🌟शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते🌟
माताभगिनी व लेकीबाळींवर होणाऱ्या कौटुंबिक छळास प्रतिबंध करण्यासाठी केंद्र शासनाने कायदा लागू केला. कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम-२००५ व नियम-२००६ हे संपूर्ण भारतात दि.२६ ऑक्टोबर २००६पासून लागू केले आहे. कायद्याची माहिती नसेल तर त्याचा पीडित भगिनी लाभ घेवू शकत नाही. शास्त्र पुराणातही स्त्रीला स्त्रीशक्ती- आदिशक्ती म्हणून गौरविण्यात आले आहे. देवी शारदा, नवदुर्गा, एकवीरा, लक्ष्मी आदी सर्व ही स्त्रीशक्तीची रुपे आहेत. प्रापंचिक लोक नवरात्रोत्सवात नवरुपांची, दिवाळीत लक्ष्मीची पूजा मोठ्या भक्तिभावाने करतात. भाऊबीजेस बहिणींचा सन्मान-सत्कार करतात. मग मात्र कुटुंबातील स्त्रीची दैना व अवहेलना का केली जाते? घरी महिलांचा मान-मरातब राखू, तेव्हाच आपले देवी व्रत व लक्ष्मी पूजन कार्यसाधक सिद्ध होईल, अन्यथा पालथ्या घागरीवर पाणी... कौट़ुंबिक हिंसाचार कशास म्हणावे? ते सर्वसामान्यांना कळवावे, याच शुद्ध हेतुने हा अल्पसा प्रयत्न बापू ऊर्फ श्रीकृष्णदास निरंकारीजी यांनी या लेखप्रपंचातून केलेला आहे... संपादक.
"सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वाथ साधिके|
शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते||"
वास्तविक स्त्री ज्या परिवारासोबत वा साथीदारासोबत एकाच छताखाली रहात असेल आणि तिचा छळ त्या पुरुष वा परिवाराकडून होत असेल तर ती कौटुंबिक हिंसाचार कायद्यान्वये न्याय दंडाधिकाऱ्याकडे संरक्षण मागू शकते. थोडक्यात पीडित महिला व तिच्या मुलांना निवासाच्या अधिकारासह तिच्या सुरक्षितेचा किंवा आर्थिक संरक्षणाचा आदेश न्यायदंडाधिकारी देवू शकतात. छळापासून संरक्षण मग ते शारीरिक, लैंगिक, आर्थिक, तोंडी किंवा भावनिक अत्याचार असोत, महिलांना त्याविरुद्ध न्याय मागता येतो. शारीरिक छळ म्हणजे काय? तर मारहाण, थोबाडीत हाणणे, तडाखा देणे, चावणे, लाथ मारणे, गुद्दे मारणे, ढकलणे, लोटणे, जोराचा धक्का मारणे, इतर कोणत्याही पध्दतीने शारीरिक दुखापत किंवा वेदना देणे. अशा बाबींचा शारीरिक छळात समावेश होतो. भगिनींना यातून मोलाचा हा सल्ला-
"पडला पदर खांदा तुझा दिसतो ग!
कमरेला कमरपट्टा कसतो ग बाई कसतो!!
तुझ्या तरुणपणाला ग धार!
मार भिवईंची काळी कट्यार!!
घाव वर्मावरी असा बसतो!!!"
तोंडी व भावनिक अत्याचार जसे की अपमान करणे, वाईट नावाने बोलावणे, चारित्र्याबद्दल संशय घेणे, मुलगा झाला नाही म्हणून अपमानास्पद वागणूक देणे, हुंडा आणला नाही म्हणून अतोनात शिव्याश्राप देणे. महिलेला वा तिच्या ताब्यात असलेल्या अपत्यास शाळेत, महाविद्यालयात किंवा इतर शैक्षणिक संस्थांमध्ये जाण्यास मज्जाव करणे, नोकरी स्वीकारण्यास व करण्यास मज्जाव करणे, अपत्यासह स्त्रीला घरातून बाहेर जाण्यास अटकाव करणे, नेहमीच्या कामासाठी कोणत्याही व्यक्तीबरोबर भेटण्यास मज्जाव करणे, तिला विवाह करावयाचा नसल्यास विवाह करण्यास बाध्य करणे, तिच्या पसंतीच्या व्यक्तीसोबत लग्न करण्यास मज्जाव करणे, त्याच्या अथवा त्यांच्या पसंतीच्या व्यक्तीबरोबर विवाह करण्यास जबरदस्ती करणे, आत्महत्येची धमकी देणे, इतर कोणतेही भावनात्मक किंवा तोंडी अपशब्द वापरणे या गोष्टींचा समोवश होतो. लैंगिक अत्याचारामध्ये बलात्कार, अश्लिल फोटो काढणे, बिभत्स कृत्य जबरीने करावयास लावणे, समाजात नाचक्की- बदनामी होईल, असे अश्लील चाळे करणे किंवा अनैसर्गिक अश्लिल कृत्य करणे याबाबींचा समावेश होतो. ती लावण्याची खाण, तिचे आकर्षक पण कोमल रुप वाटत असले तरी प्रसंगी ती ज्वाला, दुर्गा, महाकालीचे रौद्र रुप घेऊ शकते किंवा कायद्याने लढून जिंकू शकते-
"रूप माझं चंद्राचं पहा लाख मोलाचं।
चंद्राची कोर मी तारांगणी।।
लुकलुकत्या तार्यांत डुलते तोर्यात।
शोभते शुक्राची मी चांदणी रे।।"
कौटुंबिक हिंसाचार म्हणजे शारीरिक, शाब्दिक, लैंगिक, मानसिक किंवा आर्थिक छळ, हुंडा किंवा मालमत्ता घेण्यासाठी महिलेला अपमानित करणे, तिला शिवीगाळ करणे, विशेषत: अपत्य प्राप्ती न झाल्याच्या सबबीखाली तिला हिणवणे, धमकावणे, त्रास देणे, दुखापत करणे, जखमी करणे किंवा पीडितेचा जीव धोक्यात आणण्यास भाग पाडणे. तसेच तिच्या कोणत्याही नातेवाईकाकडे हुंड्याची मागणी करणे. या सर्व गोष्टींचा दुष्परिणाम पीडित व्यक्ती अथवा तिच्या नातेवाईकांवर होणे तसेच आर्थिक छळ करणे. म्हणजे महिलेचे स्वत:चे उत्पन्न, स्त्रीधन, मालमत्ता, इतर आर्थिक व्यवहार किंवा तिच्या हक्काच्या कोणत्याही मालमत्तेपासून तिला वंचित करणे आणि घराबाहेर काढणे या सर्व बाबींना कौटुंबिक हिंसाचार म्हटले जाते. त्याचप्रमाणे आर्थिक अत्याचारात हुंड्याची मागणी करणे, तिला मुलांच्या पालन-पोषणासाठी पैसे न देणे, तिच्या मुलांना अन्न, वस्त्र, औषधे आदी न पुरविणे, नोकरीला मज्जाव करणे, नोकरीवर जाण्यासाठी आडकाठी निर्माण करणे, नोकरी स्वीकारण्यास संमती न देणे, पगार किंवा रोजी-मजूरीतून आलेले पैसे काढून घेणे, तिला तिचा पगार, रोजगार वापरण्यास परवानगी न देणे, राहत्या घरातून हाकलून देणे, घराचा कोणताही भाग वापरण्यास किंवा घरात जाण्या-येण्यास अडथळा निर्माण करणे, घरातील नेहमीचे कपडे, वस्तू वापरण्यापासून रोखणे, भाड्याच्या घराचे भाडे न देणे या बाबींचा समावेश होतो. तिला तिच्या हक्कांपासून परावृत्त करता कामा नये, तिचा आदर करणेच योग्य-
"यादेवी सर्वेभूतेषू मातृरूपेण संस्थितः|
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः||"
काय आहे कौटुंबिक हिंसाचारास प्रतिबंध घालणारा कायदा? स्त्रीचा जन्मच मुळी अत्याचार सोसण्यासाठी झाला, अशी समाजमनाची धारणा आहे. या धारणेला गरीब, श्रीमंत, जात, धर्म, पंथ, शिक्षित, अशिक्षित, ग्रामीण, शहरी, नोकरदार, बेरोजगार असा कुठलाही अपवाद नाही. स्त्री-पुरुष समानता ही केवळ आपण आधुनिक विचारसरणीचे आहोत, हे दाखविण्यापुरतीच सीमित आहे. वास्तव तर नेमके याच्या उलट आहे. भारतीय संविधानाच्या कलम १४ अनुसार भेदभावापासून मुक्ती, कलम १५ अन्वये स्त्री-पुरुष समानता आणि कलम २१प्रमाणे जीवित व स्वातंत्र्याचे संरक्षण करण्याचा हक्क महिलांनाही दिला आहे. तरीही बहुसंख्य भगिनी कौटुंबिक हिंसाचारास बळी पडत आहेत. त्यांची प्रतिष्ठा सांभाळली जात नाही. समाजसुधारक, स्त्रीउद्धारक आणि विचारवंतही आजवर समाजाचे पूर्ण मानसिक परिवर्तन करू शकलेले नाहीत. समाजात सुधारणा करण्यासाठी केवळ प्रबोधने पुरेसे नाहीत. शिक्षा किंवा दंडशक्तीही तितकीच महत्वाची आहे, म्हणून कौटुंबिक हिंसचारास प्रतिबंध करणारा हा कायदा केंद्र सरकारने केला. कारण-
"यत्र नार्येस्तु पूजंतै,रमतै तत्र देवतः!!"
या कायद्याद्वारे पीडित महिलेला न्याय, संरक्षण मिळू शकते. या कायद्याच्या आधारे पीडित महिला ही तिच्या अथवा तिच्या मुलांविरुद्ध होणारे अत्याचार थांबवू शकते. स्त्रीधन, दागदागिने, कपडे इत्यादींवर ताबा मिळवू शकते. संयुक्त खाते अथवा लॉकर हे हिंसा करणाऱ्या पुरुषाला वापरण्यास प्रतिबंध करू शकते. स्त्री ज्या घरात राहत असते, ते घर सोडावे लागणार नाही. अत्याचारी पुरुषास ती राहात असलेले घर विकण्यास प्रतिबंध होऊ शकतो. वैद्यकीय उपचाराचा खर्च मागू शकतो. भावनिक व शारीरिक हिंसाचाराबद्दल नुकसान भरपाई स्त्रीला मागता येते. त्याचप्रमाणे पीडितेला मोफत कायदेविषयक केंद्राद्वारे सल्ला, सेवा पुरविणाऱ्या संस्था, वैद्यकीय सुविधा, निवासगृह आदींमार्फत आवश्यक त्या सेवा सुविधा प्राप्त करुन घेता येतात. भारतीय दंड संहिता ४९८-अ कलमाखाली पोलिसात तक्रार दाखल करता येते. तद्वतच भारतीय दंडसहितेच्या कलम १२५अंतर्गत मिळणाऱ्या पोटगी व्यतिरिक्त अतिरिक्त पोटगी ही स्वत:साठी व स्वत:च्या अपत्यासाठी मागता येते. या कायद्यांतर्गत कौटुंबिक हिंसाचाराने पीडित पत्नी, सासू, बहिण, मुलगी, अविवाहित स्त्री, आई, विधवा इत्यादी म्हणजे लग्न, रक्ताचे नाते, लग्न सदृश्य संबंध- लिव्ह इन रिलेशनशीप, दत्तकविधी अशा कारणाने नाते संबंध असणाऱ्या व कुठल्याही जाती धर्माच्या स्त्रिया तसेच त्यांची अठरा वर्षाखालील मुले दाद मागू शकतात. या कायद्यांतर्गत छळ होत असलेली किंवा झालेली स्त्री सरंक्षण अधिकाऱ्याला, सेवा पुरविणाऱ्या संस्थांना, तसेच पोलीस स्टेशन किंवा दंडाधिकाऱ्याकडे तोंडी किंवा लेखी तक्रार करू शकते, हे लक्षात घ्यावे व सजग व्हावे. योगायोगाने याच दिवशी भाऊबीज आली आहे. फक्त सण उत्सवापूरता स्त्रीसन्मान न राखता तो सदोदित अंगवळणी पाडला पाहिजे-
"नवलाख दिवे हे निळ्या आभाळी,
वसुंधरा अशी चंद्रा ओवाळी।
नक्षत्रांचा सर येई भूमीवर,
पसरी पदर भेट घ्याया।।
चंद्र वसुधेला सखा रे भेटला,
पाठीशी राहु दे छाया रे।
वेड्या बहिणीची रे वेडी माया।।"
!! समस्त लेकीबाळी, माता व भगिनींना राष्ट्रीय कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायदा दिनाच्या सजग हार्दिक शुभेच्छा !!
- संकलक व शब्दांकन -
बापू ऊर्फ श्रीकृष्णदास निरंकारी.
द्वारा- प. पू. गुरूदेव हरदेव कृपानिवास.
मु. एकता चौक, रामनगर वॉर्ड नं.२०, गडचिरोली.
पो. ता. जि. गडचिरोली (४४२६०५).
मोबा. ७४१४९८३३३९.
इमेल- krishnadas.nirankari@gmail.com
0 टिप्पण्या