🌟गोव्यात सावंतवाडी येथील कलावंतिणीच्या घरात हिराबाईंचा जन्म दि.२२ नोव्हेंबर १८८६ रोजी झाला🌟
हिराबाईंचे कौतुक फक्त स्त्री नाटककार एवढेच नाही, याकडे गांभीर्याने लक्ष द्या! स्त्री शिक्षण, विशेष करून स्त्री-पुरुष सहजीवनाविषयी त्यांचे विचार भविष्य काळाचेही होते. त्यांच्या संवादलेखनातून पात्रांच्या मनोवस्था, त्यामागची कारणमिमांसा हे विचारपूर्वक योजलेले दिसते. श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरुजींनी जयंतीनिमित्त केलेले हे त्यांचे कार्यविश्लेषण... संपादक.
गोव्यात सावंतवाडी येथील कलावंतिणीच्या घरात हिराबाईंचा जन्म दि.२२ नोव्हेंबर १८८६ रोजी झाला. मुंबई विद्यापीठाला राजाबाई टॉवर बांधून देणाऱ्या धनिक प्रेमचंद रायचंद यांच्या घरात त्या वाढल्या, त्या मावशी भीमाबाईमुळे. मावशीने त्यांना मुंबईत आणून उत्तम शिक्षण दिले. संस्कृत, इंग्रजी, बंगाली शिकवणारे शिक्षक घरी बोलावले. पं.भास्करबुवा वखल्यांकडे संगीत शिक्षण झाले. त्यांना स्वत: पदे रचायची आणि चाली लावण्याची गोडी लागली. रायचंदांच्या घरी मुंबईतील अनेक कलाकार, लेखक व उच्चभ्रू व्यक्तींचे येणे-जाणे असे. त्यामुळे त्यांच्या वागण्या-बोलण्याला अदबशीर झळाळी आली. भास्करबुवा वखले यांच्याकडे संगीताचे धडे गिरवणे, उमलत्या वयात लेखनाची गोडी लागल्यावर नाट्याचार्य गो.व.देवल यांचे मार्गदर्शन, पुढे थोर नाटककार श्री.कृ.कोल्हटकरांचा सहवास, आणि भाषाप्रभू राम गणेश गडकरी यांची घरी राबता. एखाद्या हिऱ्याला पैलू पाडायला आणखी अनुकूलता ती कोणती? हिराबाई पेडणेकर या नावाने पहिली मराठी स्त्री नाटककार हा बहुमानाचा किताब मिळाला. ललित कलादर्शनसारख्या नामांकित संगीत नाटक कंपनीने दामिनी हे नाटक चार वर्ष रंगमंचकावर गाजत ठेवले. पुस्तकरूपानेही इंदुप्रकाशने प्रसिद्ध केले. एकोणिसाव्या शतकात कूस पालटली तेव्हा पहिल्या दशकात हे नाव लखलखीतपणे पुढे आले होते. पण नाटककार, कलाकार, साहित्यिक म्हणून पुढे त्यांना मानसन्मान मिळाले नाहीत किंवा त्यांनीही पुढे आपल्या प्रतिभाशक्तीची चुणूक दाखवली नाही. त्यांच्या बाबतीत, एखादे फूल अकाली कोमेजून जावे तसे झाले.
बरीच वर्षे हिराबाई पेडणेकर याच पहिल्या स्त्री मराठी नाटककार असेच विधान होते. पण अभ्यासकांनी नंतर सोनाबाई केरकरांचे छ.संभाजी आणि काशिबाई फडके यांचे संगीत सीताशुद्धी ही नाटके कालानुक्रमे आधीची असल्याची माहिती समोर आली. अर्थात नाट्यगुणांनी संपन्न अशा हिराबाईंच्या लेखनाचे मोल काही त्यामुळे कमी झाले नाही. दुर्दैवाने नानासाहेब जोगळेकर गेल्यानंतर हिराबाईंना मानसिक आणि कौटुंबिक स्थैर्याची गरज अधिक भासली असणार. त्यांनी कृष्णाजी नेने नावाच्या कुटुंबवत्सल गृहस्थाशी घरोबा केला. सारा भूतकाळ विसरताना आपल्या लेखनकलेचेही बोट सोडले. कलावंतिणीचा शिक्का पुसून टाकण्यासाठी त्यांना कलांचाच त्याग करावा लागला. एक सामान्य गृहिणी म्हणून स्थैर्य मिळण्यासाठी मोजावी लागली एवढी मोठ्ठी किंमत! कोण जाणे ती आनंदाने दिलीही असेल. परंतु मराठी भूमी व भाषा मात्र स्त्री भावनानुकूल अशा अधिक नाटकांना मुकली होती, हेच खरे! हरहुन्नरी व्यक्तिमत्वाच्या धनी हिराबाईंनी पालशेत रत्नागिरी येथे दि.१८ ऑक्टोबर १९५१ रोजी अखेरचा श्वास घेतला.
!! त्यांना जयंतीनिमित्त कोटी कोटी दंडवत प्रणाम !!
श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरुजी.
(लोककला व लोकसाहित्यिक चरित्रांचे गाढे अभ्यासक.)
मु. रामनगर वॉर्ड क्र.२०, गडचिरोली.
पो. ता. जि. गडचिरोली.
भ्रमणध्वनी - ७७७५०४१०८६.
0 टिप्पण्या