🌟परभणीत आयोजित ‘माविम’च्या दीपावली महोत्सवास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद....!



🌟पुढील दोन दिवस चालणार दिपावली महोत्सव🌟

परभणी (दि.08 नोव्हेंबर) : महिला आर्थिक विकास महामंडळ व नव तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्पांतर्गत दीपावली महोत्सवाचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी फित कापून उद्घाटन केले. तीन दिवस चालणा-या दीपावली महोत्सवास पहिल्या दिवशी महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला हा महोत्सव महात्मा गांधी पार्क येथे 10 नोव्हेंबरपर्यंत सुरु राहणार असून, महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तू व मालाची विक्री व प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनामध्ये 40 स्टॉल व 70 महिलांनी सहभाग नोंदविला आहे. 


कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार डॉ. राहुल पाटील, जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी बाळासाहेब झिंजाडे, कौशल्य विकास विभागाचे सहायक आयुक्त प्र. सो. खंदारे,  जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल बळे, पशुसंवर्धन विभागाचे श्री. पाटील, कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. खान यावेळी उपस्थित होते प्रदर्शनाच्या उद्घाटन व कर्ज वितरण कार्यक्रमप्रसंगी आमदार डॉ. राहुल पाटील व जिल्हाधिकारी श्री. गावडे यांनी बचत गटांना भेट देत 12 महिला बचत गटांना कर्ज वितरीत करण्यात आले दीपावली सणानिमित्त विविध वस्तू व मालाची उत्पादने या महोत्सवामध्ये जिल्ह्यातील विविध बचत गटांची उत्पादने विक्रीसाठी स्टॉलवर उपलब्ध आहेत. विविध नामांकित उद्योजक, विविध शासकीय विभागातील पदाधिकारी, डॉक्टर्स यांनी बचत गटांच्या स्टॉलला भेटी दिल्या.


उत्पादक कंपनी व उद्योजकीय गट स्थापन करून विकासाच्या मुख्य प्रवाहाच्या दृष्टीने सक्षमपणे बचत गटांनी कार्य करावे. बचत गटाच्या माध्यमातून 8 लोकसंचालित साधन केंद्राचे बचत गटाबाबतचे कार्य आणि कर्तृत्व महिलांच्या वाटचालीच्या दृष्टीने ही बाब अत्यंत अभिमानास्पद असल्याचे आमदार डॉ. पाटील यांनी सांगितले माविममार्फत महिलांनी देण्यात येणारे कर्ज हे दोन ते वीस लाख रुपयांपर्यंत असून आज प्राथमिक स्वरूपात 12 बचत गटांना मान्यवरांच्या हस्ते धनादेश वितरण करण्यात आले. चालू वर्षांमध्ये एप्रिल ते सप्टेंबर अखेर 31 कोटी 50 लक्ष रुपयांचे महिलांना कर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहे, हे कार्य उल्लेखनीय आहे परभणी मधील महिलांचे कर्ज परतफेडीचे प्रमाण 99.9 टक्के आहे. गुरुवार, (दि.9) रोजी सकस पोषक आहार डिश स्पर्धा व आरोग्यविषयक जाणीव जागृती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे तर शुक्रवार, (दि. 10) रोजी प्रदर्शनात सहभागी महिलांना प्रमाणपत्र वितरण करण्यात येणार आहे. तसेच उत्कृष्ट विक्री झालेल्या प्रथम 3 स्टॉल्सचा सन्मान करण्यात येणार असून, स्पर्धेत सहभागी झालेल्या महिलांनाही सन्मानित करण्यात येणार आहे. 

या प्रदर्शनात विविध प्रकारचे खाद्यपदार्थ  चिवडा, लाडू, करंजी, चकली, शेव, बालुशाही, बाकरवडी, फरसाण, तूप, पनीर, लोणी, दही, पाणीपुरी, भेळ तसेच विविध मसाले, चटण्या, पणत्या, आकाशदिवे, तोरणे, दिवे, साड्या, रेडीमेट गारमेंट आदी उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध आहेत महिला स्वयंसहाय्यता बचत गटांना कर्ज वितरण विषयान्वये महिला आर्थिक विकास महामंडळाच्या जिल्हा कार्यालयाकडून याचे आयोजन करण्यात आले असून, बचत गटांच्या माध्यमातून महिलांचा सर्वांगिण विकास साधण्याचे काम करण्यात येत आहे. सद्यस्थितीत 3 हजार 950 बचत गटांच्या माध्यमातून 45 हजार 500 महिलांचे संघटन करण्यात आले आहे. महिलांना विविध बँकेच्या माध्यमातून उद्योग व्यवसाय उभारणीसाठी दरवर्षी 45 ते 50 कोटी रुपयांचे अर्थसहाय्य उपलब्ध करुन दिले जाते. तसेच कर्ज परतफेडीचे प्रमाणही 99.9% इतके आहे. बँक कर्जाच्या माध्यमातून महिलांनी विविध प्रकारच्या उद्योग व्यवसायाची उभारणी केली आहे. महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तू व मालाला बाजारपेठ मिळावी, या हेतूने दीपावली महोत्सवचे आयोजन करण्यात आले आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नई रोशनी लोक संचलित साधन केंद्राच्या व्यवस्थापक जयश्री टेहरे यांनी केले तर आभार विद्या शृंगारे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व माविम कर्मचारीवृंद व व्यवस्थापक, लेखापाल व सहयोगिनी यांनी परिश्रम घेतले.....

*****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या