🌟पुर्णेतील बुध्द विहाराच्या विकासाकरीता प्राधान्याने निधी उपलब्ध करुन देण्यात येईल - पालकमंत्री संजय बनसोडे


🌟धम्म परिषदेच्या माध्यमातून बौद्ध उपासकांनी धम्माचा प्रचारा करावा🌟


परभणी (दि. 31 जानेवारी) : बुद्ध विहाराच्या विकास आणि सोयी सुविधाकरीता आवश्यक तेवढा निधी प्राधान्याने उपलब्ध करुन देण्यात येईल, असे राज्याचे क्रीडा व युवक कल्याण, बंदरे मंत्री तथा परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले. 


पूर्णा येथील भदंत उपाली थेरो नगर परिसरात सामाजिक न्याय विभागाच्या निधीतून तयार करण्यात आलेल्या इमारतीचे लोकार्पण आणि अजिंठा कमानीचे उद्घाटन कार्यक्रमात पालकमंत्री संजय बनसोडे बोलत होते. यावेळी आमदार रत्नाकर गुट्टे, जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, पोलीस अधिक्षक रागसुधा आर., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मुन, अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, उपविभागीय अधिकारी जिवराज डापकर, भदन्त डॉ. उपगुप्त महाथेरो, भिक्खू करुणानंद महोथेरो, भिक्खू डॉ. ली ची रॅन, भिक्खू  हाँग जीन सू, गीता गुठ्ठे, राजेश विटेकर, प्रकाश कांबळे आदींची उपस्थिती होती.

या वेळी पालकमंत्री संजय बनसोडे म्हणाले की, बुध्द विहार हे संस्कार केंद्र आहेत. या विहारात कोणीही आल्यास त्या व्यक्तीस एक वेगळी ऊर्जा प्राप्त होत असते. पूर्णा येथे मागील अनेक वर्षापासून भदन्त डॉ. उपगुप्त महाथेरो यांच्या माध्यमातून धम्म परिषदेचे आयोजन होत आहे. अनेक उपासक उपासिका या परिषदेस उपस्थित राहून धम्माचा प्रचार प्रसार करीत आहेत. पूर्णा हे बौध्द धर्म चळवळीचे केंद्र बनले आहे. बुध्द विहाराच्या सर्वागिंण विकासाकरीता तसेच त्यास ब दर्जा देण्याचा प्रयत्न करुन आवश्यक निधी उपलब्ध करुन देण्यात येईल.


‘शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा’ या डॉ. बाबासाहेबांच्या ब्रीद वाक्याने आपण पुढे चालत आहोत. शिक्षणांचे महत्व व आपण का शिकले पाहिजे हे बाबासाहेबांनी त्यांच्या कार्यातून आपल्याला शिकविले आहे. आपला देश डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन प्रगती करत आहे. तसेच राज्य शासन देखील त्यांच प्रेरणेनेच राज्यात विविध विकासनशील योजना राबवित आहे. डॉ. बाबासाहेबांमुळेच आपली प्रगती झाली असुन, संपूर्ण जगाला जीवनाचा मार्ग दाखविणारा त्यांचा संदेश सदैव आपल्यासाठी दिशादर्शक आहे. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारक उभारणी कार्यात मला स्वतः लक्ष घालण्यास सांगितले आहे. याकरीता आंबेडकरी चळवळीतील सर्व नेत्यांची एक समिती तयार करण्यात आली आहे. या समितीने स्मारक उभारणीबाबत अत्यंत बारिक-सारिक सूचना दिल्या असून, हे आंतरराष्ट्रीय स्मारकाचे काम प्रगतीपथावर आहे. डिसेंबर 2024 पर्यंत हे जागतिक दर्जाचे दर्जेदार स्मारक पूर्ण होईल, असे त्यांनी सांगितले. 

भिमा कोरेगाव येथे होणारा शौर्य दिनाचा कार्यक्रम राज्य शासनामार्फत आयोजित करण्याचे ठरविले आहे. तसेच त्याठिकाणी भव्य असे स्मारक देखील उभारण्याचा राज्य शासनाचा मानस आहे. तसेच 6 डिसेंबर म्हणजे महापरिनिर्वाण दिनी राज्यभर सार्वजनीक सुट्टी देण्याची मागणी करण्यात आली आहे. येथील बुध्द विहाराच्या विकासासाठी आज ज्या काही मागण्या करण्यात आल्या आहेत. त्याबाबतचे प्रस्ताव तात्काळ पाठवून दिल्यास, याकरीता पाठपूरावा करुन निधी लवकर उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न करण्यात येईल असे सांगुन, सर्व समाजाला सोबत घेवून हे शासन विकासाचे काम करत आहे. समाजासाठी जे-जे करता येईल ते करण्याचा मी प्रामणिक प्रयत्न करेल असेही श्री. बनसोडे यावेळी म्हणाले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले. यावेळी भदन्त डॉ. उपगुप्त महाथेरो, आमदार रत्नाकर गुट्टे, राजेश विटेकर यांनी समयोचित मार्गदर्शन केले.प्रारंभी पालकमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंती निमित्त सामाजिक न्याय विभागाकडून उपलब्ध झालेल्या निधीतून उभारण्यात आलेल्या इमारतीचे लोकार्पण आणि अजिंठा कमानीचे उद्घाटन करण्यात आले.......

*****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या