🌟भीमसेन जोशी हे महाराष्ट्रातील एक ख्यातकीर्त गायक व संगीतरचनाकार. त्यांचे पूर्ण नाव भीमसेन गुरुराज जोशी🌟
प्रसन्न होऊन गंधर्वांनी त्यांना उदारहस्ते गानविद्या दिली. त्यांच्या मैफली ऐकून मैफलीच्या गाण्याचे नियोजन कसे करावे, श्रोत्यांनुसार कोणत्या रागांची व गानप्रकारांची निवड करावी, या गोष्टी भीमसेनांनी आत्मसात केल्या. सवाई गंधर्वांच्या षष्ट्यब्दीपूर्तीच्या पुण्याच्या समारंभात सन १९४६मध्ये ते प्रथमच चमकले. महत्त्वपूर्ण अशी माहिती संतचरणरज- बापू- श्रीकृष्णदास निरंकारी यांच्या या संकलित लेखात अवश्य वाचा... संपादक.
भीमसेन जोशी हे महाराष्ट्रातील एक ख्यातकीर्त गायक व संगीतरचनाकार. त्यांचे पूर्ण नाव भीमसेन गुरुराज जोशी. त्यांचा जन्म दि.४ फेब्रुवारी १९२२ रोजी गुरुराज व रमाबाई या दांपत्यापोटी धारवाड जिल्ह्यातील रोण या त्यांच्या मावशीच्या गावी झाला. त्यांचे मूळ गाव गदगजवळचे होंबळ असून आजोबा भीमाचार्य हे गदगमध्ये स्थायिक झाले होते. ते कीर्तनकार-गायक होते. भीमसेन यांची आईही सुमधुर भजने म्हणत असे, तर वडील गुरुराज हे शिक्षक असून वेदान्तपारंगत होते. त्यांचे घराणे वंशपरंपरागत ज्योतिषी होते. बालपणापासून भीमसेन यांना गायनाचे विलक्षण आकर्षण होते. ते आईसोबत कानडी भजने म्हणत. तीव्र नैसर्गिक बुद्धिमता असूनही अभ्यासात त्यांचे मन रमले नाही. शाळेत जाता-येताना वाटेवरील ध्वनिमुद्रिकेच्या दुकानात उस्ताद अब्दुल करीमखाँ यांची झिंझोटी रागातली ठुमरीची ध्वनिमुद्रिका व सन १९३२ साली पं.सवाई गंधर्व- रामचंद्र गणेश कुंदगोळकर यांची गदगमधील मैफल यांतील किराणा घराण्याच्या दोन गायकांची गायकी ऐकून त्यांनी शास्त्रीय संगीत शिकण्याचा ध्यासच घेतला. या बालवयात किरकोळ कारणासाठी रागावून त्यांनी घर सोडले, पण काही कालावधीतच ते घरी परतले. त्यांची गाण्याची आत्यंतिक आवड पाहून वडलांनी उस्ताद इनायतखाँ यांचे गदगमधील शिष्य अगसरू चन्नाप्पा कुर्तकोटी यांच्याकडे त्यांची गाण्याची शिकवणी सुरू केली. त्यांच्याकडून वर्षभरात २०-२१ रागांशी त्यांचा प्राथमिक परिचय झाला; पण सखोल ज्ञानाची आस लागून राहिली. गुरूच्या शोधात ते घराबाहेर पडले आणि उपाशी-अर्धपोटी, रेल्वेने विनातिकीट प्रवास करत ग्वाल्हेरला हाफीज अलीखाँ- सरोदवादक अमजद अलीखाँ यांच्या वडीलांकडे पोहोचले. त्यांच्याकडच्या वास्तव्यात मारवा रागाची तालीम आणि कृष्णराव पंडित, कुंडलगुरू बाळाभाऊ उमडेकर व राजाभैय्या पूँछवाले ह्यांच्याकडच्या श्रवणभक्तीतून गायनाचे मूलभूत संस्कार त्यांना लाभले. राजाभैय्यांच्या सूचनेवरून ते खडकपूरला केशव लुखे यांच्याकडे गेले; पण ते वास्तव्य निष्फळ ठरले. पुढे कोलकात्याला पहाडी संन्याल ह्या बॉम्बे टॉकीजच्या अभिनेत्याने त्यांना गांधारी हा अनवट राग शिकवला. तेथून त्यांनी दिल्ली व मग जालंदरकडे प्रयाण केले. तेथील आर्य संगीत विद्यालयाचे अंधचालक धृपदिये मंगतराम यांच्याकडे धृपद संगीताची तालीम मिळाली व सोबतच भरपूर व्यायाम, सकस आहार यांमुळे त्यांची तब्येतही सुधारली. त्यांचा पहिला विवाह सुनंदा कट्टी या त्यांच्या मामेबहिणीशी झाला-१९४३. आणि दुसरा विवाह त्यांनी नागपूरमध्ये पूर्वाश्रमीच्या वत्सला मुधोळकर या गायिकेशी केला- १९५१.
हरिवल्लभ संगीत संमेलनात भेटलेल्या पं.विनायकबुवा पटवर्धनांनी दिलेला सवाई गंधर्वांकडे गाणे शिकण्याचा सल्ला शिरोधार्य मानून भीमसेन घरी परतले. वडलांनी त्यांना कुंदगोळला सवाई गंधर्व- रामभाऊ कुंदगोळकर यांच्याकडे रुजू केले; पण वयाच्या चौदाव्या वर्षी आवाज फुटल्याने आवाजावर मेहनत करत थोडी तालीम आणि जास्त श्रवणभक्ती करावी लागली. पण गुरुभगिनी गंगूबाई हनगल, गुरुबंधू नाडगीर, पं.मल्लिकार्जुन मन्सूर, सुरेशबाबू माने यांचे गायन ऐकायला मिळाले. सवाई गंधर्वांकडे त्यांनी निरलसपणे गुरुसेवा करून व अतिशय कष्टाने गानविद्या संपादन केली. गंधर्वांनी पुढच्या शिक्षणाला अचानक नकार दिल्यामुळे भीमसेन रामपूर संस्थानात मुश्ताक हुसेनखाँ साहेबांकडे गेले. तिथे वर्षभर नटमल्हार घोटला. पुढे सवाई गंधर्वांनी भीमसेन यांना पुन्हा बोलावले. त्यांच्याकडे तोडी, मुलतानी व पूरिया या फक्त तीन रागांचा सराव तीन वर्षे चालला. पण आसावरी, पूरिया धनश्री, तोडी, पूरिया, भैरवी, नटमल्हार या रागांचा गंधर्वांनी केलेला रियाज ऐकून गायनातील काळाचे अचूक भान व घराण्याच्या शिस्तीचे धडे मिळाले. मंद्र व तारसप्तकात आवाज सहजपणे फिरावा म्हणून त्यांनी दिवसाकाठी चौदा-चौदा तास मेहनत केली. त्यामुळे प्रसन्न होऊन गंधर्वांनी त्यांना उदारहस्ते गानविद्या दिली. त्यांच्या मैफली ऐकून मैफलीच्या गाण्याचे नियोजन कसे करावे, श्रोत्यांनुसार कोणत्या रागांची व गानप्रकारांची निवड करावी, या गोष्टी भीमसेनांनी आत्मसात केल्या. सवाई गंधर्वांच्या षष्ट्यब्दीपूर्तीच्या पुण्याच्या समारंभात सन १९४६मध्ये ते प्रथमच चमकले.
पं.भीमसेन लखनौ आकाशवाणी केंद्राचे मान्यताप्राप्त कलाकार झाल्यामुळे चरितार्थाचा प्रश्न सुटला. इथेच त्यांना थिरकवा साहेबांचा तबला, निस्सार हुसेनखाँचे वडील फिदाहुसेनखाँ यांचे गाणे मनसोक्त ऐकावयास मिळाले. बेगम अख्तर, व्ही.जी.जोग, गिंडे, भट, रातंजनकर, रसूलनबाई यांच्याशी त्यांचा परिचय झाला. बिस्मिल्लाखाँशी तर स्नेहच जडला होता. मुंबई व निजाम या रेडिओ केंद्रांशी ते जोडले गेले. त्यांना गायनाची निमंत्रणे आल्यामुळे मैफलीचे तंत्र अवगत झाले आणि जीवनाला सुखद कलाटणी मिळाली. सन १९५३साली कोलकात्याला झालेल्या एंटाली संगीत महोत्सवात त्यांनी सादर केलेल्या गायनास बंगाली रसिकांनी भरभरून दाद दिली. भीमसेनांची कीर्ती देशात व विदेशांतही पसरत गेली. त्यांच्या मैफलींना सर्वत्र अमाप लोकप्रियता लाभली आणि आर्थिक सुबत्तेबरोबर अनेक मानसन्मानही लाभले. सवाई गंधर्वांची मूळची स्वरप्रधान, आलापचारीची व माफक आक्रमक अशी गायकी भीमसेनांनी अधिक आक्रमक, अधिक गतिमान आणि पहिल्या सुरापासून पकड घेणारी अशी केली. त्यांच्या गायकीच्या या वैशिष्ट्यांमुळेच संगीतेतिहासात त्यांचे स्थान अजरामर झाले आहे. सन १९६८ साली "धन्य ते गायनीकळा" या नाटकाचे त्यांनी संगीत-दिग्दर्शन केले. गुळाचा गणपती, बसंतबहार, भैरवी, पतिव्रता, स्वयंवर झाले सीतेचे या चित्रपटांसाठी त्यांनी पार्श्वगायन केले. संतवाणी हा अभंगांचा व रंगवाणी हा नाट्यगीतांचा खास आविष्कार, बालमुरलीकृष्णन् या दाक्षिणात्य संगीततज्ज्ञाबरोबरची जुगलबंदी, स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यासोबतचे ध्वनिमुद्रण, सन १९९७साली भारतीय स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवात संसदेत सादर केलेले वंदे मातरम्, मिले सूर मेरा तुम्हारा या राष्ट्रैक्याच्या बहुभाषिक गीतातील प्रमुख सहभाग ही त्यांची मैफलींशिवायची गानविविधता आहे.
पं. भीमसेन जोशी यांना शासनाकडून पद्मश्री- १९७२, पद्मभूषण- १९८५, पद्मविभूषण- १९९९ या व सन २००८मध्ये "भारतरत्न" या सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यांव्यतिरिक्त संगीतरत्न- १९७१, संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार- १९७६ इत्यादी सन्मान त्यांना लाभले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, गुलबर्गा विद्यापीठ व टिळक महाराष्ट्र विद्यापीठ यांनी त्यांना सन्मान्य डी.लिट पदवी प्रदान केली. जेम्स बेवरिज व हिंदी कवी गुलजार यांनी त्यांच्या जीवनावर लघुपट बनविला आहे. सवाई गंधर्वांना देवाज्ञा झाल्यावर-१९५२, नानासाहेब देशपांडे- सवाई गंधर्वांचे जावई व पं.भीमसेन यांनी पुण्यात "सवाई गंधर्व पुण्यतिथी संगीत महोत्सव" सुरू केला. त्यास उत्तरोत्तर श्रोत्यांचा वाढता प्रतिसाद मिळाला. पुढे सवाई गंधर्व संगीत महोत्सव हा राष्ट्रीय स्तरावरचा कार्यक्रम झाला. या महोत्सवास नामांकित गायक-गायिका हजेरी लावतात. पं.भीमसेन यांच्या गायनाने या महोत्सवाचा शेवट होत असे. किराणा घराण्याचा भीमसेन जोशी यांचा गानवारसा त्यांचे पुत्र श्रीनिवास जोशी आणि शिष्य माधव गुडी, उत्तमराव पाटील, श्रीकांत देशपांडे व उपेंद्र भट हे पुढे चालवत आहेत, हे विशेष!
अखेरची काही वर्षे प्रकृती-अस्वास्थ्यामुळे ते गाऊ शकत नव्हते; पण या उत्सवात ते उपस्थित राहत. पत्नी वत्सलाबाईंचा मृत्यू व स्वत:च्या झालेल्या नऊ शस्त्रक्रिया ह्यांमुळे ते जरा विकल व एकाकी झाले होते. त्यातच त्यांचे पुणे मुक्कामी वृद्धापकाळाने दि.२४ जानेवारी २०११ रोजी दुःखद निधन झाले.
!! पं.भीमसेन जोशी पावन स्मृतिदिनी त्यांना व त्यांच्या अजरामर कार्यकौशल्याला विनम्र अभिवादन !!
- संत चरणरज -
बापू- श्रीकृष्णदास निरंकारी.
वंदनीय राष्ट्रसंत श्रीतुकडोजी महाराज चौक.
मु.रामनगर वॉर्ड, गडचिरोली.
फक्त व्हॉट्सॲप- 9423714883.
0 टिप्पण्या