🌟दिवाळीनिमित्त ४४ अन्न पदार्थाचे नमुने प्रयोगशाळेकडे🌟
परभणी : दिवाळीमध्ये नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात अन्नपदार्थांची खरेदी करण्यात येते. त्या पदार्थामध्ये भेसळ करून नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ नये,यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी अ. मा तम्मडवार, सहायक आयुक्त (अन्न) अ. ए. चौधरी, व सह आयुक्त (अन्न) अ. गो. भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न पदार्थाचे नमुने विश्लेषणासाठी घेण्याची विशेष मोहीम राबविण्यात आली.
परभणी जिल्ह्यात १ ऑगस्टपासून ही मोहीम सुरु करण्यात आली आहे. या मोहिमेतर्गत किरकोळ विक्रेता, वितरक, उत्पादक, मिठाई विक्रेता दुध विक्रेते, किराणा अन्न पदार्थ इत्यादी ४४ अन्न नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले. त्यामध्ये तेल, मिठाई, रवा, मैदा, बेसन, मिरची पावडर, हळद पावडर, तूप, दुध इत्यादींचा समावेश आहे. विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठविलेल्या ४४ नमुन्यांपैकी ४चा अहवाल प्रमाणित दर्जाचा असल्याचे अन्न विश्लेषकांनी घोषित केला आहे. उर्वरीत ४० अन्न नमुन्यांचे विश्लेषण अहवाल प्रलंबित असून, तो प्राप्त होताच पुढील कार्यवाही करण्यात येईल.
अन्न पदार्थमध्ये भेसळ आढळून आल्यास अन्न सुरक्षा व मानदे कायद्यातील नियम व नियमनाचे अनुषंगे संबंधित अन्न पदार्थ विक्रेत्यावर कारवाई करण्यात येईल. तसेच अन्न व औषध प्रशासन कार्यालयामार्फत रिफाईड सोयाबीन तेलाचा २९८ लिटर तसेच पाम तेलाचा १०७८ लिटरचा साठा जप्त करण्यात आला आहे. तसेच दुध व दुग्धजन्य पदार्थात होणारी भेसळ रोखण्यासाठी अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने २४ अन्न नमुने विश्लेषणास्तव पाठविले आहेत. तसेच एकूण ४२ किलो खवा व ६१७ किलो पेढा नष्ट केला आहे.
* दिवाळीनिमित्त अन्न पदार्थाची खरेदी करताना ही खबरदारी घ्या :
मिठाई ताजी असल्याची खात्री करूनच खरेदी करा. त्याचे पक्के बिल घ्यावे. परवानाधारक, नोंदणीधारक पेढीकडूनच अन्न पदार्थाची खरेदी करावी. अनोळखी व्यक्तीकडून तसेच भडक खाद्यरंग असलेली मिठाई खरेदी करू नये. खवा-मावा यापासून तयार केलेल्या मिठाईचे सेवन २४ तासांच्या आत करावे. मिठाईवर बुरशी आढळून आल्यास नष्ट करावी. मिठाई खराब झाल्याची शंका आल्यास ती नष्ट करावी, उघड्यावरचे अन्न पदार्थ खरेदी करण्याचे टाळावे. पॅकबंद अन्न पदार्थ खरेदी करताना बॅच नंबर, बेस्ट बिफोर दिनांक, एक्सपायरी दिनांक तपासून खरेदी करावे, खाद्यतेलाचे टिन खरेदी करताना ते गंजलेले असू नयेत. ते खरेदी करू नयेत.
यानंतरही अन्न पदार्थ, मिठाई खरेदी करताना शंका आल्यास अन्न व औषध प्रशासन, परभणी कार्यालयाचा टोल फ्री क्रमांक १८०० २३० २१८ वर संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त (अन्न) अ. ए. चौधरी यांनी केले आहे......
******
0 टिप्पण्या