🌟पाक्षिक मूकनायक वर्तमानपत्राला आरंभ दिवस ३१ जानेवारी : मूकनायक उद्देश : अस्पृश्यता निवारण....!


🌟 मुकनायकातून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लेखांमधून बहिष्कृत अस्पृश्य समाजावर होणाऱ्या अन्यायावर प्रकाश टाकला🌟

मूकनायक या पाक्षिकाचा मुख्य उद्देश दलित, गरीब व शोषित लोकांच्या व्यथा- त्यांचा आवाज सरकारपर्यंत आणि इतर जनतेपर्यंत पोहचवणे हा होता. त्यासाठी महामानव विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लेखांमधून बहिष्कृत अस्पृश्य समाजावर होत असलेल्या अन्यायावर प्रकाश टाकला. त्यातून त्या समाजाच्या उन्नतीसाठी तत्कालिन ब्रिटिश सरकारला काही उपाययोजना सुचवल्या. अस्पृश्यांचा उद्धार किंवा विकास होण्यासाठी त्यांनी राजकिय सत्ता व शैक्षणिक ज्ञान मिळवणे गरजेचे आहे, असे त्यांना नेहमी वाटत असे. अशा ज्ञानवर्धक माहितीसह वाचा, श्री कृष्णकुमार आनंदी-गोविंदा निकोडे गुरुजी यांचा हा लेख... संपादक.


    विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेले मराठी भाषेतील मूकनायक हे एक पाक्षिक आहे. इथूनच त्यांच्या न्याय्य पत्रकारितेस खरीखुरी सुरूवात झाली. ते पाक्षिक त्यांनी समाजाच्या वेदना व विद्रोह प्रकट करण्यासाठी सुरू केले होते. दि.३१ जानेवारी १९२० रोजी या पाक्षिकाचा पहिला अंक प्रकाशित करण्यात आला. हे पाक्षिक मुंबईहून निघत असे. पांडुरंग नंदराम भटकर नावाच्या महार जातीच्या शिक्षित तरुणाने या पाक्षिकाचे संपादक केले. कारण डॉ.आंबेडकर हे त्यावेळी सिडनेहॅम कॉलेजमध्ये प्रोफेसर म्हणून काम करीत होते. त्यामुळे त्यांना उघडपणे संपादक पदावर कार्य करणे शक्य नव्हते. म्हणून त्यांनी मूकनायकाच्या व्यवस्थापकपदी ज्ञानदेव ध्रुवनाथ घोलप यांची नेमणूक केली होती. पहिल्या अंकातील मनोगत नावाचा अग्रलेख आंबेडकरांनी स्वतः लिहिला होता. पुढील तेरा अंकातही त्यांनी लेख लिहिले. मूकनायकासाठी छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी २ हजार ५ शे रुपयांची आर्थिक मदत दिली होती. आंबेडकरांनी मूकनायक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले, कारण मराठीच त्याकाळी सामान्य जनतेची भाषा किंवा लोकभाषा होती आणि बाबासाहेबांचे कार्यक्षेत्र- कर्मभूमी महाराष्ट्र होते. तसेच तेव्हा महाराष्ट्रातील दलित जनता जास्त शिकलेली नव्हती, ती केवळ मराठीच समजू शकत होती. मूकनायकच्या पहिल्या अंकात हा मजकूर होता, "हिंदू समाज हा एक मनोरा आहे व एक एक जात म्हणजे त्याचा एक एक मजला होय. पण लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट ही की, या मनोऱ्याला शिडी नाही आणि म्हणून एका मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावर जाण्याचा मार्ग नाही. ज्या मजल्यात ज्यांनी जन्मावे त्याच मजल्यात त्यांनी मरावे. खालच्या मजल्यातला माणूस कितीही लायक असो, त्याला वरच्या मजल्यात प्रवेश नाही व वरच्या मजल्यातला माणूस मग तो कितीही नालायक असो, त्याला खालच्या मजल्यात लोटून देण्याची प्रज्ञा नाही."

     विश्वरत्न बोधीसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेले दोन पाक्षिके मूकनायक व बहिष्कृत भारत हे होत. बाबासाहेब म्हणाले होते, "कोणतीही चळवळ यशस्वी करण्यासाठी त्या चळवळीचे वर्तमानपत्र असावे लागते. ज्या चळवळीचे वर्तमानपत्र नसते, तीची अवस्था पंख तूटलेल्या पक्षाप्रमाणे होते." या पाक्षिकाने अस्पृश्य वर्गात जागृती निर्माण केली व त्यांना आपल्या अधिकारांची जाणिव निर्माण करून दिली. मूकनायकाचे ध्येय धोरण स्पष्ट करण्यासाठी त्यावर बिरुदावली म्हणून जगदगुरु संत तुकाराम महराजांच्या अंभगाच्या ओळी छापल्या जात असत- "काय करू आता धरुनिया भीड| निशंक हे तोंड वाजविले ||१|| नव्हे जगी कोणा मुकियाची जाण| सार्थक लाजोनी नव्हे हित||२||" मूकनायक या पाक्षिकाचा मुख्य उद्देश दलित, गरीब व शोषित लोकांच्या व्यथा- त्यांचा आवाज सरकारपर्यंत आणि इतर जनतेपर्यंत पोहचवणे हा होता. त्यासाठी महामानव विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लेखांमधून बहिष्कृत अस्पृश्य समाजावर होत असलेल्या अन्यायावर प्रकाश टाकला. त्यातून त्या समाजाच्या उन्नतीसाठी तत्कालिन ब्रिटिश सरकारला काही उपाययोजना सुचवल्या. अस्पृश्यांचा उद्धार किंवा विकास होण्यासाठी त्यांनी राजकिय सत्ता व शैक्षणिक ज्ञान मिळवणे गरजेचे आहे, असे त्यांना नेहमी वाटत असे. दि.५ जुलै १९२० रोजी बाबासाहेब पुढील शिक्षणासाठी लंडनला रवाना झाले. त्यानंतर दि.३१ जुलैपासून मूकनायकाचे संपादक पद ज्ञानेश्वर ध्रुवनाथ घोलप यांच्याकडे आले.

     पहिल्या अंकाच्या संपादकीयमध्ये जन्मप्रतिज्ञा अशी व्यक्त केली होती- "आमच्या या बहिष्कृत लोकांत होत असलेल्या व पुढे होणाऱ्या अन्यायावर उपाययोजना सुचविण्यास तसेच त्यांची भावी उन्नती व तिचे मार्ग यांच्या खऱ्या स्वरूपाची चर्चा होण्यास वर्तमानपत्रासारखी अन्य भूमीच नाही. परंतु मुंबई इलाख्यात निघत असलेल्या इतर वृत्तपत्रांकडे पाहिले असता असे दिसून येईल की, त्यातील बरीचशी पत्रे विशिष्ट अशा जातीचे हितसंबंध पाहणारी आहेत. इतर जातीच्या हिताची त्यांना पर्वा नसते. इतकेच नव्हे तर, केव्हा केव्हा त्यांना अहितकारक असेही त्यातून प्रलाप निघतात. अशा वृत्तपत्रकारांना आमचा इशारा एवढाच, की कोणतीही एखादी जात अवनत झाली, तर तिच्या अवनतीचा चटका इतर जातीत बसल्याशिवाय राहणार नाही. समाज ही नौकाच आहे. ज्याप्रमाणे आगबोटीतून प्रवास करणाऱ्या उतारूने जाणूनबुजून इतरांचे नुकसान करावे, म्हणून म्हणा किंवा आपल्या विनाशक स्वभावामुळे म्हणा, जर का इतरांच्या खोलीस छिद्र पाडले तर सर्व बोटीबरोबर त्यालाही आधी किंवा मागाहून जलसमाधी ही घ्यावीच लागणार आहे. त्याचप्रमाणे एका जातीचे नुकसान केल्याने, अप्रत्यक्ष नुकसान करणाऱ्या जातीचेही नुकसान होणार यात बिलकूल शंका नाही. म्हणूनच स्वहितसाधू पत्रकारांनी इतरांचे नुकसान करून आपले हित करावयाचे पढतमूर्खाचे लक्षण शिकू नये." सद्यस्थितीत मूकनायकाचे १९ अंक उपलब्ध आहेत. त्यांत डॉ.आंबेडकरांनी वैचारिक लिखाण केलेले आढळते. मूकनायक या पत्राने सामाजिक व धार्मिक क्षेत्राबरोबरच राजकीय क्षेत्रातही अस्पृश्यांनी बलवत्तर स्थान निर्माण केले पाहिजे, ही जाणीव निर्माण केली. सदर पत्रात विविध विचार, वर्तमानसार, निवडक पत्रातील उतारे, क्षेम, समाचार, कुशल प्रश्न, शेला पागोटे ही सदरे होती. मात्र काही अपरिहार्य कारणास्तव मूकनायक हे एप्रिल १९२३मधे बंद पडले. जरी ते बंद पडले असले तरी ते बहुजन समाजाला आपल्यावरील अन्यायाचा टाहो असा फोडून संबंधितांचे लक्ष वेधता येते, ही शिकवण व प्रखर पत्रकारितेचे विविध पैलू उलगडून दिले. त्याची फलश्रुती म्हणजे आज निर्माण झालेले सर्व समाजातील असंख्य प्रज्ञावंत पत्रकार होत. जय भीम, जय शिवराय, जय जोती, जय क्रांती!


!! मूकनायक पाक्षिकाच्या आरंभ दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा !!

   - संकलन व सुलेखन -

     श्री कृष्णकुमार आनंदी-गोविंदा निकोडे गुरुजी.

     मु.पो.ता.जि.गडचिरोली

    फक्त व्हॉ. नं. ९४२३७१४८८३.

                       

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या