🌟जॉर्ज फर्नांडिस हे मुंबईत स.का.पाटलांना पराभूत केल्यानंतर ठरले होते जॉर्ज दी जायंट किलर🌟
जॉर्ज मॅथ्यू फर्नांडिस हे कामगारनेते, पत्रकार आणि संसदपटू असलेले जॉर्ज फर्नांडिस भारताच्या समाजवादी चळवळीतील महत्त्वाचे नेते आहेत. ते जनता दल-संयुक्त पक्षातील एक ज्येष्ठ होते. याशिवाय त्यांनी १९९४ साली नितीश कुमार ह्यांच्या सोबत समता पक्षाची स्थापना केली होती. केंद्रीय मंत्री या नात्याने उद्योग, रेल्वे आणि संरक्षण या खात्यांसह अनेक खात्यांचा कार्यभार त्यांनी सांभाळला आहे. महत्त्वपूर्ण संकलित लेख श्री कृष्णकुमार लक्ष्मी-गोविंदा निकोडे गुरूजींच्या शब्दशैलीतून... संपादक.
जॉर्ज फर्नांडिस हे मुंबईत स.का.पाटलांना पराभूत केल्यानंतर ठरले होते जॉर्ज दी जायंट किलर! जॉर्ज फर्नांडिस नावाचे वादळ मंगळवारी सकाळी शांत झाले. या समाजवादी नेत्याच्या एका हाकेवर अख्खी मुंबई थांबायची! कामगारांचे नेते म्हणून जॉर्ज प्रसिद्ध होते. ते पत्रकारही होते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे जॉर्ज नगरसेवक ते देशाचे संरक्षण मंत्री असा प्रवास केलेले नेते होते. त्यांचा हा प्रवास थक्क करणारा आहे. अल्झायमर आणि पार्किन्सन्स सारख्या आजाराने ते दीर्घकाळापासून अंथरुणाला खिळलेले होते. सन १९५०च्या सुरुवातीला ते टॅक्सी ड्रायव्हर यूनियनचे बेताज बादशाह झाले. अस्ताव्यस्त केस, सडपातळ अंगयष्टी, जाडाभरडा खादीचा कुर्ता-पायजामा, घासून गुळगुळीत झालेली चप्पल आणि डोळ्यांवर चष्मा असा जॉर्ज यांचा वेष असायचा. ते कामगारांमध्ये कामगार होऊन जात. त्यामुळे कामगारांमध्ये त्यांच्याबद्दल प्रचंड कुतूहल आणि आपलेपणा होता. मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीय यांच्यात जॉर्ज हे मुंबईचे बेताज बादशाह आणि मुंबई बंद पाडणारा डॅशिंग नेता होते, तर मुंबईच्या झोपडपट्टीत राहाणाऱ्यांसाठी आणि कामगारांसाठी ते हिरो होते. सन १९६७मध्ये लोकसभा निवडणुकीत दक्षिण मुंबईतून त्यांनी काँग्रेसच्या स.का.पाटील यांना नुसते आव्हान उभे केले नाही, तर पाटलांना त्यांनी मात दिली. त्यानंतर त्यांना "जॉर्ज दी जायंट किलर" म्हटले जाऊ लागले.
सन १९७३मध्ये ऑल इंडिया रेल्वेमेंस फेडरेशनच्या चेअरमन पदी जॉर्ज फर्नांडिस यांची निवड झाली. त्यावेळी भारतीय रेल्वेत चौदा लाख कर्मचारी होते. म्हणजे भारताच्या एकूण संघटीत क्षेत्रातील ७ टक्के ही लोकसंख्या होती. जॉर्ज यांनी दि.८ मे १९७४ला देशव्यापी संप पुकारला होता. रेल्वेचा चक्का जाम झाला. कित्येक दिवस रेल्वेचे काम ठप्प होते. तीन आठवड्यानंतर सरकारने मिलटरी बोलावून संप चिरडला. कर्मचाऱ्यांना रेल्वे क्वॉर्टरमधून बेदखल केले, नोकरीवरुन काढले. तेव्हा इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या, त्यानंतर कामगार, कष्टकऱ्यांनी इंदिरा गांधींना कधीही स्वीकारले नाही. आणीबाणी जाहीर झाली तेव्हा जॉर्ज ओडिसामध्ये होते. रेडिओवर त्यांना आणीबाणीची माहिती मिळाली. त्यांना कल्पना होती की सरकारच्या निशाण्यावरील पहिल्या पंक्तितील आपण एक असणार आहोत. त्यामुळे ते भूमिगत झाले. आणीबाणीविरोधात आंदोलन उभे केले. साधू, मासेमार बनून ते फिरले. या काळात दाढी-केस वाढले आणि त्यांनी सरदारजीचा वेष घेतला आणि आपले काम करत राहिले. जॉर्ज आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांनी आणीबाणीच्या काळात सरकारी कार्यालय, मैदान, इंदिरा गांधी, संजय गांधी यांच्या सभा उधळून लावण्यासाठी स्फोट घडवण्याची योजना आखली होती. त्यासाठी बडोद्याहून डायनामाइटही मागवले असल्याची माहिती होती. त्यांच्या योजनेचे बिंग फुटले आणि जून १९७६मध्ये जॉर्जसह २५ जणांना अटक झाली. या सर्वांची सीबीआय चौकशी सुरु झाली. जॉर्ज यांना अटक केल्यानंतर अक्षरश: साखळदंडाने बांधून त्यांना नेण्यात आले. त्यांंच्या भावावर पोलिसांनी एवढे अत्याचार केले, की दोन्ही पाय निकामी झाले. जनता पार्टीचे सरकार आल्यानंतर त्यांच्यावरील हा खटला मागे घेण्यात आला. इंदिरा गांधींनी निवडणुकीची घोषणा करण्याबरोबरच आणीबाणी संपली. सन १९७७मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत जॉर्ज यांनी मुझफ्फरपूर लोकसभा निवडणूक तुरुंगातून लढवली. त्यावेळी निवडणूकीत जॉर्ज यांचा साखळदंडातील फोटो प्रचारात वापरला गेला. तुरुंगातून त्यांनी निवडणूक लढली आणि विक्रमी मतांनी विजयी झाले. जनता पार्टीचे सरकार स्थापन झाले, मोरारजी देसाईंनी कामगारांच्या या नेत्याला उद्योग मंत्रीपद दिले. याच सरकारच्या काळात बडोदा डायनामाइट केस बंद करण्यात आली. जॉर्जने भाजपशी हातमिळवणी केली. हे त्यांंच्या अनेक सहकाऱ्यांना आवडले नव्हते. संपूर्ण आयुष्यात जॉर्ज यांच्याकडे तीन मंत्रालय होते. त्यातील एक उद्योग, दुसरे रेल्वे आणि तिसरे मंत्रालय होते. संरक्षण मंत्री असताना पोखरण अणुचाचणी केली. मात्र त्याचे श्रेय अटलबिहारी वाजपेयींना मिळाले. जॉर्जच्या भाळी डाग लागला शवपेटी घोटाळ्याचा. तहलकाने हा घोटाळा उजेडात आणला होता. देशातील एकमेवर संरक्षण मंत्री ज्यांनी ६,६०० मीटर उंचीवरील सियाचीन ग्लेशियरचा १८वेळा दौरा केला होता. विमान प्रवासावेळी जॉर्ज यांची भेट लैला कबीर यांच्यासोबत झाली, लैला कबीर या माजी केंद्रीय मंत्री हुमांयू कबीर यांची कन्या होत्या. काही दिवस गाठीभेटी झाल्यानंतर, त्यांनी लग्न केले. त्यांचा मुलगा शॉन फर्नांडिस आता न्यूयॉर्कमध्ये बँकर आहे. जया जेटली या समता पक्षाच्या अध्यक्ष होत्या तर जॉर्ज फर्नांडिस केंद्रीय मंत्री. जया आणि जॉर्ज यांच्याबद्दल अनेक चर्चा मीडियामध्ये रंगत आल्या आहेत, मात्र त्यावर जया जेटली किंवा जॉर्ज यांनी कधीही भाष्य केले नाही. त्यांचे अनेक निकटवर्तीय देखील जॉर्ज आणि जया यांच्यातील नाते हे नेता आणि कार्यकर्ता असेच असल्याचे सांगतात. मात्र मीडियामध्ये चर्चा होती, की जया यांचा त्यांच्या आयुष्यातील प्रवेशानंतर लैला कबीर या जॉर्ज यांना सोडून गेल्याचे म्हटले जाते. जॉर्ज यांच्यावरील पुस्तकाचे लेखक जयदेव डोळे यांनी सांगितले की, जॉर्ज यांच्या मुलाच्या शिक्षणासाठी लैला कबीर या मुलासोबत राहात होत्या. मात्र सन २०१०मध्ये जेव्हा जॉर्ज आजारी पडले तेव्हा लैला कबीर परत आल्या होत्या.
जॉर्ज फर्नांडिस यांचा जन्म दि.३ जून १९३०ला जॉन जोसेफ फर्नांडिस आणि एलिस मार्था फर्नांडिस या धार्मिक वृत्तीच्या मध्यमवर्गीय मंगलोरी कॅथॉलिक ख्रिश्चन दांपत्याच्या पोटी झाला. त्यांचे वडील एका खाजगी विमा कंपनीत अधिकारी होते. सहा भावंडांमध्ये जॉर्ज सर्वात मोठे होते. त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सोळाव्या वर्षी त्यांना रोमन कॅथॉलिक धर्मगुरू होण्याचे शिक्षण घेण्यासाठी पाठविण्यात आले. मात्र जॉर्ज यांनी ते पूर्ण करण्याऐवजी, वयाच्या १९व्या वर्षी मंगलोरमधील हॉटेल आणि वाहतूक व्यवसायातील कामगारांची संघटना बांधण्याचे काम केले. ही त्यांच्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात होती. सन १९४९मध्ये जॉर्ज नोकरीच्या शोधात मुंबईत आले. तेथे त्यांचे सुरुवातीचे दिवस अत्यंत खडतर गेले. पुढे कामगार नेते डिमेलो आणि समाजवादी विचारवंत राम मनोहर लोहिया यांच्या संपर्कात ते आले, त्यांचा जॉर्ज यांच्या विचारांवर आणि जीवनावर मोठा प्रभाव पडला.
जॉर्ज फर्नांडिस सर्वप्रथम इ.स.१९६७मध्ये दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे पक्षाचे ज्येष्ठ नेते स.का.पाटिल यांचा पराभव करून लोकसभेत प्रवेश केला. मात्र इ.स.१९७१च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला. इंदिरा गांधी सरकारला त्यांनी कडाडून विरोध केला. स्वतंत्र भारताच्या इतिहासातील एकमेव रेल्वे कर्मचारी संपाचे त्यांनी इ.स.१९७४मध्ये नेतृत्व केले. आणीबाणीच्या कालावधीत एक आरोपी म्हणून त्यांनी तुरुंगवासही भोगला. इ.स.१९७७ साली मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखाली सत्तेत आलेल्या जनता सरकारमध्ये त्यांनी उद्योगमंत्री म्हणून काम बघितले. जुलै १९७९मध्ये लोकसभेत काँग्रेस नेते यशवंतराव चव्हाण यांनी मांडलेल्या अविश्वास ठरावावर त्यांनी जनता सरकारच्या बाजूने प्रभावी भाषण केले, पण दुसऱ्या दिवशीच पंतप्रधान मोरारजी देसाईंच्या नेतृत्वावर आपला विश्वास राहिला नाही, असे जाहीर करून मंत्रीमंडळातून राजीनामा दिला. इ.स.१९८४च्या निवडणुकीत त्यांचा मंगलोर लोकसभा मतदारसंघातून पराभव झाला. पण इ.स.१९८९मध्ये ते बिहार राज्यातील मुझफ्फरपूर लोकसभा मतदारसंघातून जनता दलाच्या तिकिटावर लोकसभेवर निवडून गेले. विश्वनाथ प्रताप सिंह यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात स्थापन झालेल्या संयुक्त आघाडी सरकारमध्ये ते रेल्वेमंत्री होते. इ.स.१९९१च्या लोकसभा निवडणुकांतही त्यांनी मुझफ्फरपूर लोकसभा मतदारसंघातून जनता दलाचे उमेदवार म्हणून विजय मिळवला. इ.स.१९९४मध्ये बिहार राज्याचे मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांच्याशी झालेल्या मतभेदांमुळे त्यांनी आणि जनता दलाच्या नितीश कुमार आणि रवी रे यांच्यासारख्या नेत्यांनी समता पक्ष या स्वतंत्र पक्षाची स्थापना केली. इ.स.१९९६च्या लोकसभा निवडणुकीसाठी समता पक्षाने भारतीय जनता पक्षाबरोबर युती केली. फर्नांडिस यांनी बिहारमधील नालंदा मतदारसंघातून विजय मिळवला. पुढे इ.स.१९९८ आणि इ.स.१९९९च्या लोकसभा निवडणुकींत त्यांनी नालंदा मतदारसंघातूनच विजय मिळवला. इ.स.१९९९च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी समता पक्ष आणि रामकृष्ण हेगडे यांचा लोकशक्ती या पक्षांचे विलीनीकरण होऊन जनता दल- संयुक्त हा नवा पक्ष अस्तित्वात आला. इ.स.१९९८मध्ये अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या भाजप आघाडी सरकारमध्ये त्यांनी संरक्षण मंत्री म्हणून काम बघितले. इ.स.२००१मध्ये त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. त्यामुळे ते मार्च ते ऑक्टोबर २०२१पर्यंत मंत्रिमंडळाबाहेर होते. पण ऑक्टोबर २००१मध्ये त्यांची परत संरक्षण मंत्रीपदी नेमणूक झाली.
इ.स.२००४च्या लोकसभा निवडणुकीत जॉर्ज फर्नांडिस यांनी बिहार राज्यातील त्यांच्या पूर्वीच्या मुझफ्फरपूर मतदारसंघातून विजय मिळवला. नंतरच्या काळात ते आजारपणामुळे लोकसभेत फारसे सक्रीय राहिले नाहीत.त्यांना इ.स. २००९च्या लोकसभा निवडणुकीत जनता दल- संयुक्त पक्षाने तिकीट नाकारले. त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि त्यात त्यांचा पराभव झाला. त्यानंतर पक्षनेतृत्वाबरोबरचे त्यांचे मतभेद मिटले आणि ते राज्यसभेत पक्षातर्फे बिहारमधून निवडून गेले. अशा लोकप्रिय नेत्याचा मृत्यू दि.२९ जानेवारी २०१९ रोजी वयाच्या ८८व्या वर्षी झाला. इ.स.२०२०चा मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार दिनांक ८ नोव्हेंबर २०२१ रोजी भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते त्यांच्या कुटुंबियांना प्रदान करण्यात आला, हे विशेष!
!! पावन पुण्यस्मरणनिमित जॉर्ज फर्नांडिस यांना या लेखरुपाने विनम्र अभिवादन !!
- संकलन व शब्दांकन -
श्री कृष्णकुमार लक्ष्मी-गोविंदा निकोडे गुरूजी.
रामनगर वॉर्ड, गडचिरोली.
फक्त व्हॉट्सॲप- 9423714883.
0 टिप्पण्या