🌟गोदावरी तांडा येथे ऊसतोड कामगार महामेळावा 2023 चे उद्घाटन🌟
परभणी (दि.16 ऑक्टोंबर) : ऊसतोड कामगार हा साखरनिर्मिती प्रक्रियेतील महत्त्वपूर्ण घटक असून, ऊसतोड कामगारांच्या अडचणी सोडविण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी आज येथे केले गंगाखेड तालुक्यातील गोदावरी तांडा येथे आज गोर सेनेतर्फे आयोजित ऊसतोड कामगार महामेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी श्री. पाटील बोलत होते.
जलसंधारण मंत्री संजय राठोड, आमदार रत्नाकर गुट्टे, गोर ऊसतोड कामगार सेनेचे अध्यक्ष अरुण चव्हाण, कर्नाटक गोरसेनेचे रविकांत बागडी, गोदावरीचे सरपंच नामदेव पवार यांच्यासह पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते देशात साखर उत्पादनात महाराष्ट्र आघाडीवर आहे. त्यामुळे बंजारा समाज या प्रक्रियेत अत्यंत महत्त्वपूर्ण घटक आहे. हा समाज ऐन सणासुदीच्या काळात घरादारापासून दूर राहून ऊसतोडी करतो. गेल्या वर्षभरात 352 बंजारा ऊसतोड कामगारांचा सर्पदंशाने मृत्यू झाला असून, या बांधवांचे कुटुंब सुरळीत चालण्यासाठी त्यांना जीवनविमा योजना लागू करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.
ऊसतोडीसह या समाजातील अनेकजण वीट भट्टीवरही काम करतात. भुकेला जात-धर्म नसतो असे सांगून ते म्हणाले की, इतर कामगारांप्रमाणे ऊसतोड बांधवांनाही मध्यान्ह भोजन मिळायला हवे, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याची ग्वाही श्री. पाटील यांनी उपस्थितांना दिली. त्यांच्या मुलांना शिष्यवृत्तीचा लाभ न मिळाल्यास स्वाधार योजना लागू करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे श्री. पाटील यांनी यावेळी उपस्थितांना सांगितले.या भागातील ऊसतोड कामगारांच्या व्यथा, त्यांच्या मागण्या शासन दरबारी मांडण्यासाठी अरुण चव्हाण सतत प्रयत्न करत आहेत. त्यांनी केलेल्या मागण्यांपैकी अनेक मागण्या पूर्ण करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच संबंधित विभागाच्या अधिका-यांना दिल्या असल्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी सांगितले.
साखर उत्पादनात जगात देशाचा आणि देशात महाराष्ट्राचा अग्रक्रम लागतो. मात्र साखरनिर्मिती मागील कष्ट करणाऱ्या हाताची जाणीव अनेकांना नसते. त्यांचे राहणीमान, त्यांचे कष्ट, त्यामुळे त्यांच्या मुलांची होणा-या हालअपेष्टांशी समाज अनभिज्ञ असतो. अनेक ऊसतोड कामगारांचे सर्पदंशाने मृत्यू होतात. त्यांच्या पाल्यांच्या शिक्षणात खंड पडतो. त्यामुळे या सर्व समस्या लवकरात लवकर सोडविण्यासाठी मुख्यमंत्री अहोरात्र झटत असल्याचे सांगून, ऊसतोड कामगारांना आरोग्यदायी, सन्मानजनक जीवन जगता यावे, यासाठी मंत्रिमंडळाच्या माध्यमातून त्यांच्या हिताचे लवकरच निर्णय घेण्यात येतील,असा विश्वास मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांना व्यक्त केला.राज्यात बंजारा समाजाच्या मुलांसाठी 82 निवासी वसतिगृहांना मान्यता देण्यात आली आहे. तर राज्यातील ऊर्वरीत जिल्ह्यांतही लवकरच वसतिगृह सुरु करणार असून, ऊसतोड कामगारांच्या इतरही मागण्या लवकरच पूर्ण होतील, असा विश्वास जलसंधारण मंत्री श्री. राठोड यांनी व्यक्त केला.
ऊसतोड कामगाराचा मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसांना मदत मिळवून देणे, गर्भवती ऊसतोड कामगारांना ६ महिन्याचे वेतन देणे यासह कामगारांना ओळखपत्र देणे तसेच कामगार विभागामध्ये नोंदणी करून त्यांना इतर कामगारांनाप्रमाणे सर्व शासकीय योजना लागू करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना विनंती करणार असल्याचे मंत्री श्री. राठोड यांनी सांगितले बैलगाडी कामगार मुकदमाचे नुकसान झाल्यास नुकसान भरपाई देणे, गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार मंडळात एक ऊसतोड कामगारांचे प्रतिनिधित्व देण्यासह इतर 12 मागण्या पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार असल्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी सांगितले.
ऊसतोड कामगार समाजाचा महत्त्वपूर्ण घटक असून, सर्वाधिक ऊसतोड कामगार हे बंजारा समाजाचे आहेत. पोहरागडावरील पोहरादेवी विकासकामांसाठी मुख्यमंत्र्यांनी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. पोहरागड हे आरोग्य, शिक्षण आणि पर्यटनाचे हब करण्याकडे शासन प्रयत्नरत असल्याचे सांगून त्यांनी बंजारा समाजासाठी बंजारा साहित्य अकादमी, वसंतराव नाईक महामंडळाला पंधराशे कोटी रुपये देण्याचे मुख्यमंत्र्यांनी ठरवले असल्याचे सांगितले. मुख्य गावापासून तांड्यावर जाण्यासाठी रस्ते बांधणार असल्याचे सांगून मुंबईत कामानिमित्त येणा-या बांधवांसाठी 3 एकर जागा आणि सेवालाल भवन उभारणीसाठी निधी मंजूर केला असल्याचे श्री. राठोड यांनी सांगितले.
यावेळी आमदार रत्नाकर गुट्टे यांनीही समयोचित भाषण करुन यावेळी विविध मागण्या केल्या. अरुण चव्हाण यांनी प्रास्ताविकातून मान्यवरांकडे विविध मागण्या मांडल्या. मान्यवरांच्या हस्ते पारंपरिक पद्धतीने भोग लावून, दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले तर सूत्रसंचालन सईद शेख यांनी केले......
0 टिप्पण्या