🌟जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी आज जिल्हास्तरीय प्राणीक्लेष प्रतिबंधक समितीच्या बैठकीत दिले आदेश🌟
परभणी (दि.०२ नोव्हेंबर) : जिल्ह्यात प्राणीक्लेष प्रतिबंधक कायदा 1960 व महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा 1976 महाराष्ट्र प्राणी रक्षण सुधारणा अधिनियम 1995 ची प्रभावीपणे अंमलबजावणी व सनियंत्रण करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी आज जिल्हास्तरीय प्राणीक्लेष प्रतिबंधक समितीच्या बैठकीत दिले जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत जिल्हाधिकारी श्री. गावडे बोलत होते. निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, डॉ.पी.आर पाटील, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.पी.पी.नेमाडे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.नामदेव आघाव, डॉ.के.डी. सांगळे, डॉ.आर.एस.कच्छवे यांच्यासह सदस्य यावेळी उपस्थित होते.
मनपाने शॉप अँक्टनुसार मांस विक्रीच्या दुकानांना परवाने देत तपासणी करण्याचे त्यांनी आदेश दिले. गोवंशाची कत्तल, कत्तलीसाठी गोवंशाची वाहतूक, कत्तलीसाठी गोवंशाची खरेदी-विक्री आणि गोवंशाचे मांस ताब्यात ठेवणे हा गुन्हा असून कायद्यात कारावास व दंडाची तरतूद आहे. जिल्ह्यात याचे उल्लंघन करणारांवर कारवाई करावी. तसेच भटकी कुत्री, मांजरे, वाहतुकीसाठी वापरण्यात येणारे प्राणी, कोणत्याही भटक्या व पाळीव प्राण्यांवर अत्याचार किंवा अमानवीय कृत्य होताना आढळल्यास संबंधित नागरिकांनी जिल्हास्तरीय प्राणीक्लेष प्रतिबंधक सोसायटी, प्रशासकीय इमारत शिवाजीनगर, परभणी किंवा जिल्हाधिकारी कार्यालयांशी संपर्क साधून माहिती देण्याचे आवाहन त्यांनी केले.
भटकी कुत्री-जनावरांना उपचाराची गरज भासल्यास आपल्या नजिकच्या पशुवैद्यकीय रुग्णालयात नेवून उपचार करावेत. जनावरांची दाटीवाटीने किंवा अमानवीयपणे वाहतूक होत असल्यास उप प्रादेशिक परिवहन अधिकारी किंवा नजिकच्या पोलीस स्टेशनला माहिती द्यावी. प्रतिबंधित पक्षाची मांसाकरिता कत्तल, विक्री, वाहतूक किंवा पाळीव पक्षी म्हणून पाळणे प्रतिबंधीत असून अशी बाब जिल्ह्यात आढळून आल्यास त्याबाबत माहिती द्यावी. तसेच प्राणिमित्रांच्या अडचणी-तक्रारीबाबत योग्य ती दखल घेण्याचे निर्देश दिले.
यावेळी जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ.पी.पी.नेमाडे यांनी प्राणी क्लेष प्रतिबंधक कायदा 1960 व महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा 1976 महाराष्ट् प्राणी रक्षण सुधारणा अधिनियम 1995 ची तसेच या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय प्राणी क्लेष प्रतिबंधक सोसायटीची माहिती दिली.....
*****
0 टिप्पण्या