🌟जिल्हा प्रशासनाकडून भेसळ नियंत्रण समितीकडून मिठाईची तपासणी🌟
परभणी : जिल्ह्यात दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर नुकताच भेसळयुक्त खवा सापडला असून, नागरिकांनी भेसळयुक्त दुध व दुग्धजन्य पदार्थ आढळून आल्यास तात्काळ तक्रार करण्याचे आवाहन अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे यांनी केले आहे.
अपर जिल्हाधिकारी डॉ. काळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हास्तरीय दुध भेसळ नियंत्रक समितीचे सदस्य अन्न व औषध प्रशासन विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी अ. मा तम्मडवार, पशुसंवर्धन विभागाचे श्री. कनले, दुग्धव्यवसाय विभागाचे एस. व्ही. गिणगिणे आणि विस्तार अधिकारी ए.पी.गोटे आणि माधव इचनर यांनी आज तपासणी केली.
जिल्हास्तरीय दुध भेसळ नियंत्रक समितीने दूध व दुग्धजन्य पदार्थातील भेसळ रोखण्यासाठी वसमत रोडवरील 4 ठिकाणी स्विटमार्टमधील मलई पेढा, मलई बर्फी, बर्फी आणि अंजीर बर्फीचे नमुने अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत घेण्यात आले असून, ते पुढील विश्लेषणासाठी छत्रपती संभाजीनगर येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले.
जिल्हास्तरीय दुध भेसळ नियंत्रक समितीचे अध्यक्ष अप्पर जिल्हाधिकारी डॉ. काळे यांनी जिल्हास्तरीय भेसळ नियंत्रक गठीत समितीच्या बैठकीमध्ये दीपावली सणानिमित्त दुग्धजन्य पदार्थाची खरेदी मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे दुग्धजन्य पदार्थामध्ये भेसळ होण्याची शक्यता व्यक्त केली असून, सणासुदीच्या काळात नागरिकांच्या आरोग्याशी कोणीही खेळू नये, यासाठी भेसळीवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्ह्यातील ग्राहकांनी पदार्थातील भेसळ होत असल्याची बाब निदर्शनास आल्यास समितीच्या 9834106663, 7028975001 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधून तक्रार नोंदविण्याचे आवाहन जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकाऱ्यांनी केले आहे......
*****
0 टिप्पण्या