
अहमदाबाद येथील हायव्होल्टेज सामन्यात भारताने पाकिस्तानचा सात विकेटने सहज पराभव केला. आधी गोलंदाजांनी भेदक मारा करत पाकिस्तानला 191 धावांत रोखले. त्यानंतर रोहित शर्माच्या वादळी फलंदाजीच्या जोरावर 192 धावांचे आव्हान 30.3 षटकात 7 विकेट राखून सहज पार केले. भारताकडून रोहित शर्माने 86 धावांची खेळी केली. त्याशिवाय श्रेयस अय्यर यानेही संयमी अर्धशतक ठोकले. विश्वचषकातील भारताचा हा सलग तिसरा विजय होय. तर पाकिस्तानविरोधातील भारताचा हा आठवा विजय आहे. विश्वचषकात पाकिस्तानविरोधात भारत अजेय राहिलाय. तर यंदाच्या विश्वचषकात पाकिस्तानचा हा पहिला पराभव आहे.
पाकिस्तानच्या 192 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने वादळी सुरुवात केली. रोहित शर्मा आणि गिल यांनी पाकिस्तानच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. डेंग्यूतून सावरल्यानंतर गिल पाकिस्तानच्या गोलंदाजीवर तुटून पडला होता. गिल याने चार चौकारांच्या मदतीने 16 धावांची खेळी केली. गिल याला शाहीन आफ्रिदीने बाद केले. त्यानंतर अनुभवी विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी डाव सावरला. दोघांची जोडी जमली असे वाटत असतानाच विराट कोहलीला हसन अली याने बाद केले. विराट कोहलीने 18 चेंडूत तीन चौकारांच्या मदतीने 16 धावांचे योगदान दिले.
रोहित शर्मा एका बाजूने पाकिस्तानच्या गोलंदाजांची धुलाई करतच होता. रोहित शर्माने अवघ्या 36 चेंडूत अर्धशतक ठोकले होते. शाहीन शाह आफ्रिदीच्या चेंडूवर रोहित शर्मा बाद झाला. तोपर्यंत सामना भारताच्या बाजूने झुकला होता. रोहित शर्माने 63 चेंडूत 86 धावांची खेळी केली. या खेळीला 6 चौकार आणि 6 षटकारांचा साज होता. रोहित तंबूत परतल्यानंतर अय्यरने केएल राहुलच्या साथीने भारताला विजय मिळवून दिला.
विश्वचषकातील पहिल्या दोन्ही सामन्यात श्रेयस अय्यर याला प्रभावी कामगिरी करता आली नव्हती. ऑस्ट्रेलियाविरोधात श्रेयसला खातेही उघडता आले नव्हते. त्यानंतर अफगाणिस्तानविरोधात नाबाद 25 धावांची खेळी केली होती. पण आज हायव्होल्टेज सामन्यात अय्यर याने संयमी फलंदाजी करत भारताला विजय मिळवून दिला. अय्यर याने अर्धशतकी खेळी केली. केएल राहुलच्या साथीने भारताला विश्वचषकातील तिसरा विजय मिळवून दिला. अय्यरने 62 चेंडूमध्ये तीन चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने नाबाद 53 धावांची खेळी केली. केएल राहुल याने दोन चौकारांच्या मदतीने नाबाद 19 धावांचे योगदान दिले.
पाकिस्तानच्या एकाही गोलंदाजाला भेदक मारा करता आला नाही. शाहीन शाह आफ्रिदी याने दोन विकेट घेतल्या. तर हसन अली याला एक विकेट मिळाली. इतर गोलंदाजांची पाटी कोरीच राहिली. भारताने पाकिस्तानवर दणदणीत मिळवलेल्या विजयाचा आनंद संपूर्ण भारतात, महाराष्ट्रात संभाजीनगर जिल्ह्यासह आपल्या चिखली शहरात नागरिकांनी फटाके 🎆🎆🎆🎆 फोडुन साजरा केला.....
✍️मोहन चौकेकर
0 टिप्पण्या