🌟'त्या' १३ मंडळात दुष्काळ घोषित करा : आ.डॉ.गुट्टेंची मागणी जिल्हाधिकाऱ्यांची घेतली भेट🌟
परभणी (प्रतिनिधी) :- राज्य सरकारने घोषित केलेल्या दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या नवीन यादीत जिल्ह्यातील ३९ महसूल मंडळांचा समावेश झाला आहे. परंतु १३ मंडळांचा समावेश झालेला नाही. त्यामुळे 'दुष्काळाची छाया, बळीराजाची कोण करील माया!' असे सांगत 'त्या' मंडळाचाही दुष्काळग्रस्त यादीत नव्याने समावेश करावा आणि गंगाखेड तालुक्यातील पाझर तलाव धरणातील गाळ उपसाचे आदेश पारित करावेत, अशा मागण्यांचे लेखी निवेदन गंगाखेड विधानसभेचे आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांना प्रत्यक्ष भेटून दिले आहे.
परभणी जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाडा दुष्काळाच्या छायेत आहे. पावसाचा मोठा खंड यंदा अनुभवला आहे. गुरा-ढोरांसह माणसांच्या पिण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. चाऱ्या अभावी जनावरे मरत आहेत. खरीपाचा हंगाम हातातून गेला आहे. गावोगावी बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे परभणी जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचा समावेश दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत करण्यात यावा, यासाठी मुंबई येथे आ.डॉ.गुट्टे यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रत्यक्ष भेट घेवून लेखी निवेदनाद्वारे मागणी केली होती.
त्यानुसार सरकारने सकारात्मक निर्णय घेवून जिल्ह्यातील ५२ महसूल मंडळापैकी केवळ ३९ मंडळाचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश केला आहे. मात्र, सर्वत्र समान दुष्काळ सदृश्य परिस्थिती असताना इतर मंडळातील नागरिक, शेतकरी यांच्याशी शासनाने दुजाभाव करू नये. तर त्याही १३ मंडळाचा दुष्काळग्रस्त यादीत नव्याने समावेश करावा, असे आ.डॉ.गुट्टे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
तसेच गंगाखेड तालुक्यातील सर्व धरणात गाळाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे साठवण क्षमता घडली आहे. त्याचा परिणाम सिंचन क्षेत्रावर होत आहे. यंदा पाऊस काळ कमी झाल्याने धरणाची दुरूस्ती करणे शक्य आहे. त्यामुळे तालुक्यातील २६ पाझर तलाव धरणातील गाळ लोकल सेक्टर व लोकसहभाग द्वारे काढण्यास आपल्या स्तरावर आदेशित करावे, याही मागणीचे पत्र आ.डॉ.गुट्टे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.
यावेळी उपविभागीय अधिकारी जिवराज डापकर, मित्रमंडळाचे जिल्हा संपर्क प्रमुख संदीप माटेगावकर, पूर्णा तालुकाध्यक्ष गणेश कदम, प्रशांत कापसे, अनिल राठोड, बाळू कदम यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
* पावसाने दिला दगा, उत्पन्न घटले,बळीराजा संकटात...
वर्षातून एकदा येणारा आनंदाचा उत्सव म्हणजे दिवाळी. नवीन कपडे, मिठाई, फटाके यासह गोडधोडीने आनंद द्विगुणीत करणारा सण म्हणजे दिवाळी. यंदा मात्र ही दिवाळी शेतकऱ्यांच्या मुळावरच आली आहे. कारण, यावर्षी झालेला अल्प पाऊस त्यातून हातून गेलेली पिकं अशा निसर्गाच्या लहरीपणामुळे कंगाल झालेल्या बळीराजाला दिवाळी अंधारात साजरी करण्याची वेळ नियतीने आणून ठेवली आहे. यामुळे सरकारने दुष्काळासह नुकसानग्रस्त अशा विविध अनुदानाच्या माध्यमातून मदत केली तर शेतकऱ्यांची दिवाळी सुखी समाधानाने पार पडेल, असाही विश्वास आ.डॉ.गुट्टे यांनी व्यक्त केला आहे.
0 टिप्पण्या